कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात ३३ वर्षं वनस्पतीशास्त्र शिकवून एक नवी जागृत पिढी घडवणार्या प्राध्यापक, संशोधक, संवर्धक, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग यादव यांचा हा विलोभनीय प्रवास...
'काम म्हणजेच माझा गुरू’ असं म्हणणार्या, प्राध्यापकी, संशोधन आणि संवर्धनाच्या कामात मोलाचा वाटा उचलणारे वनस्पतीशास्त्रातील एक मोठं नाव म्हणजे डॉ. श्रीरंग रामचंद्र यादव. सातार्यातील साईकडे या छोट्याशा गावात ४०-५० जणांच्या मोठ्या एकत्रित कुटुंबात १९५४ साली त्यांचा जन्म झाला. शेतीवर अवलंबून असलेल्या आणि हातावर पोट असणार्या परिस्थितीतच कामं करीत त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. ग्रामीण भागात त्याकाळी देवळांत भरणार्या शाळांमध्ये सातवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर माध्यामिक शिक्षण त्यांनी तळमावले हायस्कूलमध्ये पूर्ण केलं.
मुळातच गरीब परिस्थिती त्यातही मार्गदर्शन करायला कोणी नाही, असे असताना अकरावीत एबीसीडी शिकून पाठ केलेले यादव सर पुढे विद्यार्थ्यांचे अमूल्य मार्गदर्शक झाले. ‘बीएससी’साठी त्यांनी पुढे कराडच्या सायन्स कॉलेजला प्रवेश घेतला आणि उत्तम यश संपादन करीत ‘एमएससी’ करण्यासाठी मुंबईतील रुईया महाविद्यालयात प्रवेश मिळवला. ‘एमएससी’ पूर्ण करुन रुईया महाविद्यालयातच त्यांनी औषधी वनस्पतींवर त्यांची ‘पीएचडी’ पूर्ण केली. १९८३ साली ‘पीएचडी’ पूर्ण केलेल्या या उच्चशिक्षित तरुणाने अलिबागच्या महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी पत्करली.
पण, संशोधनात रस असूनही त्यासाठी त्यांना वेळ मिळत नव्हता. म्हणून त्यांनी मुंबईतील मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयात शिकवणे सुरू केले. त्यानंतर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात त्यांनी नोकरी मिळवली. पण, लगेचच १९९२ साली गोवा विद्यापीठात कामासाठी जावे लागले, तर २००२ ते २००५ या कालावधीत दिल्ली विद्यापीठामध्ये जाऊन शिकवण्याची संधीही अनायासे चालून आली. पण, ग्रामीण भागातील आपल्या विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे, आपल्या ज्ञानाचा त्यांना फायदा झाला पाहिजे, या विचाराने त्यांची पावले परत शिवाजी विद्यापीठाकडे वळली.
२००५ पासून शिवाजी विद्यापीठातील अध्यापनाला पुन्हा सुरुवात करून, २०१६ म्हणजे अगदी निवृत्त होईपर्यंत त्यांनी तिथेच काम केले. ‘वनस्पतींची शास्त्रीय वर्गवारी’ हा एक महत्त्वाचा विषय असल्यामुळे निवृत्तीनंतरही ते अजूनही विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देत आहेत. 'INSA' 'Indian National Science Academy', 'NASI' åhUOoM 'National Academy of Sciences INDIA' या दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. ‘इन्सा’ संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि ‘नासी’ या संस्थेत ‘फेलो रिसर्चर’ म्हणून ते काम करीत आहेत. त्याचबरोबर ‘महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये कार्यरत आहेत.
१९८५ साली वनस्पतींचे वर्गीकरण (Taxonomy of Angiosperms) हा वेगळा विषय शिवाजी विद्यापीठात यादव यांनी सुरू केला. कोल्हापुरात आढळणार्या सपुष्प वनस्पतींचे दस्ताऐवजीकरण ‘फ्लोरा ऑफ कोल्हापूर’ या पुस्तकात २००२ साली त्यांनी केले. यामध्ये त्यांनी तब्बल २ हजार, २३० प्रजातींची नोंद केली. याबरोबरच डॉ. श्रीरंग यादव यांनी सात ते आठ पुस्तके लिहिली आहेत. वनस्पतीशास्त्रातलं हे काम पाहून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शिवाजी विद्यापीठातील या विभागाला ‘ग्रास सिस्टमॅटिक्स’ हे नाव दिलं. याच विभागांतर्गत पुढे ‘ग्रासेस ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘नो युअर ग्रास जनरा थ्रू हॅण्डलेन्स’ या दोन पुस्तकांची निर्मिती करण्यात आली. वाघ वाचवायचे असतील, तर आधी गवत वाचवायला हवे, या भूमिकेतूून त्यांनी आधी गवत वाचवा, मग वाघ वाचतील. या मोहिमेची मुहूर्तमेढ यादव यांनी रोवली.
पश्चिम घाटातील जैवविविधता संरक्षित आणि संवर्धित करण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या ‘बायोडाव्हर्सिटी मॅपिंग’च्या प्रकल्पातही त्यांनी सहसंशोधक म्हणून कामगिरी बजावली आहे. दुर्मीळ, संकटग्रस्त आणि धोक्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्या अनेक वनस्पतींच्या संवर्धनाचे काम डॉक्टरांनी केले. त्यासाठी त्यांनी शिवाजी विद्यापीठात लिड बॉटनिकल गार्डन तयार करुन त्यामध्ये १००हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे एक वनस्पती वाटिका(arboretum) तयार केले. १०० प्रदेशनिष्ठ वनस्पती एकाच ठिकाणी लावण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग होता. याव्यतिरिक्त या जैवविविधता उद्यानात १ हजार, २००हून अधिक प्रजातींची लागवडही करण्यात आलेली आहे. यावरच आधारित वनस्पतींच्या सुकलेल्या प्रजातींचा संग्रह असलेल्या शिवाजी विद्यापीठातील हर्बेरियमला जागतिक ओळख प्राप्त झाली आहे.
डॉ. श्रीरंग यादव यांच्या नावावर असलेली पहिली नव्या प्रजातीची नोंद म्हणजे ‘अपॉनेजेटा सातारेन्सीस.’ यानंतर ‘ड्रायथुरिया कोंकणेन्सीस’, ‘क्रायनम मल्बारिकम’, ‘अपॉनेजेटॉन नतेशी’ यांसह ८० नव्या वनस्पती प्रजातींचा शोध त्यांनी लावला आहे. त्यांच्या या लक्षणीय कामगिरीची नोंद घेत शिवाजी विद्यापीठाचा ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’, ‘प्रोफेसर सी. व्ही. शिवराजन सुवर्ण पदक’, ‘जानकी अंमल पुरस्कार’ यांसह इतर १५ पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. “मानवाचं भांडवल पैसे नाही, तर आपल्याकडे असलेली समृद्ध जैवविविधता आहे, त्यामुळे ही वाचली तरच आपण वाचू,” असा मोलाचा सल्ला ते तरुणांना देतात. जगण्यासाठीचा प्राणवायू, खाण्यासाठीचा भाजीपाला आणि औषधांसाठी आवश्यक वनस्पती या तिन्ही नितांत गरजेच्या गोष्टी वनस्पतींमधूनच येतात. त्यामुळे आपण त्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते सांगतात. ४० वर्षांहून अधिक काळ अभ्यास आणि अनुभवसंपन्न असलेल्या या निष्ठावंत प्राध्यापक आणि वनस्पतीशास्त्रज्ञाला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!