मुंबई (विशेष प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी शाडू मातीच्या मुर्तींची घरात प्रतिष्ठापना केलेली आहे. पर्यावरणपुरक समजल्या जाणाऱ्या या मुर्तींच्या मागणीत सातत्याने वाढ झाली असली तरी त्यांच्या विसर्जनानंतर जल प्रदुषणाचा प्रश्न उद्भवतोच. यावर तोडगा काढण्यासाठी निसर्गायन आणि ग्रंथ तुमच्या दारी या संस्थांनी एकत्र येऊन शाडू माती संकलनाचा एक उपक्रम हाती घेतला आहे.
नाशिकमधील घरगूती शाडू मातीच्या गणपतींचे घरीच विसर्जन केल्यानंतर ती माती संकलित करण्याचे आवाहन केले गेले आहे. यासाठी नाशिकच्या विविध भागात शाडू माती संकलन केंद्र उभी केली जाणार असुन दि. ६, ७ आणि ८ ऑक्टोबर असे तीन दिवस हे संकलन केले जाणार आहे. शाडू माती तुलनेने चिकट माती असल्यामुळे कोणत्याही पाण्यात विसर्जित केल्यानंतर ती पुर्णपणे विरघळत नाही. पाण्यात न विरघळल्यामुळे तसेच केमिकलयुक्त रंग ही पाण्यात मिसळले जात असल्यामुळे जल प्रदुषणाचा धोका ही वाढतो. त्याचबरोबर शाडू माती मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जाते. हे टाळुन शाडू मातीचा पुनर्वापर व्हावा या दृष्टीकोनातुन ही विसर्गित मुर्तींची माती संकलित करुन पुन्हा मुर्तीकारांना मोफत देण्यात येणार आहे. पुम्यातील इकोएक्झीस्ट या संस्थेची ही मुळ संकल्पना असुन नाशिकच्या ग्रंथ तुमच्या दारी आणि निसर्गायन यांनी या उपक्रमाला मोठं आणि मुर्तस्वरुप दिलं आहे. या उपक्रमाचं यंदा हे पहिलंच वर्ष असुन या उपक्रमाला प्रसिद्धी तसेच उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
यानिमित्ताने नाशिककरांना शाडू मातीची मुर्ती असेल तर घरीच विसर्जन करून ती माती संकलित करुन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कला आणि पर्यावरणाचं जीवन अबाधित ठेवण्यासाठी उचलेलं हे महत्त्वपुर्ण पाऊल नक्कीच यशस्वी ठरेल. या उपक्रमाला आत्तापर्यंत ४५ हुन अधिक शाळा महाविद्यालये जोडली गेलेली आहेत.
असे करा माती संकलन...
घरातील शाडू मातीचे बादलीत किंवा पातेल्यात विसर्जन करायचे आहे. ते करताना यामध्ये एक कापड चारही टोके बाहेर ठेवून अंथरायचे आहे. त्यावर मुर्ती ठेऊन विसर्जन केल्यानंतर ते चार दिवस तसेच ठेवायचे. वर तरंगलेले निर्माल्य काढुन टाकल्यानंतर त्याची पोटली बांधून ठेवायची. ३-४ दिवस ही पोटली ठेवल्यानंतर त्यातील पाणी पुर्णपणे निघून जाईल. त्यानंतर ही पोटली संकलन केंद्रांवर जमा करायची आहे. शिल्पकार, मुर्तीकार आणि शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांना निशुल्क देण्यात येणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.