मानवतेच्या कल्याणासाठी भारत मजबूत पाया रोवून उभा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    23-Sep-2023
Total Views |

Narendra Modi


नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारत मंडपम येथे जी-२० शिखर परिषद यशस्‍वी करण्यासाठी कार्यरत असलेल्‍या तळागाळातील कर्मचारी वर्गाच्‍या चमूशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. जी-२० च्या यशस्वी आयोजनासाठी जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पंतप्रधानांनी या प्रसंगी बोलताना अधोरेखित केले. पंतप्रधानांनी या यशाचे श्रेय व्यवस्थापन चमूला दिले.
 
उत्कृष्ट नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रियेचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी या चमूने आयोजनादरम्यानचे त्यांचे अनुभव आणि मिळालेले धडे यांचे दस्तऐवजीकरण करण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे तयार केलेले दस्तऐवज भविष्यातील कार्यक्रमांसाठी उपयुक्त मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या कामी येऊ शकतात असेही त्यांनी सांगितले.
 
पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांशी अनौपचारिकपणे गप्पा मारत त्यांना आपापल्या विभागातील अनुभव कथन करण्यास सांगितले. यामुळे एखाद्याच्या कार्यक्षमतेला व्यापक दृष्टीकोनातून पाहता येते, असेही ते म्हणाले. एकदा आपल्याला इतरांचे प्रयत्न दिसले की, त्यामुळे आपण अधिक चांगले काम करण्यास प्रवृत्त होतो, असे ते म्हणाले. ‘आजचा कार्यक्रम म्हणजे श्रमिकांची एकजूट असून तुम्ही आणि मी दोघेही श्रमिक आहोत’, असेही पंतप्रधान म्हणाले.
 
जी-२० चा एकत्रित परिणाम म्हणजे देशाची ताकद जगासमोर दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. “माझ्यासाठी खरा आनंद हा आहे की, माझ्या देशाला आता विश्वास वाटतो, की आपण अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे आयोजन करू शकतो,” असेही ते म्हणाले.
 
नेपाळमधील भूकंप, फिजी, श्रीलंका येथील चक्रीवादळ यासारख्या जागतिक पातळीवरील आपत्तींच्या वेळी बचावकार्यात आणि मोठ्या प्रमाणात साहित्य पाठवून भारताने दिलेल्या मोठ्या योगदानाचा तसेच मालदीवमधील वीज आणि पाण्याचे संकट, येमेनमधून नागरिकांची सुरक्षित सुटका, तुर्कीएचा भूकंप याचा उल्लेख केला. तसेच देशाच्या वाढत्या आत्मविश्‍वासाबद्द्दल अधिक स्पष्टीकरण दिले. या सर्व प्रसंगी मानवतेच्या कल्याणासाठी भारत खंबीरपणे उभा आहे आणि गरजेच्या वेळी सर्वत्र पोहोचतो हे सिद्ध झाले, असेही ते म्हणाले.
 
या कार्यक्रमात मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी मागच्या आसनांवर बसले आहेत आणि कार्यक्रम स्थळावरील (ग्राउंड लेव्हल) कार्यकर्ते सर्वात पुढे आसनस्थ झाले आहेत. "मला ही व्यवस्था आवडली, कारण त्यामुळे आपल्याला खात्री मिळते की, माझा पाया मजबूत आहे", असेही पंतप्रधान म्हणाले.
 
ज्यांनी जी-२० परिषदेच्या यशात योगदान दिले आहे, अशा सुमारे ३००० लोकांचा या संवादामध्ये सहभाग होता. विशेषत: ज्यांनी परिषद सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अगदी तळागाळातील काम केले, यात सफाई कर्मचारी, चालक, वेटर आणि विविध मंत्रालयातील इतर कर्मचारी यांचा यात समावेश होता. या संवादाला विविध विभागांचे मंत्री आणि अधिकारीही उपस्थित होते.