‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’मध्ये (MDL) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या विनाशिकेचे (युद्धनौकेचे) जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते शुक्रवार, दि. १ सप्टेंबर रोजी करण्यात आले. त्यानिमित्ताने ‘महेंद्रगिरी’ युद्धनौकेचे सामरिक महत्त्व उलगडून सांगणारा हा लेख...
‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रकल्प ‘१७ ए’अंतर्गत सातवी (निलगिरी श्रेणीतील) आणि ‘एमडीएल’कडून बांधण्यात आलेली चौथी विनाशिका आहे. या युद्धनौकेच्या जलावतरणाच्या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे, नौदलपमुख अॅडमिरल आर. हरीकुमार आणि ‘एमडीएल’ची अनेक मंडळी उपस्थित होती.
या ‘निलगिरी’ श्रेणीतील ’महेंद्रगिरी’ विनाशिकेत बसविण्यात आलेली ७५ टक्के उपकरणे आणि प्रणाली, २०० सूक्ष्म व लघु आणि मध्यम ७५ टक्के भारतीय उद्योजगांकडून खरेदी करण्यात आली आहेत. बिगर भारतीय भागांमध्ये रडार व शस्त्र प्रणालींशी निगडित सामग्री, पंखांचे काही भाग, बॅटरी यांचा समावेश आहे. ही बाब खरोखर प्रशंसनीय आहे. कारण, अलीकडच्या काळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि जागतिक पातळीवरील उंचावलेले स्थान, यातूनच भारताच्या सागरी हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी आधुनिक नौदलाची मदत उपलब्ध होणार आहे.
’महेंद्रगिरी’ विनाशिकेची लांबी १४९ मीटर व रुंदी १७.८ मीटर आहे. तिचा उच्चतम वेग २८ नॉट इतका राहील. ही विनाशिका ‘१७ ए’ प्रकल्पातील सातवी आणि शेवटची ‘स्टेल्थ फ्रिगेट’ आहे. या प्रकल्पासाठी माझगाव डॉक येथे चार विनाशिका बांधण्यात येणार आहेत. याच प्रकल्पातील उर्वरित विनाशिका याच कोलकाता येथील गार्डन रिच शिपबिल्डर्स आणि इंजिनिअर्स (GRSE) येथे बांधण्यात येणार आहेत. ’महेंद्रगिरी’ या विनाशिकेची ओढण्याची शक्ती ६ हजार, ६७० टन इतकी आहे. ही भारताची प्रथमचीच स्पृहणीय कामगिरी (milestone) म्हटली पाहिजे. याआधी या ‘१७ ए’ प्रकल्पासाठी साहवी विनाशिका ‘विंध्यगिरी’चे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दि. १७ ऑगस्टला उद्घाटन झाले होते.
नौदलाच्या ताफ्यात आल्यानंतर ’महेंद्रगिरी,’ असे नाव धारण करणारी ही ‘निलगिरी’ श्रेणीतील सातवी नौका आहे. माझगाव डॉक येथे ती समुद्रात प्रथम उतरवली जात आहे. नौदलाला अत्याधुनिक ‘फ्रिगेट्सची’ आवश्यकता असल्याने, अशा सात युद्धनौका दोन कारखान्यांत बांधल्या जात आहेत. चार युद्धनौका ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’मध्ये आणि तीन युद्धनौका कोलकात्याच्या ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स इस्टाब्लिशमेंट लिमिटेड’मध्ये (GRSE) तयार होत आहेत. यामध्ये माझगाव डॉकच्या कामाचा वेग अधिक आहे.
