जपान सध्या त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पातील किरणोत्सारी पाणी समुद्रात सोडण्याच्या तयारीत आहे, ज्याला खुद्द जपानी नागरिकांकडून जोरदार विरोध सुरू झाला. त्यानिमित्ताने जपानकडे हे किरणोत्सारी पाणी कुठून आले आणि ते समुद्रात का सोडले जाणार आहे, हे जाणून घेऊया.
२०११ साली ९.० रिश्टर स्केलच्या भूकंपाने जपानमध्ये आलेल्या त्सुनामीने हाहाकार माजवला. त्सुनामीचे पाणी जपानच्या फुकुशिमा अणुप्रकल्पामध्ये शिरल्याने प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. चर्नोबिलनंतरचा हा सर्वात मोठा आण्विक अपघात होता. यामुळे अनेकांना विस्थापित व्हावे लागले. रिएक्टरच्या ‘कोर‘मध्ये पाणी शिरल्याने तो वितळण्यास सुरुवात झाली. यामुळे आसपासच्या परिसरात त्याचे भीषण परिणाम जाणवू लागले.
‘रिएक्टर कोर’ वितळू नये आणि त्याचा प्रभाव कमी व्हावा, यासाठी याठिकाणी थंड पाणी भरण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी कित्येक टन पाण्याचा वापर करण्यात आला. ’रिएक्टर कोर‘ला थंड ठेवण्यासाठी दररोज जवळपास १७० टन पाणी वापरले जाते. गरम झालेले पाणी तसेच ठेवता येत नाही. त्यामुळेच वारंवार थंड पाण्याची गरज लागते. गरम झालेले पाणी किरणोत्सारी असल्याने ते मानवासाठी हानिकारक असते. त्यामुळेे हे पाणी साठवण्यासाठी जपानकडे १ हजार, ४६ टाक्या आहेत. या टाक्यांमध्ये सध्या १ हजार, ३४३ दशलक्ष क्युबिक मीटर पाणी आहे. हे इतके पाणी आहे की, ज्यामुळे ऑलिम्पिकमधील २०० ते ३०० जलतरण तलाव भरले जाऊ शकतात. हे पाणी किरणोत्सारी असल्याने मानव त्या पाण्याच्या संपर्कात आल्यास शारीरिक हानी होऊ शकते.
पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे आणि साठवण क्षमता मात्र मर्यादित आहे. त्यामुळे या पाण्याचं करायचं काय, असा प्रश्न जपानसमोर उभा ठाकला. त्यावर उपाय म्हणून आधी साठवलेले किरणोत्सारी पाणी समुद्रात सोडण्याच्या दिशेने पावले उचलण्यास जपानने सुरुवात केली. हे पाणी समुद्रात सोडण्यासाठी जपानने विशेष योजना आखली. हे दुषित पाणी शुद्ध करून त्यातील घातक किरणोत्सारी पदार्थ वेगळे केले जातील. त्यानंतर हे पाणी प्रशांत महासागरामध्ये सोडले जाणार आहे. उन्नत तरल संस्करण प्रणालीच्या माध्यमातून हे पाणी शुद्ध केले जाणार आहे. या पाण्यातून ६२ किरणोत्सारी पदार्थ वेगळे केले जातील. अडचणीची बाब म्हणजे, या प्रणालीद्वारे पाण्यातील ट्रिटियम पूर्णतः शुद्ध करणे शक्य नाही. त्यामुळे पाणी सुरक्षित करण्यासाठी वारंवार शुद्ध करून पाण्यातील ट्रिटियम कमी केले जाईल, जेणेकरून मानवाला त्यामुळे हानी पोहोचणार नाही. जपानची अणू संस्था आणि संयुक्त राष्ट्राच्या ‘आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थे’ने या प्रक्रियेला मंजुरी दिल्याने जपानचा समुद्रात किरणोत्सारी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, ही प्रक्रिया इतकी सुरळीत आणि सुरक्षित असताना त्याला जपानी नागरिक विरोध का करीत आहेत, हे समजून घेणे गरजेचे. ट्रिटियमवर अधिक लक्ष केंद्रित केल्यास अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकते. शुद्धीकरणानंतरही या पाण्यात आयोडिन, कोबोल्ट, रुथेनियम, एंटिमनी यांसारखे गंभीर पदार्थ तसेच राहू शकतात. जपानमधील पर्यावरण आणि वातावरणावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. समुद्री पर्यावरणीय साखळीही धोक्यात येऊ शकते. जपानमधील मत्स्य व्यवसायदेखील संकटात सापडण्याची शक्यता आहे. समुद्रातून मासे आणणे आणि ते बाजारात विकणे मच्छीमारांसाठी अडचणीचे ठरेल.तसेच चीनने देखील जपानच्या या समुद्री खाद्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
चीननंतर आणखी काही देश जपानच्या समुद्री खाद्यावर बंदी घालू शकतात. या अन् अशा कारणांमुळे जपानमधील मानवाधिकार कार्यकर्ते आणि पर्यावरणीय संस्थांद्वारे या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. एकीकडे आण्विक संकट थोपवायचे, तर दुसरीकडे किरणोत्सारी पाणी समुद्रात सोडण्याच्या निर्णयाला होणारा विरोध; एकूणच जपानची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी काहीशी अवस्था. दहावीत ‘विज्ञान शाप की वरदान?’ असा प्रश्न नेहमी विचारलो जातो, तो का, हे जपानच्या सद्यस्थितीवरून पुरेसे स्पष्ट व्हावे.
७०५८५८९७६७