The Vaccine War : चित्रपटासाठी डॉ. भार्गवा यांनी पुस्तकाचे मालकी हक्क १ रुपयांना विकले

    14-Sep-2023
Total Views |
 
pallavi and dr bhargava
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : करोनाच्या सावटातून लोकांना वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी पुढाकार घेत स्वत:ची कोवॅक्सिन लस तयार केली. डॉ. बलराम भार्गवा आणि त्यांच्या महिला शास्त्रज्ञांच्या चमुने ही करोनावरील लस कशी तयार केली याची सत्य कथा सांगणारा चित्रपट 'द वॅक्सिन वॉर' विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी हिने बातचीत करताना डॉ. भार्गवा यांनी 'गोईंग वायरल' हे पुस्तक कोवॅक्सिन लसीवर लिहिले होते. या पुस्तकाचे मालकी हक्क 'द वॅक्सिन वॉर' चित्रपटासाठी त्यांनी केवळ १ रुपयांना विकल्याची माहिती दिली.
 
...म्हणून पुस्तकाचे मालकी हक्क एक रुपयांत विकले !
 
“डॉ. भार्गवा यांनी त्यांच्या पुस्तकाचा मालकी हक्क एक रुपयांनी दिला. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की, ‘कोवॅक्सिन’ ही लस लोकांसाठी तयार केली होती. त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर आपला हक्क नसून तो केवळ सामान्य लोकांचा आहे अशी विचारधारा डॉ. भार्गवा यांची होती. शिवाय भारताने अजूनही ‘कोवॅक्सिन’ लस पेटंट केली नाही आहे, त्याचेही कारण त्यातुन मिळणारा नफा नको आहे असा अट्टहास असल्यामुळे ही कथा आम्हाला भावली आणि त्यातूनच द वॅक्सिन वॉर या चित्रपटाची संहिता लिहिली गेली”, अशी माहिती पल्लवीने दिली. तसेच, करोनाच्या सकारात्मक आठवणी कोणत्याही व्यक्तिच्या मनात नसताना त्याबद्दल कोणताही चित्रपट तयार करणे ही खरं तर जोखीमच होती. त्यामुळे त्या काळात एक सकारात्म घटना देखील घडली आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आणि त्या रिअल लाईफ हिरोंबद्दल अर्थात शास्त्रज्ञांबद्दल जगाला माहिती होण्याची गरज असल्यामुळे हा विषय लोकांच्या विस्मरणातून पुर्णपणे जाण्याआधीच हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतल्याचेही पल्लवीने सांगितले.
 
 
‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारताची पहिली स्वतःची लस बनवणाऱ्या असामान्य शास्त्रज्ञांची ही कथा २८ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.