नौदलाच्या ताफ्यात सध्या ‘शिवालिक’ श्रेणीतील तीन ‘फ्रिगेट्स’ आहेत. या युद्धनौका जवळपास २० वर्षे जुन्या असल्याने त्या ‘नीम स्टेल्थ’ क्षमतेच्या आहेत. त्यामुळेच नौदलाला अत्याधुनिक पूर्णपणे स्टेल्थ व अधिक घातक, अशा ‘फ्रिगेट्स’ची गरज आहे. त्यासाठीच ‘निलगिरी’ श्रेणीतील या युद्धनौकेची आवश्यकता आहे. ’ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र, हे या युद्धनौकेचे वैशिष्ट्य आहे.
ताफ्यात आठ क्षेपणास्त्रे
जलावतरणानंतर नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्याआधी, या युद्धनौका ’ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राने सज्ज होणार आहेत. ४०० किमी लांबीपर्यंत मारा करू शकणारी, अशी आठ क्षेपणास्त्रे ’महेंद्रगिरी’ विनाशिकेवर असतील. उभ्या प्रकाराने मारा करून ही क्षेपणास्त्रे आकाशातील व जमिनीवरील, अशी दोन्ही लक्ष ती टिपू शकतील. याखेरीज समुद्री पृष्ठभागावर मारा करू शकणारी ३२ बराक क्षेपणास्त्रेदेखील त्यावर असतील. अन्य मुख्य रडार एमएफ स्टार, अत्याधुनिक संवाद प्रणाली, विविध प्रकारच्या तोफांनी (७६ मिमी मुख्य गन, दोन ३० मिमी एके ६३० मी अँटी एअर क्राफ्ट आर्टिलरी प्रणाली, दोन टॉर्पेड ट्यूब्स असणारी, ही युद्धनौका सज्ज केली जाणार आहे.
प्रकल्प ‘१७ ए’ - फ्रिग्ट्स बांधणे
हा प्रकल्प ‘१७ ए’ ची फ्रिगेट्स (शिवालिक वर्ग) यानंतरचा बांधणीकरिता हातात घेतला आहे. ’१७ ए’मध्ये स्टेल्थ प्रणालीमध्ये सुधारणा करणे, आधुनिक क्षेपणास्त्र व सेन्सॉर वापरणे आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली वापरणे इत्यादी सुधारणा केल्या जाणार आहेत. प्रकल्प ‘१७ ए’च्या पहिल्या पाच विनाशिकांची बांधणी २०१९-२२ या काळात झाली. या ’१७ ए’ प्रकल्पातील सर्व विनाशिकांची बांधणी प्रत्येकी वेगवेगळ्या स्थितीमध्ये तयार होत आहे व संपूर्ण ’१७ ए’ प्रकल्पाचे काम २०२४ ते २०२६ या काळापर्यंत पुरे होईल, असा नाविक दलाला विश्वास आहे, तरीपण अलीकडे तयार होत असलेली ‘महेंद्रगिरी’ विनाशिकेची बांधणी हिंद महासागरात (IOR) स्वतःचे संरक्षण आत्मनिर्भरता बाळगणारी व टक्कर देण्याची जरुरी आहे. कारण, चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी-नेव्ही’कडून (PLAN) या भागात देश-विघातक हालचाली सुरू आहेत. त्याकडे कदापि दुर्लक्ष करुन चालणार नाही.
युद्धनौकेच्या बांधणीतील माझगाव डॉकचे योगदान
विक्रमी वेळेत अखेरच्या अत्याधुनिक ‘फ्रिगेट’चे जलावतरण केलेल्या माझगाव डॉकमधील युद्धनौकेच्या निर्मितीत महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय आहे. दि. १ सप्टेंबर रोजी झालेल्या ’महेंद्रगिरी’ या ‘फ्रिगेट’ प्रकारातील युद्धनौकेच्या उभारणीसाठी काम करणार्या चमूत निम्म्याहून अधिक कर्मचारी मराठी होते. युद्धनौकेचे जलावतरण होताच ‘भारतमाता की जय’, या गजरासह ’गणपती बाप्पा मोरया’, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गर्जना ऐकावयास मिळाल्या.
