निरोप बुध्दिदात्यास...

    29-Sep-2023
Total Views |
Article On Maharashtra Celebrated Ganeshotsav

दरवर्षीप्रमाणे नित्यनेमाने येणारे गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांच्या उत्साहाला उधाण आणणारा महाराजाच. गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा अप्रतिम मिलाप असलेला हा उत्सव म्हणजे ‘स्कील इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ची प्रेरणा देणारा उत्सव असतो. खरे तर सार्वजनिकरित्या हा उत्सव साजरा करण्यामागे लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी किती उपयुक्त होती, हे आज काळ बदलत चालला, तरी त्या सुसंगत हा उत्सव सर्वत्र साजरा होत असल्याने ती उपयुक्तता सिद्ध होत आहे. समाजातील ऐक्य टिकून राहावे आणि राष्ट्र उभारणीसाठी हा समाज कार्यरत राहावा, या उद्दात हेतूची फलश्रुती होताना दिसते, हेच खरे तर या उत्सव नियोजनाचे यश आहे. काळ बदलला तरी त्या काळानुरूप उत्सवात बदल घडून येत असल्याने, या उत्सवाच्या माध्यमातून जी आर्थिक उलाढाल होत असते, त्यातून नव्या संकल्पना ‘स्टार्टअप’चा जन्म तर होतच असतो. मात्र, रोजचा उदरनिर्वाह करणार्‍यांच्या खिशातदेखील अधिकचा पैसा जमा होऊन त्याच्या भविष्यातील नियोजनाची तरतूद होत असते. पुण्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होताना, या व्यावहारिक चष्म्यातून जर उत्सवातील घडामोडींवर नजर टाकली, तर गणेशमूर्ती बनविण्यापासून ते उत्सव समाप्त होईपर्यंत जे काम हाताला मिळत असते, त्यातून फुल, हार, बॅण्ड, वाद्य, ढोल, स्टेशनरी, विद्युत रोषणाई अन्य व्यवसाय तेजीत आले, ही सगळी बुद्धिदाता गणेशाची कृपा अशी व्यावसायिक, कलाकारांची भावना असते. त्यामुळे त्याला निरोप देताना, त्याने दिलेली व्यवसायाची आणि आपल्या कौशल्य विकसित करण्याची प्रेरणा घेऊन आगामी काळात वाटचाल करायची, ही सामाजिक भावना यानिमित्ताने उदयास आली, हे भारताच्या विकासाच्या दृष्टीने शुभ संकेत मानले पाहिजेत. गणेशोत्सवाच्या याच सकारात्मक प्रेरणेने आपल्याला किमान पुढील वर्षभरासाठीची भरघोस ऊर्जा, कार्यशील राहण्याची एक अनामिक शक्ती प्रदान केली आहे. त्याच भावनेने प्रेरित होऊन आणि गणरायाचे मनोभावे स्मरण करुन सकारात्मक वाटचाल करणे, हाच गणेशोत्सवाचा मंगल संदेश...

निरोप वरुणराजास...

यंदा पावसाने नित्यनेमाने आपल्या कार्यकाळात हजेरी लावली, त्याचे काही भागात रुसणे, बरसणे तसे सुरूच होते. महाराष्ट्रात तो यंदा सरासरीपेक्षा कमीच कोसळला. ऑगस्टअखेरीस हाती आलेल्या आकडेवारीनुसार, बहुतांश भागात स्थिती गंभीर असल्याचे चित्र होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात काही भागांत पुन्हा त्याने हजेरी लावून ही गंभीर स्थिती दूर करण्याचा प्रयत्न केला. वरूणराजा तसा बेभरोशीच. देशाच्या अर्थव्यवस्थेचे गणित जसे त्याच्या अस्तित्वावर अवलंबून असते, तसे शेती आणि शेतमजुरी करणारा, शिवाय त्यावर विसंबून असणारे सर्व निगडित घटकदेखील अवलंबून असतात. यावर्षी आता या वरूणराजालादेखील निरोप देण्याची वेळ आली आहे. दि. २५ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाने प्रवास सुरू केला असल्याचे दोन दिवसांसाठी हवामान खात्याने स्पष्ट केले होते. यावर्षी हा पाऊस कमी झाल्याने त्याचे भविष्यातील दुष्परिणाम किती गंभीर असतील, हे येणार्‍या काळात स्पष्ट होईलही; मात्र शनिवारपर्यंत आणखी पाऊस वर्तविला असल्याने आणि गेल्या दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात १०० मिमीहून अधिक पाऊस झाल्याने वरूणराजानेदेखील नागरिकांची भविष्यातील सोय केली असल्याचे मान्य केले पाहिजे. खर्‍या अर्थाने भविष्यात जीवनदान देणारा हा वरूणराजा जेव्हा परततो, तेव्हा गणरायाप्रमाणेच त्याला निरोप देणे, हे प्रत्येकासाठी भावनिकदृष्ट्या जड झालेले असते. गणरायाचे दहा दिवस आणि वरूणराजाच्या १२२ दिवसांचे मानवी आयुष्यात किती अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. खर्‍या अर्थाने दरवर्षी ’आत्मनिर्भर भारता’ची पायाभरणी करणारे, हे मानवी जीवनातील उत्सव आनंदात, प्रगतीत भर घालीत असतात. भारत कृषिप्रधान देश आहेच. मात्र, काळानुरूप हे कृषी क्षेत्र आता भारताच्या प्रगतीचे महत्त्वाचे घटक असलेल्या अन्य वीज, खाद्य उद्योग यांसारख्या अन्य क्षेत्रांसाठीदेखील उपयुक्त आणि गरजेचे ठरत असल्यामुळे, या कृषी क्षेत्राला टवटवीत ठेवण्यासाठी वरूणराजा नित्य बरसला, तरच हे साध्य होऊ शकते. जाता-जाता तो अती न बरसता अधिक बरसला तरी फायदाच आहे. सरासरीपेक्षा कमी असला, तरी त्याने राज्यात फार नुकसान किंवा काळजीचे वातावरण ठेवले नाही, त्यामुळे गणपती पाठोपाठ वरूणराजास निरोप देणे अपरिहार्यच.

अतुल तांदळीकर