प्रेक्षकांच्या मनात थेट घर करणारं मनोरंजनाचं माध्यम म्हणजे मालिका. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्यात आणि मनात जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान पोहोचली. तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत ती मुक्ता ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
दोन वर्ष मालिकांपासून दूर का होती? असा प्रश्न विचारला असता तेजश्री म्हणते की, “मी माझी कोणतीही मालिका संपल्यानंतर एका वर्षांचा गॅप घेतेच. त्याचं कारण असं की मालिका म्हटली की ती सलग दोन किंवा तीन वर्षं चित्रीकरण सुरू असतं. त्यामुळे स्वत:ला वैयक्तिक वेळ देण्यासाठी आणि त्या व्यक्तिरेखेतून बाहेर पडत नव्या व्यक्तिरेखेसाठी, नव्या प्रोजेक्टसाठी तयार होण्याचा मला वेळ हवा असतो. म्हणून मी तो वेळ घेते.” पुढे ती असेदेखील म्हणाली की, “नातेसंबंधांवर आधारित मालिका किंवा चित्रपटांचा भाग होणं मला जास्त आवडतं, त्याचं कारण असं की, ज्यावेळी आम्ही कलाकार एखादं पात्र साकारतो, त्यावेळी ते आपल्या समाजात आजूबाजूला वावरणारी माणसं असतात.
काहींचा स्वभाव आपल्याला भावतो, तर काहींचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला नवी उमेद देऊन जातो आणि या सगळ्यांची पुंजी एकत्र करत आम्ही मालिका किंवा चित्रपटांतील कलाकार त्या व्यक्तिरेखा मांडत असतो आणि प्रेक्षकांना त्यांच्या घरातील किंवा त्या पात्रांमधील साधर्म्य भावते, हेच खरं तर कारण आहे की मला नातेसंबंधांवर आधारित कोणत्याही प्रोजेक्टचा भाग होणं आवडतं.”
प्रत्येक माध्यमांचा स्वतंत्र असा प्रेक्षकवर्ग आहे आणि त्या माध्यमांमध्ये कलाकारांनी काम करण्याचे तंत्रदेखील फार वेगळे आहे, याचे उदाहरण देत तेजश्री म्हणाली, “नाटकांमध्ये प्रेक्षक आणि कलाकारांमध्ये कुठलीही भिंती नसते. तिथे रंगभूमीवर सादर होणारी प्रत्येक कलाकृती प्रेक्षक समोरासमोर पाहात त्याला सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद देत असतात, तर मालिका या रोज घरच्या टीव्हीवर लागत असल्यामुळे त्यांतील कलाकार हे दररोज भेटीला येतात आणि त्यांच्या घरचे सदस्य त्यांना वाटू लागतात आणि सर्वांत शेवटचे पण स्वप्नवत असलेले माध्यम म्हणजे चित्रपट, ज्यातील पात्र, प्रसंग यांचा दैनंदिन जीवनाशी संबध नसला तरीही प्रेक्षक जोडले जातात आणि मनोरंजन अविरत सुरू राहते.”
तेजश्री प्रधानची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सोमवार, दि. ४ सप्टेंबरपासून ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
रसिका शिंदे-पॉल