भारताचं बदलतं स्वरूप, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राष्ट्राचे वाढणारे महत्त्व, देशांतर्गत विकासाची आलेली लाट या सर्वांमुळेच १४२ कोटी भारतीयांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येतो. आज संपूर्ण जगाचा विश्वास संपादन करून भारत ‘विश्वगुरू’ म्हणून उदयास येतोय आणि या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एकच सांगावेसे वाटते की, विश्वगुरू भारताचे नायक म्हटलं की, डोळ्यासमोर आपलं नाव येतं.
पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेव्हा आपले चरण स्पर्श करून आभार मानतात, फ्रान्स, ग्रीस आणि इतर अनेक देश जेव्हा आपल्याला त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करतात, तेव्हा उर अभिमानाने भरून येतो. प्रथम मोहिमेत ‘चांद्रयान’ अयशस्वी झाल्यानंतर आपल्या खांद्यावर डोकं ठेऊन रडणार्या डॉ. सिवन यांची एका मोठ्या भावाप्रमाणे आपण समजूत काढता, तेव्हा एक व्यक्ती म्हणून तुमच्याबद्दल आदर अधिक वाढतो. तुमच्या नेतृत्वात जेव्हा भारताच्या शिरपेचात असंख्य मानाचे तुरे रोवले जातात, तेव्हा पदोपदी जाणवतं की, माझ्या देशाचा पंतप्रधान असावा तर असा! भारतमातेसाठी काम करताना मागील नऊ वर्षांत आपण एकही सुट्टी घेतली नाही, याचं प्रचंड कौतुक आणि त्याहीपेक्षा जास्त कुतूहल वाटतं. विश्वात शोभणारा भारत निर्माण करताना या प्रवासात तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, कार्यक्षम आणि भारतीय संस्कृती जपणार्या पंतप्रधानाची नितांत गरज आहे.
’वसुधैव कटुम्बकम्’ मानणारी महान संस्कृती ज्या भूमीत रूजली, ती आपली भारतभूमी. विविध परंपरांनी नटलेल्या आणि समृद्ध वारसा असलेल्या आपल्या या भूमीचे पांग फेडण्यास पुन्हा एक नरेंद्र यावा, ही एक दैवी योजनाच! १८९३ साली शिकागो येथे आपल्या भाषणातून नरेंद्राने म्हणजेच स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती जगासमोर उलगडली आणि आजच्या काळात दुसर्या नरेंद्राच्या कार्याने त्याची प्रचिती संपूर्ण विश्वाला आली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी भारतीय संस्कृतीच्या मूल्यांपासून दूर जाऊन कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. मानवतावादी दृष्टिकोन, शाश्वत विकास, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ यासारखी अनेक भारतीय मूल्ये त्यांच्या कार्यपद्धतीचा गाभा आहेत, हे वेळोवेळी दिसून येतं.
‘व्हॅक्सीन मैत्री’
कोरोनासारख्या महामारीत ‘जीडीपी’ केंद्रित आणि नफ्या-तोट्याची गणितं सोडून, मानवकेंद्रित दृष्टिकोनाने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने जगाला मदतीचा हात दिला. भारताची इतकी प्रचंड लोकसंख्या, कोरोना पसरण्याची भीती या सगळ्या गोष्टी माहीत असूनसुद्धा भारताने इतकी उदारता दाखविल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. खरं सांगायचं तर स्वतःला प्रचंड भूक लागलेली असतानासुद्धा आपल्यातली अर्धी भाकरी तोडून देऊन निस्वार्थीपणे दुसर्याची भूक भागवणं, हा भारतीयांचा स्वभाव आहे, ती आपली मूल्य आहेत. जागतिक पातळीवर इतका मोठा निर्णय घेतानासुद्धा आपल्या सरकारने नफा तोटा, आर्थिक गणितं, जागतिक राजकारण या सगळ्याचा विचार न करता प्रत्येक भारतीयाच्या ‘डीएनए’ध्ये असलेल्या मूल्यांचा विचार केला याचा अभिमान वाटतो.
