मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा बुधवारी राजस्थानच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रचारादरम्यान त्यांनी काँग्रेवर जोरदार निशाणा साधला.
हिमंता बिस्वा सरमा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "अशोक गेहलोत हे महागाई कमी करण्याचे नाटक करत आहेत. राजस्थानमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट असून येथील मुलींवर सर्वाधिक अत्याचार केले जातात."
यासोबतच हिमंता बिस्वा सरमा यांनी सोनिया गांधींवर टीका करत गांधी परिवारावर देशात सनातन धर्माच्या विरोधात वातावरण निर्माण केल्याचा आरोपही केला आहे. तसेच महिला आरक्षण विधेयकात राजीव गांधींच्या नावाचा उल्लेख करत सोनिया गांधींनी बिनबुडाचे विधान केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंडी आघाडीचे लोक सनातन हिंदू धर्म संपवण्याच्या विचार करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.