बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबविण्यास प्रारंभ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

    29-Sep-2023
Total Views |
Construction Sector Takes Green Initiatives

नवी दिल्ली :
देशात २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे पंतप्रधानांचे ध्येय साध्य करण्यासाठी बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबवले जातील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे हे देशाच्या शहरी भागात भेडसावणारे मोठे पर्यावरणीय आव्हान आहे, असे गडकरी म्हणाले. सुमारे १०,००० हेक्टर जमीन उकिरड्यांनी व्यापली आहे, असे सांगत, महामार्ग बांधणीत शहरी घनकचऱ्याचा वापर करण्याच्या उपायांवर मंत्रालय काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणे शक्य असल्याचे ते म्हणाले.

देशातील पर्यायी जैव इंधनाबाबत बोलताना गडकरी म्हणाले की ते इथेनॉल अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे जोरदार पुरस्कर्ते आहेत आणि कृषी विकासाचा ६ टक्के दर गाठण्याला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादन घेण्यावर भर देत आहेत. इथेनॉल अर्थव्यवस्था २ लाख कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट आहे. जगातील पहिले बीएस-६ कॉम्प्लायंट फ्लेक्स फ्युएल स्ट्राँग हायब्रीड वाहन दिल्लीत सुरु केले जाईल, फ्लेक्स इंजिन १०० टक्के इथेनॉलवर चालतील आणि अर्थव्यवस्थेसाठी होणारी बचत १ लाख कोटींच्या पुढे जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. पानिपतमधील आयओसीएल संयंत्र तांदळाच्या पेंढ्यासारख्या शेतीतील कचऱ्याचे रूपांतर इथेनॉल आणि जैव बिट्युमेनमध्ये करते, असे ते म्हणाले.

जैव इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे धोरण – गडकरी

जैव-इथेनॉल उत्पादन तंत्रज्ञानातील प्रगतीचा विचार केला तर १ टन तांदूळ अंदाजे ४०० ते ४५० लिटर इथेनॉल उत्पादित करू शकतो. हे शाश्वत आणि ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगतीचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. भविष्यात भारतात ५% इथेनॉल मिश्रण वाढवण्याच्या संभाव्य योजनांसह १% शाश्वत विमान इंधन वापरण्याचे आदेश २०२५ पर्यंत देण्यात येतील. इंडियन ऑइल पानिपतमध्ये ८७,००० टन शाश्वत विमान इंधनाचे उत्पादन करण्याची क्षमता असलेले संयंत्र स्थापन करत आहे, असे गडकरी यांनी सांगितले.