मुंबई : “हल्लीचा जमाना समाजमाध्यमांचा आहे. तरुण आणि तरुणींकडून मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर वेळ घालवला जातो. परंतु, याच समाजमाध्यमांमधून ‘लव्ह जिहाद’ची विषपेरणी मोठ्या प्रमाणात सुरू असून विद्यार्थिनींनी सावध राहण्याची गरज आहे,” असे सांगत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी उपस्थितांना ‘लव्ह जिहाद’चा धोका टाळण्यासाठी काय करावे, यासंबंधी मार्गदर्शन केले. ‘सुविद्या प्रसारक संघा’तर्फे दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मंगूभाई दत्तानी विद्यालय-महाविद्यालय, बोरिवली (पू) येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ सभेअंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगिता साळवी यांनी ‘किशोरवयीन मुलं-मुली आणि ‘लव्ह जिहादचा धोका’ या विषयावर विद्यार्थिनींशी आणि शिक्षकांशी संवाद साधला.
समाजमाध्यमे आणि इतरही माध्यमांतून किशोरवयीन मुलामुलींशी संपर्क साधत, त्यांना बळी बनवले जाते. तसेच, या वयातील स्वप्न आणि वास्तव, ‘लव्ह जिहाद’, त्याचे भोगावे लागणारे दुष्परिणाम याविषयी योगिता साळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत मांडले. यावेळी मंगूभाई दत्तानी शाळेच्या मुख्याध्यापिक डॉ. सुनीता कामते, उपमुख्याध्यापक संजय मोरे, ज्योती आपटे, अर्चना काटे, प्रतिभा पाटगुडे, राजेंद्र गोसावी, संजय सार्जे आदी सर्व शिक्षकगण आणि पालकही उपस्थित होते. सभेसाठी पराग कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला.