सर्व भारतीय शास्त्रांचे आधारशास्त्र म्हणजे योगशास्त्र होय. सांख्य दर्शनानुसार सारी सृष्टी पंचमहाभूतांच्या क्रमागत आविष्काराने उत्पन्न झाली आहे. प्रत्येक वस्तूत, मग ती सजीव असो की निर्जीव असो, पंचमहाभूतांचा अविष्कार असतो. पंचतत्वांशिवाय कोणतीच वस्तू साकारू शकत नाही आणि म्हणून प्राप्त होऊ शकत नाही. भारतीय संगीत रंजकतेला जेवढे स्थान देते, त्यापेक्षाही विधायकतेला अधिक स्थान देते. कोणतीही घटना वा वस्तू प्राप्त होण्याकरिता पाचही तत्वांची आवश्यकता असतेच. गायन केल्यावर घटना वा वस्तू प्राप्त झाल्याच पाहिजेत.
वस्तू हीदेखील एक घटनाच आहे. म्हणून पंच तत्वांना पोषक असे कमीत कमी पाच स्वर गायनात असणे आवश्यक आहे. त्याशिवाय राग-रागिण्यांद्वारे घटनाप्राप्ती होऊ शकणार नाही. हे महान तत्व भारतीय संगीतकारांनी पूर्वीच जाणून ठेवले होते व तद्नुसार त्यांनी राग-रागिण्यांची घटना प्राप्तीनुसार प्रकृती तयार केली. केवळ स्वर संगती म्हणजे राग-रागिण्या नव्हेत. कोणतेही स्वर एकामागे एक जुळवावे व स्वर वैचित्र्यातून रागरागिण्या उत्पन्न कराव्यात असा छांदिष्ट स्वभाव भारतीय संगीतशास्त्राचा नाही. आजच्या भारतीय संगीतात मात्र हे धोरण व धारणा नाही. काही गायक अनवट राग तयार करण्यात व गाण्यात धन्यता मानतात,
मग त्यांनी गायलेला राग भारतीय संगीतशास्त्राच्या वरील प्रकारे घटना प्राप्ती संकेतानुसार आहे की नाही याचा ते मुळीच विचार करीत नाहीत. स्वरामागे स्वर लावून स्वरवैचित्र्य उत्पन्न करावे, अशी आधुनिक संगीतकारांची प्रवृत्ती दिसते. पण असे करताना राग निर्मितीच्या मागे घटनाप्राप्तीचे एक महान तत्व गोवले आहे, याचे त्यांना भान राहत नाही आणि साहजिकच आहे. भारतीय जीवनाच्या प्रत्येक कप्प्यात योगशास्त्राचा मूलाधार आहे, याची अनेकांना कल्पना नाही. त्यामुळे वैद्यकी करताना, चित्रे काढताना, शिल्प तयार करताना, ज्योतिष सांगताना किंवा संगीताचा अभ्यास व स्वीकार करताना ते-ते जीवन योगशास्त्राला धरून नटविले पाहिजे व पूर्ण केले पाहिजे, याची कोणालाच कल्पना नसते. म्हणून नवराग निर्मिती केवळ स्वरवैचित्र्याला प्राधान्य देते. वस्तुनिष्ठतेला नाही.
आपल्याला कोणती घटना पाहिजे यावर रागरागिण्यांची रचना अवलंबून असते. असल्या घटना प्राप्तीच्या धोरणाने राग-रागिण्या तयार केल्या जायला पाहिजेत. पूर्वी तशा त्या असत. सातांच्या वर स्वर नाहीत. पण, घटना अनेक असू शकतात. या धोरणाप्रमाणे घटनाप्राप्ती होण्याकरिता योगशास्त्रानुसार पंचतत्वांच्या पोषक असे कमीतकमी पाच स्वर असणे आवश्यक आहे. भारतीय संगीताची ही विधायकता लक्षात न आल्याने आज दीपक राग, मेघमल्हार, कांभोजी (खमाज), वसंत फुलविणारा राग, पूर्ण वैराग्य उत्पन्न करणारा मारुह (मारवा) राग इत्यादी रागांची विधायकता पटविणारे राग कल्पनांचा विलास म्हणून समजले जातात. ज्यांना त्यात तत्वतः शक्यता वाटते, त्यांनाही त्याचे नीट गायन न करता आल्याने व फलश्रुती पदरी न पडल्याने काल्पनिकतेत अधिकच भर पडते. पंचतत्वांना साकारता येईल तोच राग व तीच रागिणी! ‘राग’ या शब्दामधेच चित्ताची वृत्ती आहे.
