विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द ‘व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट गुरुवार, दि. २८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. भार्गवा यांनी ‘कोव्हॅक्सिन’ लस कशी आणि कोणत्या स्थितीत विकसित केली, याबद्दलचे सत्य चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पल्लवी जोशी आणि नाना पाटेकर यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद...
याचं देशाचं खायचं आणि याचं देशाची निंदा करायची, हा आपल्याला मिळालेला शाप!
डॉ. भार्गवा यांची व्यक्तिरेखा साकारतानाचा अनुभव यावेळी नाना पाटेकर यांनी सांगितला. ते म्हणाले की, “कोरोनाचे संकट भारतासह संपूर्ण जगावर ओढावल्यामुळे कमीत कमी वेळेत ताकदीची लस तयार करणे अत्यंत गरजेचे होते. जितका वेळ जाईल तितकी माणसं मरत होती. त्यामुळे अनेक प्रसंगी डॉ. भार्गवा यांना कठोर पावले उचलावी लागली होती,” या शब्दांत त्यांनी त्यांच्या भूमिकेचा परिचय करून दिला. पुढे ते म्हणाले की, “सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, काही घटना या चित्रपटात दाखवता येत नाहीत. इतर परदेशी लसींनी जागतिक बाजारात स्वतःला ज्या पद्धतीने मांडले आणि परदेशी मंडळींनी कशाप्रकारे भारताच्या लसीविरोधात मोर्चेबांधणी करून आपल्याच लोकांना आपल्या देशाबद्दल कसं वाईट बोलायला भाग पाडलं, हा वाईट प्रकार आहे. आपण आपल्याच देशाच्या विरुद्ध देशात राहून, इथलं खाऊन, देशाची निंदा करायची आणि देशाविरोधात कारवाई करायची हा आपल्याला मिळालेला शाप आहे,” या शब्दांत नानांनी खंत व्यक्त केली. मात्र, सरतेशेवटी ‘कोव्हॅक्सिन’ ही भारताने तयार केलेली जगातील एक यशस्वी लस आहे, हे सिद्ध झाल्याचा आनंददेखील त्यांनी व्यक्त केला. या सगळ्या अग्निदिव्यातून जाताना काय काय करावं लागलं, हे सांगणारा चित्रपट म्हणजे ‘द व्हॅक्सिन वॉर’ अशी या चित्रपटाबद्दल अगदी थोडक्यात माहिती नानांनी दिली.
चित्रपटाच्या विषयाचा आणि ‘कोविड’चा संबंध नाही!
भारताने कोरोना काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी जी ‘कोेव्हॅक्सिन’ लस तयार केली, त्यामागे महिला शास्त्रज्ञांनी किती मेहनत घेतली आणि कोणत्या मानसिक स्थितीत ती लस तयार केली, यावर ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. याबद्दल बोलताना पल्लवी जोशी म्हणाल्या की, “या चित्रपटातून भारतातीलआणि देशाबाहेरील नागरिकांना भारत कोणत्याही अडचणींचा सामना कसा करू शकतो, हे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचे नाव ऐकल्यानंतर साहजिकच डोळ्यांसमोर कोरोनाचा भयावह काळ उभा राहतो.” मात्र, कोरोनाचा आणि या चित्रपटाच्या कथानकाचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा पल्लवी जोशी यांनी केला. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देत डॉ. भार्गवा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शास्त्रज्ञांनी ही लस कशी तयार केली, याबद्दल ही कथा माहिती सांगते. थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘कोेव्हॅक्सिन’ तयार करणार्या शास्त्रज्ञांचा हा ‘बायोपिक’ आहे. कोरोना जगभरात पसरल्यामुळे ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आले. त्यावेळी संपूर्ण जग ठप्प झाले. कोणतीही यंत्रणा सशक्तपणे सक्रिय नव्हती. अशा परिस्थितीतही या सर्व शास्त्रज्ञांनी मिळून भारताची लस तयार केली. ती लस तयार करण्यासाठी सामान्यांच्या आकलनापलीकडे जाणार्या अनेक अशक्य बाबी या शास्त्रज्ञांनी केल्या होत्या. त्या सर्व या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे पल्लवी म्हणाली.
भारताची चांगली बाजू दाखवण्याची गरज
तसेच चित्रपटाच्या संहितेकरिता संशोधन कशाप्रकारे केले, याबद्दल अधिक माहिती देताना पल्लवी म्हणाली की, “कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच ‘लॉकडाऊन’ लागल्याकारणाने अनेकजण त्यांच्या वैयक्तिक संशोधनात बुडाले होतेच. त्यावेळी मी आणि विवेकदेखील याबद्दल विविध माध्यमांतून माहिती घेत होतो. त्यावेळी डॉ. बलराम भार्गवा यांनी लिहिलेले ‘गोईंग व्हायरल’ हे पुस्तक वाचनात आले आणि एक विचार मनात आला की, भारताने इतकी मोठी कामगिरी केली आहे. आजवर भारताची वाईट बाजू बर्याचदा चित्रपटांतून किंवा अन्य माध्यमांतून दाखवली गेली. आपल्याकडे चांगल्या बाबी कोणत्या आहेत, याची चर्चा किंवा त्या गोष्टी पश्चिमी देश फार दाखवत नाहीत किंवा त्याबद्दल जास्त चर्चादेखील करीत नाहीत. याच विचाराने पेटून उठत आपल्या देशाची चांगली आणि अभिमानाची बाजू ही मोठ्या पडद्यावर आलीच पाहिजे, असा अट्टहास बाळगत हा चित्रपट तयार केला आणि परदेशातदेखील या चित्रपटाचे स्क्रिनिंग भारतात प्रदर्शनापूर्वी केले असून, त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला,” असेही पल्लवी म्हणाली. शिवाय भावी पिढीसाठी आपल्या देशाबद्दल एक सकारात्मकता या चित्रपटातून निर्माण व्हावी, हादेखील ध्यास मनात असल्याचे तिने सांगितले.
