‘विज्ञानं जनहिताय’ हे ब्रीद जपत विज्ञान-तंत्रज्ञानातून प्रबोधन करणारे प्रा. ना. द. मांडगे यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा वेध...
प्रा. नामदेव दत्तात्रय मांडगे अर्थात ना. द. मांडगे यांचे बालपण ग्रामीण भागात गेले. त्यांच्या वडिलांचा पारंपरिक शिवणकामाचा व्यवसाय. पंचक्रोशीत ते उत्कृष्ट कोट मेकर म्हणून नावाजलेले होते. वयाच्या सहाव्या वर्षी पितृछत्र हरपल्यानंतर आईने अहोरात्र कष्ट उपसून त्यांचे संगोपन केले. बालपण सरल्यानंतर प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत पूर्ण झाले. पुढे शिरपूरच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेतून (एफवायबीएससी)पर्यंत धडे गिरवल्यानंतर अमळनेरमधील प्रताप महाविद्यालयातून त्यांनी बीएससी व एमएससी पूर्ण केले.
युवादशेत देशप्रेमाने भारावून गेलेले मांडगे बीएससीच्या दुसर्या वर्षात शिकत असताना दि. १५ जून १९७६ रोजी देशात लागू केलेल्या आणीबाणीत त्यांनी व त्यांच्या काही मित्रांनी महाविद्यालयात सत्याग्रह पुकारला होता. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी होऊन पुढे जळगावच्या कारागृहात दोन महिन्यांचा तुरूंगवासही भोगावा लागला. एकीकडे चळवळीचे स्फुल्लिंग त्यांनी अंगात चेतवले असताना उच्च शिक्षणाची आबाळ होत होती. तेव्हा मित्रपरिवाराच्या आर्थिक मदतीतून त्यांनी एमएससीचे पुढील शिक्षण पूर्ण केले.
शैक्षणिक अध्याय आटोपताच अर्थार्जनासाठी बाहेर पडलेल्या ना. द. मांडगे यांनी अनेक वर्षे शिक्षकाची नोकरी केली. मुंबईतील कीर्ती महाविद्यालय, ठाण्याचे बी. एन. बांदोडकर विज्ञान कनिष्ठ व ज्येष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांच्यातील प्रतिभेची दखल उच्चस्तरावर घेतली गेली. १९९७ ते १९९९ या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट वेल्फेअर विभागाचे संचालक, सिनेट सदस्यपदी त्यांची निवड झाली. याचदरम्यान मुंबई विद्यापीठाने स्थापन केलेल्या विविध समित्यांच्या सदस्यपदी तसेच माहिती ब्युरोचे संचालक, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषद सल्लागार, क्रीडा विभागाचे संचालक, विद्यार्थी वसतिगृह व्यवस्थापक, एनएसएस समन्वयक आदी पदांचा अतिरिक्त कार्यभारही मांडगे यांच्याकडे होता. महाराष्ट्राच्या पहिल्या आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा असलेल्या ’अश्वमेध-१९९७’चे संघटन सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. २००७ मध्ये विद्यापीठाच्या दक्षता समितीमध्येही त्यांनी काम केले.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय विज्ञान आणि संग्रहालयाच्या नेहरू सायन्स सेंटर आयोजित सात राज्यांचा सहभाग असलेल्या ‘सायन्स ड्रामा फेस्टिव्हल’चे परीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय ठसा उमटविला. ठाणे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विज्ञान प्रकल्पात परीक्षक व अतिथी वक्ते म्हणून काम केले. मुंबई विद्यापीठासह इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी पहिले माहिती केंद्र त्यांनी सुरू केले. संसदीय कामकाज मंत्रालयांतर्गत द्वितीय ‘राष्ट्रीय युवा संसद’ स्पर्धसाठी संयोजक म्हणूनदेखील काम केल्याचे ते सांगतात. अनेक वर्षे ठाणे शहरात वास्तव्यास असल्याने ठाणे महापालिकेने त्यांची विद्वत्ता हेरून २०१० मध्ये त्यांना ’ठाणे गौरव पुरस्कारा‘ने गौरवले. ‘टीजेएसबी बँके’च्या संचालकपदी तसेच ‘कौसल्या मेडिकल ट्रस्ट फाऊंडेशन’च्या आचार समितीचे माजी अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
अखिल भारतीय विज्ञान परिषद तसेच ‘मराठी विज्ञान परिषदे’चे आयोजन सचिव म्हणून काम केले. ‘इस्रो’च्या खगोलशास्त्रविषयक ’वेध विश्वाचा’ या २००९ सालच्या दोन दिवसीय प्रदर्शनात सहभाग घेतला. याशिवाय ठाणे जिल्ह्यात सौरयंत्रणा व वैश्विक खगोलशास्त्र विषयक प्रकल्पांची अनेक प्रदर्शने त्यांनी भरवली.
विज्ञानविषयक उपक्रमांसोबतच लेखन क्षेत्रातही मांडगेंनी आपला ठसा उमटविला. अखिल भारतीय स्तरावरील शिंपी समाजाचे त्रैमासिक असलेल्या ’नामविश्व’ या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक असलेल्या मांडगे यांनी विविध वृत्तपत्रांमधून लेख लिहिले. स्वच्छ व हरित ठाणे आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे ना. द. मांडगे हे अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सहभाग घेत आहेत. २००३ पासून मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाचे कार्यवाह म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी विज्ञानविषयक विविध उपक्रम राबविले. त्यांच्या सक्रिय सहभागातून विज्ञान परिषदेच्यावतीने दर तीन वर्षांनी ‘राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलना’चे आयोजन केले जाते. शिवाय, प्रतिवर्षी विज्ञानरंजन कथा आणि निबंध स्पर्धांचे आयोजनही करण्यात येते. यात प्रा. मांडगे यांचा सहभाग मोलाचा असतो.
ठाणे शहरात विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपक्रम राबवावेत; तसेच संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी विज्ञान कुशल बनावेत, या उद्देशाने ‘राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद’ व ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या सहकार्याने ठाण्यात विज्ञान केंद्र उभारण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या माध्यमातून मांडगे पाठपुरावा करीत आहेत. या अनुषंगाने ‘मराठी विज्ञान परिषदे’तर्फे ठाणे महापालिकेच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘विज्ञान मंच’च्या माध्यमातून विविध प्रकल्प व कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. विज्ञानाचा नाद असलेल्या ना. द. मांडगे यांना पर्यटनासोबतच वन्यजीव छायाचित्रणाचा त्यांना नाद आहे. अशा या चतुरस्र विज्ञानवादी व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
९३२००८९१००