दृश्यकलाकारांच्या कलासृजनाला उचित व्यासपीठ मिळायला हवं असतं. अशा वेळी जर समूह प्रदर्शन आयोजित केलेले असेल, तर मात्र त्या दृश्यकलाकाराला प्रोत्साहनच मिळतं. मुंबईमध्ये ‘आर्टिवल फाऊंडेशन’ ही एक संस्था गेली काही वर्षे कार्यरत आहे. त्या संस्थेचे संचालक शरद गुरव यांनी पुढाकार घेऊन ‘र्हाप्सोडी’ या मथळ्याखाली २५ दृश्यकलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या आहेत. प्रस्थापित दृश्यकलाकाराचं काम हे सर्वभूत असतं, अशा कलाकारांच्या कलाकृतींबरोबर, ग्रामीण अप्रसिद्ध आणि प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या दृश्यकलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या आहेत. त्याविषयी...
दि. ८ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या सप्ताहात हे २५ कलाकार जहांगीरमध्ये त्यांच्या कलाकृतींद्वारे कलारसिकांच्या भेटीला येणार आहेत. ‘र्हाप्सोडी नाव तसं पाहिलं, तर संगीत कलेशी निगडित आहे. परंतु, संगीतात जसा रिदम, लय वगैरे गुणधर्म असतात, तद्वतच दृश्यकलेतही हे गुणधर्म पाहायला मिळतात. मग अशा गुणधर्माचं भावनिक ऊर्जा देणारं सर्जनशील अभिव्यक्त होणं, ज्यामुळे बघणार्यालाही आनंद मिळावा, या उद्देशाने या प्रदर्शनाला ‘र्हाप्सोडी’ असं शीर्षक दिलेलं आहे.
शरद गुरव यांचं कौतुक करावं असंच त्यांचं हे कार्य आहे. नवनिर्माण करणार्या अप्रसिद्ध मात्र प्रयोगशील कलाकारांसह प्रस्थापित कलाकारांनाही त्यांच्या त्यांच्या कलाकृतींद्वारे एका व्यासपीठावर आणणं, हे काम सोपं नाही, जे गुरव यांनी निभावलं आहे. या प्रदर्शनात कोलकाताच्या ‘गव्हर्नमेंट आर्ट अॅण्ड क्राफ्ट कॉलेज’चे प्रतिभाशाली समकालीन दृश्यकलाकार आशिफ हुसेन यांच्या कलासृजनाला पाहण्याचा आनंद मिळेल. वास्तव आणि कल्पना यांचे अखंडपणे मिश्रण करून मनमोहक दृश्य सादरीकरण करण्याची त्यांची उल्लेखनीय क्षमता आहे. मुंबईच्या भांडुप उपनगरातील निरकिशोर पात्रा हे मूळ खल्लीकोट ओडिशाचे आहेत. त्यांच्या पेंटींगमधून भक्ती संगीताद्वारे शहरी अध्यात्म लहरींवर चित्रण केलेले आहे व मानवी वास्तवातील शांततेचे सौंदर्य शोभते. अमूर्त आणि नैसर्गिक सौंदर्याच्या संवेदनांसह आधुनिक तंत्रांचा शोध घेणारे त्यांचे पेंटिंग आहे.
कॅनव्हासवरील वाळूची कलाकृती, निसर्गाच्या विविध सौंदर्याने आणि मानवी भावनांच्या गुंतागुंतीच्या टेपेस्ट्रीने प्रेरित, उत्सुकतेने उत्कट कृतींमधून सर्वांच्या हृदयाला भुरळ घालणारी एक मनमोहक कथेचे अनावरण केले जाते. हे साधलंय दृश्यकलाकार दीपक पाटील यांनी. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात कलेचे धडे गिरवलेले गोपाळ परदेशी यांचे पेंटिंग विषय जरा हटकेच असतात. दुर्लक्षित केलेल्या घटकांमध्ये सुंदरपणे जीवनाचा श्वास घेता विंटेज दिवे, लाकडी खिडक्या आणि जुनी भांडी अशा विषयांनी सजलेल्या परदेशींच्या कलाकृती मात्र कलारसिकांना स्वतःच्याच भासतात. गोविंद शिरसाट हे मुंबईच्या जे. जे. स्कुलच्या परंपरेतील कलाकार... ग्रामीण आणि शहरी जीवनातील असंख्य निरीक्षणे ही त्यांच्या कलाकृतींची वैशिष्ट्ये ठरावित.
