लखनऊ : उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये ख्रिश्चन धर्मांतराच्या आरोपाखाली पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. सलमान आणि त्रिभुवन राम अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून बायबल आणि लाऊडस्पीकर जप्त करण्यात आला आहे. याच गावातील एका तक्रारदाराने या सर्वांवर हिंदूंना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. ही घटना दि. २४ सप्टेंबर रोजी घडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आझमगडमधील मेहराजपूर पोलीस स्टेशन परिसरात घडली. येथील लालमाळ गावात दि. २४ सप्टेंबर रोजी प्रार्थना सभेच्या नावाखाली अनेक लोक जमले होते. कार्यक्रमादरम्यान मोठे लाऊडस्पीकर ही लावण्यात आले होते. याच गावातील रहिवासी रवींद्र राम यांनी आरोप केला आहे की, प्रार्थना सभेच्या नावाखाली हिंदूंना ख्रिश्चन बनवण्याचा कट रचला जात आहे. बाहेरगावचे काही लोक हिंदूंना पैशाचे आमिष दाखवत होते. शिवाय, मुले ख्रिश्चन झाली तर त्यांना चांगल्या शाळेत शिक्षण दिले जाण्याचे आश्वासन देऊन धर्मांतराचा कट रचलायं.
याबाबत रवींद्र राम यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत घटनास्थळ गाठले. झडतीदरम्यान पोलिसांना त्या ठिकाणी लाऊडस्पीकर लावलेले आढळले ज्यासाठी परवानगी घेतली नव्हती. तसेच बफर, बाईक, शिसे आणि सुमारे १० बायबल जप्त करण्यात आले होते जे लोकांमध्ये वाटण्यासाठी आणले होते.
याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. पहिल्या आरोपीचे नाव सलमान आहे तर दुसऱ्या आरोपीचे नाव त्रिभुवन राम आहे. त्रिभुवन राम हे मेहराजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खुंदनपूर येथील रहिवासी आहेत. दुसरा आरोपी सलमान मुलगा हा शेजारील गाझीपूर जिल्ह्यातील खानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सिधौना गावचा रहिवासी आहे.
विशेष म्हणजे, आझमगड पोलिसांनी दि. २५ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश बेकायदेशीर धार्मिक परिवर्तन प्रतिबंध कायद्याच्या कलम २०२१ अंतर्गत दोन्ही आरोपींना अटक केली. चौकशीअंती आवश्यक कायदेशीर कारवाई करून दोघांनाही कारागृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.