मुंबई : मंगळवार १९ सप्टेंबर, गणेश चतुर्थी दिवशी आपला लाडका बाप्पा घरोघरी विराजमान झाला. १० दिवसांचा हा जणू एक सोहळाच. दहा दिवसांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात अश्रू आणि पुढील वर्षाची आतुरता पाहण्यास मिळते. अशातच बुधवार २० सप्टेंबर रोजी दीड दिवसाच्या बाप्पाचे मुंबईत मोठ्या उत्साहात आणि पाणावलेल्या डोळ्यांनी विसर्जन करण्यात आले.
मुंबईच्या समुद्र पालिकेकडून विसर्जनासाठी विशेष तयारी करण्यात आली होती, तर गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहूसह समुद्र किनाऱ्यांवर दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई पोलिसांकडून देखील विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ पासून सावधान
‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’च्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून गणेश विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेमणूक करण्यात आलेल्या जीवरक्षक व यंत्रणेमार्फत करावे. गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये, असे आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा आणि चौपाट्यांवर लावण्यात आलेल्या सूचना फलकांवरील सूचना तसेच उद्घोषकांद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी कटाक्षाने पालन करण्याचेही आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर लहान मुलांना पाण्यामध्ये जावू न देण्याची खबरदारी घेण्याचेही पालिकेकडून निर्देश देण्यात आले आहेत.
एकूण ७१७ दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले असून यापैकी सार्वजनिक ४ तर घरगुती ७१३ गणेशमूर्तींचा समावेश आहे. त्यापैकी कृत्रिम तलावांमध्ये ३ सार्वजनिक आणि २४४ घरगुती म्हणजेच एकूण २४७ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.