...म्हणून पुस्तकाचे मालकी हक्क एक रुपयांत विकले!
“डॉ. भार्गवा यांनी त्यांच्या पुस्तकाचा मालकी हक्क एक रुपयाने आम्हाला दिला. कारण, त्यांचं असं म्हणणं होतं की, ‘कोेव्हॅक्सिन’ ही लस लोकांसाठी तयार केली होती. त्यामुळे त्यातून मिळणार्या नफ्यावर आपला हक्क नसून, तो केवळ सामान्य लोकांचा आहे, अशी विचारधारा डॉ. भार्गवा यांची होती. शिवाय भारताने अजूनही ‘कोेव्हॅक्सिन’ लस ‘पेटंट’ केलेली नाही. त्याचेही कारण त्यातून मिळणारा नफा नको, असा अट्टहास असल्यामुळे ही कथा आम्हाला भावली आणि त्यातूनच ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाची संहिता लिहिली गेली,” अशी माहिती पल्लवीने दिली. तसेच, कोरोनाच्या सकारात्मक आठवणी कोणत्याही व्यक्तीच्या मनात नसताना, त्याबद्दल कोणताही चित्रपट तयार करणे, ही खरं तर जोखीमच होती.” त्यामुळे त्या काळात एक सकारात्मक घटनादेखील घडली आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची आणि त्या ‘रिअल लाईफ हिरों’बद्दल अर्थात शास्त्रज्ञांबद्दल जगाला माहिती होण्याची गरज असल्यामुळे हा विषय लोकांच्या विस्मरणातून पूर्णपणे जाण्याआधीच हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतल्याचेही पल्लवीने सांगितले.
विवेक अग्निहोत्री म्हणजे जीव ओतून काम करणारा दिग्दर्शक!
‘द काश्मीर फाईल्स’ सारख्या देशाला हादरून टाकणारा चित्रपट दिग्दर्शित करणार्या विवेक अग्निहोत्रींसोबत नाना पाटेकर यांनी या चित्रपटात पहिल्यांदाच काम केले. यावेळी नानांनी विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक करत ‘जीव ओतून काम करणारा दिग्दर्शक’ असे म्हणत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाच्या सबंध चित्रीकरणादरम्यान विवेक कायम विचारात मग्न असायचा. विवेकबद्दल एक खास गोष्ट सांगायची, तर त्याच्यातील निर्माता ज्यावेळी तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतो, त्यावेळी कायम गैरहजर असायचा. त्याचे कारण असे की, त्यावेळी चित्रपटासाठी माझा किती पैसा लागला आहे, याचा विचार विवेकने केला नाही,” असे म्हणत नानांनी विवेक अग्निहोत्री यांचे मनापासून कौतुक केले.
नटाने कायम दु:खाच्या शोधात असले पाहिजे!
१९७८ साली ‘गमन’ या चित्रपटातून अभिनयाची कारकिर्द सुरू करणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. ५० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीतून भावी पिढीतील कलाकारांना त्यांनी मोलाचा संदेश दिला. “गेली ५० वर्षं या क्षेत्रात काम करत असताना नट म्हणून मी काल काय काम केलं, हे विसरून जात असेल तरच मी आज काम करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नटाला त्याच्या सुख आणि दु:खाच्या व्याख्या रोज बदलता आल्या पाहिजे. माझं कालचं सुख आणि दु:खं मी सेटवर घेऊन आलो, तर माझं रोज काम एकसारखं होणार आहे, त्यात काहीच नावीन्य नसेल. माझ्या मते, नट का कधीच सुखी नसू शकतो, त्याने कायम दु:खाच्या शोधात असले पाहिजे. कारण, जितकी वेगळी दु:खं तुम्ही पाहता, तितकी वेगळी कामं तुम्हाला करिता येतात.”
जगातील पहिल्या दहा नटांच्या यादीत विक्रम गोखले यांचे नाव....
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत ‘नटसम्राट’ या चित्रपटात नाना पाटेकर यांनी केलेलं काम आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील ताकदीच्या कलावंतांमध्ये विक्रम गोखले यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ७०-८०च्या दशकात एकत्रित एकाच मनोरंजनसृष्टीत काम करणार्या विक्रम गोखले यांच्या आठवणीत नानांचे डोळे पाणावले. नाना म्हणाले की, “विक्रम गोखले गेल्यामुळे माझं वैयक्तिक नुकसान झालं. जगातल्या पहिल्या दहा नटांची नावं सांगा असं कुणी विचारलं, तर त्यात एक नाव विक्रम गोखले यांचं असेल. विक्रम यांच्या जाण्यामुळे पाठीवर हात ठेवणार्या थोरल्याला हात निघून गेला आहे, याची खंत वाटते,” अशी दु:खद भावना नानांनी व्यक्त केल्या.