मुंबई : जगप्रसिद्ध नृत्यांगना आणि संस्कार भारतीच्या दिल्ली प्रांत अध्यक्ष पद्मभूषण डॉ. सरोजा वैद्यनाथन यांचे गुरुवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वा निधन झाले. दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येतही अस्वस्थ होती. ‘संस्कार भारती’ दिल्ली प्रांतच्या कार्यकारिणी आणि इतर सर्व सदस्यांकडून डॉ. सरोजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
डॉ. सरोजा वैद्यनाथन या २०२१ पासून कला आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या 'संस्कार भारती' या संस्थेच्या दिल्ली प्रांतच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी संस्थेच्या कार्यात आजवर सक्रियपणे मार्गदर्शन आणि योगदान दिले आहे. कला आणि नृत्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना २००२ मध्ये पद्मश्री आणि २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय, त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, दिल्ली सरकारचा साहित्य कला परिषद पुरस्कार आणि इतर अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. २००६ मध्ये त्यांना 'भारत कला सुदार' या पदवीनेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. सरोजा यांनी १९७४ मध्ये 'गणेश नाट्यालय' ची स्थापना केली. याठिकाणी विद्यार्थ्यांना नृत्याव्यतिरिक्त तमिळ, हिंदी आणि कर्नाटक संगीतही शिकवले जाते. गुरू-शिष्य परंपरेचे व्यावहारिक उदाहरण बनून सरोजा यांचा भारतातील आणि परदेशातील आपल्या शिष्यांना भरतनाट्यम तसेच भारतीय कला, संस्कृती आणि परंपरा यांची संपूर्ण माहिती करून देण्यात मोठा वाटा आहे.