नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी-२० परिषद पार पडली. या परिषदेमध्ये विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये विविध मुद्दयांवर चर्चा झाली. दोन दिवसांची ही परिषद यशस्वीरित्या पार पडली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी-२० परिषदेत उपस्थित असलेले अधिकारी, ग्राउंड स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी ग्राउंड स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांना जी-२० परिषदेचे श्रेय दिले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी-२० चे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले असून यामुळे देशाचे नाव उजळले आहे. सगळीकडून कौतूकाचा वर्षाव होत असल्याचेही ते म्हणाले. या सगळ्याच्या मागे ज्या लोकांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेतले आणि ज्यांच्यामुळे या परिषदेला यश मिळाले ते सर्व तुम्हीच आहात असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.