‘वसुधैव कुटुम्बकम्’
‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे फक्त बोलण्यापुरते मर्यादित आणि संकुचित आपण कधीच राहिलो नाही. सार्या विश्वाला आपण आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मदत करण्याचे नुसते वचन न देता ते आपण वेळोवेळी पूर्ण केले. अगदी ताजे उदाहरण म्हणजे, तुर्कीयेमध्ये भूकंप झाल्यानंतर मदतीसाठी पुढे सरसावणारा पहिला देश भारत ठरला. वास्तविक पाहता, पाकिस्तानसह तुर्कीसुद्धा नेहमीच भारतविरोधी भूमिका घेत जगासमोर उभा राहिला आहे, तरीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राजकीय वैर, तणावपूर्ण संबंध, स्पर्धात्मकता अशा कोणत्याही पूर्वग्रहदूषित विचारांना थारा न देता, पूर्णतः मानवतावादी दृष्टिकोनातून भारताने तुर्कीला मदत केली. फक्त तुर्कीच नाही, तर सीरिया, नेपाळ, श्रीलंका किंवा इतर कोणताही देश आपल्या कुटुंबाचाच भाग आहे आणि त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे, या विचारांनीच भारत नेहमी मदतीसाठी पुढे आला आहे.
‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर’
‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणत भारताने जगाला आपल्या कुटुंबात समाविष्ट केलं. एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत ‘जी २०’ परिषदेच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाला आणि मानवकेंद्रित आणि सर्वसमावेशक पर्वाची सुरुवात झाली. ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर’ या विचाराने भारताने लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण आणि जागतिक शांतता यांसारख्या विषयांवर सर्वांना सोबत घेऊन काम करण्यास सुरुवात केली. वसुंधरेच्या पालनपोषणासाठी, संरक्षणासाठी आपण एकत्र येत आहोत. कुटुंब म्हणून विकासासाठी एकमेकांना साथ देत आहोत आणि परस्परावलंबी काळात आपण एकत्र येऊन मानवकेंद्रित दृष्टिकोन ठेवून, भविष्याकडे वाटचाल करत आहोत, हे एक वैश्विक सत्य आहे.
विश्वगुरू भारत
आज जगाच्या पाठीवर कुशल मनुष्यबळाचा एक सक्षम स्रोत म्हणून भारताची ओळख वाढत आहे. आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने प्रवास करीत असताना जगाच्या बदलत्या गरजांसाठी आणि आपल्या विकासासाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती भारतात होत आहे. देशाच्या या प्रवासात ’प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना’ यासारख्या उपक्रमांमुळे आपले युवक सक्षम आणि कुशल बनत आहेतच. पण, त्याचबरोबर ‘प्रधानमंत्री रोजगार मेळावा’ सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार नागरिकांना मिळत आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, युवकांना राष्ट्रीय स्तरावर ऩऊ लाख सरकारी नोकर्या उपलब्ध झाल्या. ‘आत्मनिर्भर’ बनण्याच्या महत्त्वाकांक्षेतून तरुण पिढीला रोजगार आणि कौशल्य देण्यावर भारताचा भर आहे. ‘उद्योग ४.०’अंतर्गत संपर्क यंत्रणा, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मशीन लर्निंग आणि रिअल टाइम-डाटा या चार घटकांच्या विकासाचा भारत प्राधान्याने विचार करत आहे. ‘चांद्रयान-३’ सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतून आज भारत नवे आकाश व्यापत आहे, तर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला प्राधान्य देऊन आपल्या वसुंधरेचे संरक्षण करत आहे. विकासाच्या वाटेवर चालत असताना आज ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज भारत आहे, तर जागतिक मंदीच्या काळात संधीची आशा भारत आहे.
भारताचा खर्या अर्थाने अमृत काळ सुरू असताना आज भारताची प्रेरणा बनून आपले पंतप्रधान अविरत कार्य करीत आहेत. भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी आपण सर्वच एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहू! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विश्वगुरू भारताचा उदय फार दूर नाही! आपण असंख्य भारतीयांचा आत्मविश्वास आणि अभिमान आहात. प्रत्येक कार्यात आम्ही सदैव आपल्या सोबत खंबीरपणे उभे राहू.
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! भारतमाता तिच्या या सुपुत्रास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना!
मंगलप्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य