मुंबईत पाच दिवसांच्या बाप्पांसह गौराईला भावपूर्ण निरोप

    24-Sep-2023
Total Views |
Gauri-Ganpati Visarjan In Mumbai City

मुंबई :
पाच दिवस गणरायाची मनोभावे आराधना केल्यानंतर आज गणपती बाप्पांसह गौराईचेही विसर्जन करण्यात येत  आहे. दि. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या गणेशोत्सवामुळे सर्वत्र एक वेगळाच उत्साह पाहण्यास मिळत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतींसाठी करण्यात आलेली आरास पाहून अगदी मन प्रसन्न होत आहे. अशातच २१ सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन झाले. मात्र आज गौराईसह पाच दिवसांच्या बाप्पाचेही विसर्जन करताना प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना "पुढच्या वर्षी लवकर या" अशी साद ते देत होते.
 
येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

मुंबईतील चौपाट्यांवर आपल्या पाच दिवसाच्या पाहुण्याला घेऊन येणारे भक्तगण पुन्हा जड अंतःकरणाने घराकडे फिरकत होती. दादर, गिरगाव, जुहू यांसारख्या चौपाट्यांवर विसर्जनाची लगबग सुरु असून त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सज्ज झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तसेच बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत होती. तर पालिकेकडूनही विसर्जन स्थळांवर आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

चौपाट्या सज्ज

- चौपाट्यांवर पोलिस आणि पालिकेने नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत

- तीनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे

- शंभरहून अधिक सिसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

- कोणत्याही भाविकांना समुद्रामध्ये जाण्याची परवानगी नाही

- शंभर स्वंयमसेवक चौपट्यांवर उपस्थित
 
एकूण १०३४ पाच दिवसांच्या गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात आले असून यापैकी सार्वजनिक ८ तर घरगुती ९१० गणेशमूर्ती आणि ११६ गौराईंचा समावेश आहे. त्यापैकी कृत्रिम तलावांमध्ये २ सार्वजनिक आणि ३९४ घरगुती गणेश मूर्ती ५३ गौराई म्हणजेच एकूण ४४९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121