केरळमध्ये कायदा-सुव्यवस्था वाऱ्यावर; एका महिन्यात दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
07-Sep-2023
Total Views |
कोची : केरळ राज्याची राजधानी असलेल्या कोचीमधील अलुवा भागात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे अलुवा परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
पीडितेचे वडील परप्रांतीय कामगार आहेत. पोलिसांनी माहिती दिली की, काही लोकांनी भातशेतीत मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेताकडे धाव घेतली. त्यानंतर पीडितेला काळमासेरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पीडितेची प्रकृती स्थिर आहे.
तपास सुरू करताना पोलिसांनी सांगितले की, गुन्हेगार स्थानिक भागातील असल्याचा संशय आहे आणि सखोल चौकशीनंतरच त्याची ओळख पटू शकेल. पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपींनी पीडितेचे अपहरण केले होते. एक महिन्यापूर्वी अलुवा येथे एका परप्रांतीय मजुराच्या पाच वर्षांच्या मुलीचे आरोपींनी अपहरण केले होते.
यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. पीडितेचा मृतदेह जुलैमध्ये पेरियार नदीजवळील अलुवा मासळी मार्केटच्या मागे असलेल्या दलदलीच्या परिसरात सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेसाठी पोलिसांनी २८ वर्षीय अस्फाक आलमला अटक केली होती.