माझगाव डॉक
हा कारखाना स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. या कारखान्याने आजवर अनेक युद्धनौका आणि पाणबुड्यांची बांधणी नौदल व तटरक्षक दलासाठी निर्मिती केली आहे. हा कारखाना मुंबईत असल्याने प्रथमपासूनच सर्वसामान्य मुंबईकरांनी या युद्धनौकेच्या उभारणीत काम केले आहे. दरम्यानच्या काळात कंपनीने कर्मचार्यांना स्थायी करण्याऐवजी कंत्राटी सेवेला प्राधान्य दिले व त्यामुळे अस्सल मुंबईकरांचा टक्का कमी होत गेला. परंतु, ’महेंद्रगिरी’च्या उभारणीवेळी मराठी टक्का ठळकपणे दिसून आला.
पाच भागांच्या जोडणीतून ’महेंद्रगिरी’ साकार
‘महेंद्रगिरी’ युद्धनौकेचे भाग गुजरातमध्ये तयार झाले आहेत. माझगाव डॉकमध्ये त्यांची केवळ जोडणी झाली. यानंतरही अन्य सामग्री बसविण्यासाठी किमान दोन वर्षे जातील. सध्या ही युद्धनौका केवळ साधे जहाज आहे. पुढील काळात त्यात इंजिन, नौकेला पुढे ढकलणारे पंख (प्रॉपेलर), रडार प्रणाली, शस्त्रसामग्री इत्यादी बसविले जातील.
युद्धनौकेच्या उभारणीत विविध विभाग कार्यरत असतात. नियोजन, सुट्टे भाग खरेदी करण्याबाबत व्यवसाय, आराखडा चमू, प्रत्यक्ष बांधकाम चमू, देखरेख चमू, सामग्री चाचणी, दर्जा सुधारणा, देखभाल इत्यादी विभागांचा त्यात समावेश असतो. प्रत्येक विभागात सरासरी २५ ते ३० कर्मचारी वा अधिकारी असतात. त्यानुसार सर्व कर्मचार्यांची संख्या सरासरी १३०च्या घरात जाते. विशेष म्हणजे, ’महेंद्रगिरी’च्या जलावतरण प्रकल्पासाठीच्या उभारणीत सुमारे ७० कर्मचारी-अधिकारी मराठी होते.
मुंबईकरांचे कौतुक
“मुंबईसारखे शहर दुसरीकडे कोठेच नाही. मुंबईकर सातत्याने चांगली कामगिरी करीत असतात. त्यामुळेच माझगाव डॉक सारखा कारखाना २५० वर्षे डौलाने उभा आहे,“ असे जगदीप धनखड त्यावेळी म्हणाले.
’महेंद्रगिरी’च्या जलावतरणानंतर नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरीकुमार यंच्या हस्ते माझगाव डॉकमधील चार कर्मचार्यांचा सर्वोत्तम कामासाठी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक (अभियांत्रिकी) स्वप्निल पाटील व स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर रघुनाथ कुंभार या मराठी कर्मचार्यांचा समावेश होता.
सागरी व्यवस्थापन तणावात
हिंदी महासागरातील सध्याची भूराजकीय व सुरक्षेची स्थिती पाहता, नियमांवर आधारित शांतता मार्गावरील सागरी व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. परंतु, हे व्यवस्थापन सध्या तणावात आहे. अशा स्थितीत सातत्याने विकासाकडे मार्गक्रमण करणार्या आपल्या देशाच्या समुद्री हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी नौदलाच्या खांद्यावर आहे. त्यासाठीच अत्याधुनिक नौदलाची गरज आहे. उपराष्ट्रपतींनी आर्थिक स्थरावर भक्कम होत असलेल्या आपल्या देशासाठी सुरक्षित समुद्र ही सामरिक गरज असण्यावर भर दिला. भारताचा ९० टक्के व्यापार आज समुद्रातून होतो. हिंदी महासागरातील भारताची भूमिका ही सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे, असे ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.