कोलकात्याचे अनुभवी कलाकार जयदेव डोलुई यांनी वॉश तंत्रासह जलरंग वापरून तो त्यांच्या थिमेटिक निर्मितीस काळ्या रंगाला पवित्रता देतो. त्यांची उत्तेजक काळ्या रंगातील चित्रे रंगाची आणि विषयांची प्रासंगिकता तसेच त्याचे गूढ-गटन पावित्र्य नाजूकपणे स्पष्ट करतात.ज्योत्स्ना सोनवणे या स्वयंशिक्षित कलाकार आहेत. त्यांच्या कलाकृतीतील रेषा आणि रंगांच्या अमूर्त भाषेनेे रसिकांना मोहित करतात. कश्यप हे एक मंत्रमुग्धतेत वावरणारे शिल्पकार आहेत. त्यांची त्रिमित कलाकृती ही परिवर्तनशील कलात्मकता प्रदर्शित करते. हैदराबाद येथील एक प्रतिभावान व्हिज्युअल आर्टिस्ट मेरडुरामू हे अत्यंत कुशलतेने ग्रामीण आणि शहरी जीवन टिपतात. त्यात त्यांची कल्पनाशक्ती ओततात आणि त्यांचे सृजन कलारसिकांच्या मनाचा ठाव घेते. प. बंगालच्या सुप्रसिद्ध सिरॅमिक कलाकार माया. बी. यांना निसर्गाने प्रेरित केले आहे. मातीची भांडी बनवून ती त्या सजवतात. त्या सजावटीत त्यांचे पारंपरिकत्व दृष्टीस पडते. अशाच काही कलाकृती प्रकाश घाडगे, प्रतिभा गोयल, पंजाबच्या रमणप्रीत कौर नारंग, प्रदीप सरकार यांच्या प्रतिभाशक्तीतून साकारल्या आहेत. त्याही कलारसिकांना मुग्ध करतात.
सर्व परिचित असलेले तरुण चित्रकार शशिकांत धोत्रे शंकर शर्मा, डॉ. शेफाली भुजबळ, सुदिप्त अधिकारी शैलेश गुरव यांच्याही कलाकृती तितक्याच प्रयोगशील. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आणि विशाल फसाले यांच्या कलाकृती रसिक मनाचा ठाव घेतात.वासुदेव कामत हे व्यक्तिचित्रण आणि निसर्गचित्रणात स्वयंभू शैली व तंत्राने काम करतात. त्यांची कलाकृती ही कला आणि समाज यांच्यातील दरी कमी करते. त्यांची ‘प्रोट्रेट’, ‘स्केपिंग अॅण्ड ड्रॉईंग’ आणि ’माय पेंटींग्ज अॅण्ड थॉट्स बिहाईंड देम’ ही गाजलेली पुस्तके कला विद्यार्थी, कलारसिक आणि नवोदित शिक्षकांना मार्गदर्शक आहेत. एकूणच या २५ कलाकारांना त्यांच्या कलाकृतीद्वारे पाहता येणे ही पर्वणी आहे.
जहांगीर कलादानात येणार्या सप्ताहात हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कलारसिकांना त्यांचा अमूल्य वेळ द्यावा, असे आवाहन संचालक शरद गुरव यांनी केले आहे. या प्रदर्शनातून विक्री होणार्या कलाकृतींच्या किमतीपैकी एकूण जमा रकमेच्या काही भागाची रक्कम कर्करोग पीडितांची शुश्रुषा करणार्या (CPAA) अर्थात ‘कॅन्सर पेशन्ट्स अॅण्ड असोसिएशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.या प्रदर्शनाची पर्वणी सोडू नये, अशीच आहे. ८१०८०४०२१३