नकाशा अन् नतद्रष्टपणा

    18-Sep-2023   
Total Views |
Article on Congress on 'missing Northeast' from India map

काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमुळे नवा वाद निर्माण झाला. धर्मनिरपेक्षतेच्या आणि ‘भारत जोडो’च्या गप्पा मारणार्‍या काँग्रेसची मजल आता थेट भारताच्या नकाशाची मोडतोड करण्यापर्यंत गेलेली दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा समावेश असलेल्या या व्हिडिओत काँग्रेसने खोडसाळपणा करीत भारताचा अपूर्ण नकाशा दाखवला. या अ‍ॅनिमेशन व्हिडिओमधील नकाशात भारताचा पूर्वोत्तर भाग गायब करण्यात आला. या व्हिडिओत पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी बोलताना दिसतात. दरम्यान, काँग्रेसने यापूर्वीही आपल्या अधिकृत फोटो/व्हिडिओ/पोस्टर्समध्ये भारताच्या नकाशावरून काश्मीर असेच गायब केले होते. काँग्रेसचे अशा पद्धतीचे नापाक राजकारण भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी घातक आहे. यातून काँग्रेसला देशाविषयी असलेला आदर आणि काँग्रेसची मानसिकता सर्वांसमोर आली. काँग्रेस भारताच्या पूर्वोत्तर भागाला देशाचा भाग मानत नसल्याचे यावरून स्पष्ट होते. दरम्यान, 2008 साली तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि चिनी कम्युनिस्ट पक्षात झालेल्या करारात काँग्रेस आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने उच्चस्तरीय माहिती आणि सहकार्याबाबत चर्चा केली. या करारावर तत्कालीन काँग्रेस पक्षाचे मुख्य सचिव राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली होती, तर चीनच्यावतीने त्यावर विद्यमान पंतप्रधान शी जिनपिंग यांनी स्वाक्षरी केली होती. त्यावेळी जिनपिंग हे पक्षाचे उपाध्यक्ष होते. या कराराशिवाय 2017 मध्ये डोकलाम वादाच्या वेळी राहुल गांधी यांनी चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांची भेट घेतली होती. सुरुवातीला बैठक झालीच नसल्याचे सांगितले गेले; पण खुद्द चिनी दूतावासानेच बैठक झाल्याचा खुलासा केल्यावर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. यानंतर खुद्द राहुल गांधींनीच कैलास मानसरोवर मुद्द्यावर चिनी नेत्यांसोबत झालेल्या गुप्त बैठकीचा खुलासा केला होता. मोदी विरोधासाठी एकत्र येऊन ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली. मात्र, देशाची मान खाली कशी जाईल आणि शत्रूराष्ट्रांना कशी मदत होईल, यासाठी काँग्रेस आग्रही असते. त्यामुळे राजकीय नकाशावर जीवंत राहायचे असल्यास काँग्रेसने असे उद्योग थांबविणे कधीही हितावह ठरेल.

टिळा आणि टीका

‘इंडिया’ आघाडीने खेळ मांडला आहे तो केवळ सत्तेसाठी. सनातन धर्माला लक्ष्य केल्यानंतरही काँग्रेसकडून सनातन आणि हिंदू धर्माच्या प्रथा, परंपरांचा अपमान सुरूच आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते कपाळाला टिळा लावण्यास नकार देताना दिसतात. व्होटबँक आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाचा खेळ करताना काँग्रेसला सनातन धर्माचा तिरस्कार करायचा आहे. हा व्हायरल व्हिडिओ हैदराबादमधील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचा आहे. यात पारंपरिक साडी नेसलेली एक महिला काँग्रेस नेत्यांचे औक्षण करून टिळा लावून स्वागत करीत असल्याचे दिसते. पण, जेव्हा सिद्धरामय्या येतात आणि ती महिला त्यांना टिळा लावण्यासाठी पुढे सरकते, तेव्हा सिद्धारामय्यांनी त्या महिलेला हाताने इशारा करीत थांबण्यास सांगितले. यानंतर महिलेने औक्षण करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांची नकारघंटा कायम होती. काँग्रेसचेच नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनीही त्यांचा हिंदू पेहराव आणि टिळा लावणे पक्षातील मोठ्या नेत्यांना रुचत नसल्याचे विधान गेल्याच महिन्यात केले होते. याआधीही ‘इंडिया’ आघाडीच्या अनेक नेत्यांनी टिळा लावण्यास आणि औक्षणाला नकार देत सनातन धर्माचा अनादर करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईत झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीतही ममता बॅनर्जी यांनी औक्षण आणि टिळा लावण्यास मनाई केली होती. उदयनिधी स्टॅलिनपासून ते ए. राजापर्यंत, जी परमेश्वरपासून प्रियांक खर्गेपर्यंत, आरजेडीपासून सपापर्यंत, ममता बॅनर्जींपासून ते राहुल गांधी अशी यादी बरीच मोठी आहे. हिंदू परंपरांना ठेव पोहोचवा आणि मतांचे ध्रुवीकरण करा, असा एककलमी कार्यक्रम ‘इंडिया’ आघाडीने हाती घेतलाय. ‘इंडिया’ आघाडीत सामील झालेल्या उबाठा गटाच्या उद्धव ठाकरेंनीही सगळ्या विचारधारेला तिलांजली देऊन काँग्रेसची वाट पकडली. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे कोणीही हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा केला नाही, अशी टीका नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘इंडिया’ आघाडीवर केली. देशासाठी एकत्र येणाच्या गमजा मारणार्‍या आघाडीच्या कुण्या नेत्याने मुक्तिसंग्राम दिन साजरा केला नाही. एकीकडे हिंदू प्रथा-परंपरांचा अपमान करायचा आणि दुसरीकडेे ‘भारत जोडो’चा सारीपाट मांडायचा, अशा दुटप्पी भूमिकेने काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.