कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, शाडूच्या मातीची मूर्ती घ्यावी असे नागरिकांना आवाहान करीत आहे. गणेश विसजर्न स्थळावर दरवर्षीप्रमाणे यंदा ही कृत्रिम तलाव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात येणार आहे. त्याठिकाणी पीओपीच्या मूर्ती आणि शाडूच्या मातीच्या मूर्तीसाठी असे दोन तलाव असतील. शाडूच्या मातीच्या मूर्तीचे विसजर्न झाल्यानंतर तलावात जमा झालेल्या शाडूची मातीचा पुर्नवापर करण्यात येणार आहे. ही शाडूची माती कुंभारांना देण्यात येणार आहे. शाडूच्या मातीचा पुर्नवापर ही संकल्पना महापालिका पहिल्यांदाच राबवित असल्याची माहिती पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची सुरूवात होते ते गणेशमूर्तीपासून. पीओपीच्या गणेशमूर्तीमुळे तसेच गणेशाच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे प्लॉस्टिक यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. हे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहान महापालिका प्रशासन व सामाजिक संस्था करीत असतात. पर्यावरणप्रेमी शाडू्च्या मातीच्या मूर्तीला पसंती देतात. पण या मूर्ती पीओपीच्या तुलनेत महाग असल्याने बहुसंख्य गणेशभक्तांचा ओढा हा पीओपीच्या मूर्तीकडे असतो. कडोंमपा प्रशासनाने यंदाच्या वर्षी गणेशमूर्तीकारांनाच पीओपीच्या मूर्ती तयार करण्यास बंदी घातली होती. मात्र कल्याण वगळता नजीकच्या परिसरातील मूर्तीकार पीओपीच्या मूर्ती तयार करतात. व या मूर्तीचे विसजर्न कल्याण मधील तलावात होणार असल्याने प्रदूषण हे कल्याणातच होणार आहे. गणेशभक्त देखील कल्याणच्या आसपासच्या परिसरात जाऊन मूर्तीचे बुकींग करीत होते. त्यामुळे कल्याणच्या मूर्तीकारांवर अन्याय होत आहे असे सांगत कल्याणमधील मूर्तीकारांना नाराजी व्यक्त केली होती.
शाडूच्या मातीची मूर्ती महाग असल्याने अनेकदा नागरिकांमध्ये शाडूची मूर्ती खरेदी करण्याची इच्छा नसते. ही मूर्ती घडविण्यासाठी वेळ अधिक लागतो. ही माती गुजरातच्या नर्मदा खो:यातून आणली जाते. त्यामुळे ही मूर्ती तयार करण्यासाठी उत्पादन कष्ट जास्त आणि खर्चिक आहे. प्रशासनकडून अनेकदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा असे आवाहान केले जाते. मात्र नागरिकांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा यासाठी कोणतेही ठोस पावले उचलताना दिसून येत नाही. पण कल्याण डोंबिवली महापालिकेने शाडूच्या मातीपासून बनविलेल्या बाप्पांच्या मूर्तीचे विसजर्न झाल्यानंतर ती माती पुन्हा कुंभारांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या काळात नागरिकांना शाडूच्या मातीच्या मूर्तीच्या किंमती देखील परवडतील आणि नागरिक पुन्हा एकदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवांकडे वळेल यात शंका नाही. कडोंमपाने शाडूच्या मातीचा पुर्नवापर या हाती घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.