पंचतत्वे हा चित्ताचा विषय असल्याने पंचतत्त्वांच्या योग्य मिलनाशिवाय घटनाप्राप्तीच होणार नाही. चित्ताला कोणतीच वृत्ती नसते, त्या वेळेस चित्त स्थिर म्हणजे प्रकृतीरहित असते. ही निर्विकल्प अवस्था होय. असल्या निर्विकल्प अवस्थेत ज्ञानेश्वर माऊलीप्रमाणे सर्वांनाच प्रश्न पडेल की, ’अगा जे जाहलेचि नाही। त्याची वार्ता पुसतोसि काई॥’ असल्या निर्विकल्प अवस्थेतघटनाप्राप्ती नसते. घटनाप्राप्ती सविकल्प, सविचार व सविकार अवस्थेत होते. असल्या सविकार अवस्थेलाच ’राग’ म्हणतात. रागासह त्याची रागिणीही आलीच. राग-रागिण्यांची रुपात्मक वर्णने व त्यातून लाभणारी घटनाफले या कल्पना नसून एक वैज्ञानिक सत्य आहे. ते विज्ञान आम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. कल्पना म्हणजे शास्त्र नव्हे. अनुभूती व त्यावर आधारित बुद्धिचापल्य यातून शास्त्र उत्पन्न होत असते.
यावरून हे स्पष्ट आहे की, पंचमहाभूतांचे प्रत्यक्ष अधिष्ठान असणार्या संगीताला पंचमहाभूतांच्या पंचगुण विकासाचे प्रत्यक्ष अधिष्ठान व अस्तित्व असायला पाहिजे. आकाशातत्वाचा नाद, वायूतत्वाचा स्पर्श, तेजसतत्वाचे रुप, आपतत्वाची चव व पृथ्वीतत्वाचा गंध असल्या पंचतत्वाभिमानी संगीताला असायलाच हवेत. पंचतत्वाचा अविष्कार करणारे गायन गायल्याबरोबर प्रत्यक्ष घटनाप्राप्ती झालीच पाहिजे, हे यावरून सिद्ध होते. संगीताची ही विधायकता भारतीय संगीतकारांना माहीत होती. त्यानुसार त्यांनी आपल्या संगीतशास्त्राची रचना कशी केली, याचा विचार होणे आवश्यक आहे.
वादी-संवादी
लेखकाचा पाश्चात्य संगीताचा मुळीच अभ्यास नाही. परंतु,एक गोष्ट मात्र निश्चित वाटते की, भारतीय संगीतात वादी-संवादीचा जितका मूलगामी विचार झाला तेवढा तो अन्य संगीतात झाला नसावा. प्रत्येक रागाला जसे कमीत कमी पाच स्वर आवश्यक आहेत, तसेच त्याला वादी-संवादीही आवश्यक आहेत. एखादा स्वर वाजविला की, षड्ज मध्यम न्यायाने त्याचा संवादी स्वर त्यातून निनादलाच पाहिजे. जो स्वर अंगभूतरित्या येणारच, त्याचे स्थान रागात असायलाच हवे. मुख्य स्वर म्हणजे वादी, तर त्याची कंपन प्रतिक्रिया म्हणून त्याचा षड्जमध्यम कंपनाचा संवादी स्वर रागात असायलाच पाहिजे. ज्यांचे वादी ’सा’ ते ’म’पर्यंत असतात, त्यांचे संवादी स्वर ’म’ ते ’सां’पर्यंत असतात व ज्यांचे वादी स्वर ’म’ ते ’सां’पर्यंत असतात, त्यांचे संवादी स्वर ’सा’ ते ’म’ पर्यंत असतात. सकाळचे राग व रात्रीचे राग याच दृष्टीने साकारले आहेत.त्या विभागणीतून आपले स्वतंत्र अस्तित्व वर काढणारे राग म्हणजे संधिकाल राग होत. त्यात कोमल ऋषभ व त्याचा संवादी स्वर कोमल धैवत असणे आवश्यक आहे. त्यातही उत्तरांगप्रधान व पूर्वांगप्रधान राग आहेतच.
पण, या संधिकालप्रधान रागांनाही वादी-संवादीचे नियम लागू आहेतच. वादीशिवाय संवादी नाही व संवादी शिवाय वादी नाही, अशी संगीताची नैसर्गिक प्रकृतीच आहे. म्हणून भारतीय संगीताला षड्ज मध्यम न्यायाने वादी-संवादी असलेच पाहिजेत. पण ते वादी-संवादी षड्ज मध्यम कंपनावर असले तरच घटनाप्राप्ती होऊ शकेल, अन्यथा नाही. वरील नियमाला एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे मारवा रागाचा. मारवा रागाचे संस्कृत नाव ’मारुह’ असे आहे. मारवा रागाच्या उत्पत्तिविषयी अनेक संगीतज्ञ अनेक मते प्रतिपादन करताना दिसतात. कोणी म्हणतात, तो मालवा देशातील राग असल्याने त्याला मालवा किंवा मारवा म्हणतात. कोणी आणखी काही उत्पत्ती लावतात. पण, लेखकाच्या मते, त्या रागाचे मूळ नाव मारुहच असावे. याचे विश्लेषण पुढील लेखात पाहू. (क्रमश:)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे
९७०२९३७३५७)