पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेश दौऱ्यावर, ५० हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी

    13-Sep-2023   
Total Views |

narendra modi


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला भेट देणार आहेत. यावेळी मध्य प्रदेशात त्यांच्याहस्ते 50,700 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार आहे. त्याचवेळी छत्तीसगढमध्ये रेल्वे क्षेत्रातील महत्वाचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत.


मध्य प्रदेशात औद्योगिक विकासाला चालना देणार्‍या उपक्रमां अतंर्गत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बीना रिफायनरी येथे पेट्रोकेमिकल संकुलाची पायाभरणी पंतप्रधान करतील. ही अत्याधुनिक रिफायनरी, सुमारे 49,000 कोटी रुपये खर्चून विकसित केली जाणार आहे. येथे इथिलीन आणि प्रोपिलीनचे सुमारे 1200 किलो-टन प्रतिवर्ष उत्पादन केले जाईल. या भव्य प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि पेट्रोलियम क्षेत्रातील आकाराने छोट्या उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल.


नर्मदापुरम जिल्ह्यात ‘उर्जा आणि नवीकरणीय उर्जा निर्मिती क्षेत्र’ चे दहा प्रकल्प; इंदूरमध्ये दोन आयटी पार्क; रतलाममधील मेगा इंडस्ट्रियल पार्क; आणि मध्य प्रदेशात सहा नवीन औद्योगिक क्षेत्रांची पायाभरणी पंतप्रधान यावेळी करतील. नर्मदापुरम जिल्ह्यातील ‘उर्जा आणि नवीकरणीय उर्जा निर्मिती क्षेत्र’ 460 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केला जाईल. या प्रदेशात आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीच्या दिशेने हे एक दमदार पाऊल ठरेल. इंदूरमधील ‘आयटी पार्क 3 आणि 4’, सुमारे 550 कोटी रुपये खर्चून बांधले जाईल, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला यामुळे चालना मिळेल तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी खुल्या होतील.


रतलाममधील मेगा (औद्योगिक) इंडस्ट्रियल पार्क, 460 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधले जाईल आणि वस्त्रोद्योग, वाहन उद्योग, औषध उद्योग यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी हे एक प्रमुख केंद्र बनेल . हे औद्योगिक पार्क, दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाशी चांगले जोडले जाईल आणि संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देईल. तरुणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी निर्माण करेल. राज्यात संतुलित प्रादेशिक विकास आणि समान रोजगार संधींना चालना देण्याच्या उद्देशाने, शाजापूर, गुना, मौगंज, आगर मालवा, नर्मदापुरम आणि मक्सी येथे सुमारे 310 कोटी रुपये खर्चून सहा नवीन औद्योगिक क्षेत्रे विकसित केली जातील.


छत्तीसगढमध्ये सुमारे 6,350 कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या रेल्वे क्षेत्रातील प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केल्याने कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार आहे. छत्तीसगड पूर्व रेल्वे प्रकल्प टप्पा -I, चंपा ते जामगा दरम्यानचा तिसरा रेल्वे मार्ग, पेंद्र रोड ते अनूपपूर दरम्यानचा तिसरा रेल्वे मार्ग आणि तलाईपल्ली कोळसा खाणीला एनटीपीसीच्या लारा उच्च औष्णिक वीजनिर्मिती केंद्राशी (एसटीपीएस ) जोडणाऱ्या एमजीआर (मेरी-गो-राऊंड) प्रणालीचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. रेल्वे प्रकल्पांमुळे या प्रदेशात प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतूकीच्या सुविधा उपलब्ध होऊन सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.