आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानची अवस्था सध्या एखाद्या फुटबॉलसारखी झालेली दिसते. आता तर तालिबाननेही पाक सैन्याला सळो की पळो करुन सोडले आहे. अफगाणिस्तान सीमेवरील छायाचित्रे आणि व्हिडिओने पाकिस्तानची उरलीसुरली इज्जतही धुळीस मिळाली. अफगाणिस्तान सीमेवर सध्या पाकिस्तान आणि ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ अर्थात ‘टीटीपी’मध्ये युद्धाची ठिणगी पडली आहे. याचे पडसाद आता अफगाणिस्तान सीमेपासून ते अगदी पीओकेपर्यंत उमटले आहेत.
पाकिस्तान आणि तालिबानी सैन्यामध्ये बुधवारी उत्तर पश्चिमी पाकिस्तानमध्ये अफगाण-पाक सीमेवर भीषण गोळीबार झाला. तालिबानने प्रथम पाक सैन्याच्या चेक पोस्टवर हल्ला केला. त्यानंतर अफगाणिस्तान सीमेवर वसलेल्या पाकिस्तानच्या अनेक गावांवर कब्जा केला. पाकिस्तानने ही गोष्ट जगजाहीर होऊ नये, यासाठी जीव तोडून प्रयत्न केले. परंतु, ही बातमी जगासमोर आलीच. तालिबानने केलेल्या हल्ल्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, यात तालिबानी सैन्याकडून पाक सैन्यावर अंदाधुंद गोळीबार केला जात असल्याचे दिसून येते. यानंतर पाकिस्तानने तोरखम सीमा बंद केली असून, दोन्ही देशांतील मालवाहतूक व लोकांची ये-जा बंद झाली आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यातही तोरखम सीमा दोन्ही देशांतील तणावामुळे बंद करण्यात आली होती. तालिबानच्या प्रवक्त्यांनी ट्विटद्वारे तालिबानने हल्ला केल्याची माहिती दिली.
दि. ६ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता पाकच्या खैबरपख्तुनख्वा प्रांतातील चित्राल भागावर हल्ला केला. यात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले, तर अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले. या परिसरातील अनेक गावांवर कब्जा केल्याची कबुलीही तालिबानने दिली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपली उरलीसुरली अब्रू वाचवण्यासाठी खोटेपणाचा आव आणण्यास सुरुवातदेखील केली. आमच्या सैन्याने तालिबानला आमच्या गावांवर कब्जा करू दिला नाही. आम्ही त्यांना जशास तसे उत्तर दिल्याचे पाकने म्हटले आहे. तसेच, पाकने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारवर याचा ठपका ठेवला. तसेच, आमचा देश दहशतवादाविरोधात लढा देत असल्याचा आवही पाक आणू पाहत आहे. दरम्यान, तालिबान नावाचा साप मोठा झाला, तो पाकिस्तानमुळेच. तालिबानला डोक्यावर घेऊन नाचण्यात पाकिस्तानने कोणतीही कसर सोडलेली नव्हती. वेळप्रसंगी तालिबानला पैसे आणि शस्त्रसाठा पुरवण्यातही पाकिस्तान आघाडीवर होता. मात्र, तोच तालिबान आता पाकिस्तानवर डोळे वटारू लागला आहे. कंगाल झालेल्या पाकिस्तानची तुकडे-तुकडे होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार शहरावर एअरस्ट्राईक केला होता, ज्यामध्ये ४० तालिबानी मारले गेले होते. त्यानंतर यंदा तालिबाननेही पाकला जशास तसे उत्तर दिले. पाकिस्तानी तालिबानचे अफगाणिस्तान-पाक सीमेवर बर्यापैकी वर्चस्व आहे. पाकला अन्य दहशतवादी संघटनांबरोबरच पाकिस्तानी तालिबानचाही सामना करावा लागतो. त्यात भर म्हणून आता अफगाणिस्तानमध्येही तालिबान सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे पाकिस्तानात तालिबानला आणखी मजबूती मिळाली आहे. पाकिस्तानी तालिबानला अफगाण तालिबान सरकारचे सहकार्य आहे. त्यामुळे पाकिस्तानी तालिबानसोबत संघर्ष करणे पूर्वीइतके पाकला नक्कीच सोपे राहिलेले नाही. अफगाण तालिबान पाक तालिबानला पैसा, शस्त्रास्त्र अशा स्वरूपात खतपाणी घालत आहे.
अफगाणिस्तानप्रमाणेच पाकिस्तानमध्ये तालिबानी सरकार स्थापन करून तिथे ‘शरिया कायदा’ लागू करण्याचे स्वप्न पाकिस्तानी तालिबान पाहत आहे. पाकिस्तानला अंतर्गत संघर्षासह आर्थिक दिवाळखोरीचाही सामना करावा लागत आहे. राजकीय अस्थैर्यानेही पाक त्रस्त आहे. सैन्याचा वरचष्मा, त्यात जागतिक पातळीवर वारंवार होणारी नाचक्की यामुळे पाकिस्तानची स्थिती रसातळाला गेली आहे. दरम्यान, भारतात ‘इंडिया’ऐवजी ’भारत’ हेच नाव वापरले जाईल, अशा चर्चांना जेव्हा सुरुवात झाली. तेव्हा पाकिस्तानी मीडियाने तसे झाल्यास ‘इंडिया’ हे नाव पाकिस्तानने वापरावे, अशा चर्चा रंगवण्यास सुरुवात केली. आता आहे तो पाकिस्तान सांभाळणे जिकिरीचे होऊन बसले असताना, ‘इंडिया’ नाव धारण करण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे ‘सुंभ जळाला तरी पीळ काही सुटत नाही,’ असेच म्हणावे लागेल. एकूणच पाक तालिबानच्या धसक्याने अस्थिर पाकिस्तानची वाटचाल फुटीकडे सुरु झाली आहे, हे निश्चित!