नवी दिल्ली : हांगझाऊ येथे होणाऱ्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेकरिता भारतीय खेळाडूंचा व्हिसा नाकारण्यात आला असून चीनचा खोडसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनने अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडूंना देशात येण्यास बंदी घातली आहे. चीनच्या या निर्णयाला भारताने विरोध केला आहे.
यासंदर्भात, परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, चीनच्या या भेदभावपूर्ण वर्तनाचा भारताकडून निषेध करण्यात आला आहे. तसेच, चीनची ही कृती आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भावना आणि स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे. तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा नियोजित दौरा रद्द केला आहे.
तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी 'X' वर पोस्ट करत चीनच्या या कृतीचा निषेध केला. तसेच, चीनची ही कृती क्रीडा भावना आणि आशियाई खेळांचे संचालन करणाऱ्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच, हांगझाऊ येथे आयोजित १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेणार असलेल्या अरुणाचल प्रदेशातील आमच्या वुशू खेळाडूंना व्हिसा नाकारण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश हा वादग्रस्त प्रदेश नसून भारताचा अविभाज्य भाग आहे. अरुणाचल प्रदेशातील संपूर्ण लोक चीनच्या जमिनीवर आणि लोकांवरच्या कोणत्याही बेकायदेशीर दाव्याला ठामपणे विरोध करतात. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने चीनच्या बेकायदेशीर कृतीवर कारवाई केली पाहिजे, असेही केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले.