"नरेंद्र मोदींनी भारताचे हित शीर्षस्थानी ठेवून योग्य धोरण स्वीकारले" - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

    08-Sep-2023
Total Views |
 modi-manmohan singh
 
नवी दिल्ली : "सर्व दबावांना न जुमानता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारताचे हित शीर्षस्थानी ठेवून योग्य धोरण स्वीकारले आहे," असं मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जी-२० शिखर परिषदेपासून चंद्र मोहिमेच्या यशापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले.
 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, "रशिया-युक्रेन युद्धानंतर भारताने नवीन जागतिक व्यवस्थेचा मार्ग दाखवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मी भारताच्या भवितव्याबद्दल खूप आशावादी आहे". रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक व्यवस्थेत निर्माण झालेल्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.
 
मनमोहन सिंग यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, "माझ्या आयुष्यात भारताला जी-२० च्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे". वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनसोबत सुरू असलेल्या तणावाबाबत ते म्हणाले की, "मला आशा आहे आणि विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या प्रादेशिक आणि सार्वभौम अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आणि द्विपक्षीय तणाव कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलतील."