हिंदुत्वाचा बुलंद आवाज : हिंदुराव

    30-Aug-2023   
Total Views |
Hindurao
 
देव, देश आणि धर्मासाठी जे जे शक्य होईल, ते ते करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. शिवबाराजे आणि सावळा विठोबा दोन्ही त्यांना दैवतासमान. जाणून घेऊया हिंदुराव भिकू गोळे यांच्याविषयी...
 
धर्माचे पालन। करणे पाखंड खंडण।
हेचि आम्हा करणें काम। बीज वाढवावे नाम॥
 
या संत तुकाराम महाराजांच्या ओवीप्रमाणेच हिंदू धर्मरक्षण आणि संघटनासाठी त्यांचा प्रयत्न असतो. देव, देश आणि धर्मासाठी जे जे शक्य होईल, ते ते करण्यासाठीही ज्यांचा नेहमी पुढाकार असतो, असे सातारा जिल्ह्यातील हिंदुत्वाचा बुलंद आवाज हिंदुराव भिकू गोळे. वाई तालुक्यातील पाचपुतेवाडीत जन्मलेल्या हिंदुरावांनी प्राथमिक शिक्षण जीवन शिक्षा मंदिर आणि पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण श्री नरसिंह हायस्कूलमधून पूर्ण केले. आधी सुरेश असलेले नाव आजोबांच्या इच्छेखातर हिंदुराव ठेवले गेले. शालेय वयात परीक्षेत पहिला क्रमांक ठरलेलाच असायचा. त्याचबरोबर निबंध, हस्ताक्षर यांसह वक्तृत्वाचीही विशेष आवड.
 
आई जात्यावरची गाणी, लोकगीते म्हणून दाखवत. गावात अखंड हरिनाम सप्ताह, श्रावण महिन्यातील पारायण सोहळा यांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. या वातावरणामुळे त्यांना अध्यात्म आणि वाचनाची गोडी निर्माण झाली. वडील पोलीस असल्याने सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर हिंदुराव मुंबईत आले. भायखळ्यातील सर ह्यूम शाळेत त्यांनी आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. इयत्ता नववीत असताना गावी हरिनाम सप्ताहाला एकदा हभप महाराज प्रवचनाला येऊ शकले नाही, तेव्हा पहिल्यांदा हिंदुराव यांनी प्रवचन केले. १९९२ साली झालेल्या दंगली, जाळपोळ अन् दुकानांच्या तोडफोडीने हिंदुराव अनेक महिने घरातच होते. दंगलीच्या काळात संघटित असणे किती गरजेचे आहे, याची जाणीव त्यांना झाली. बाळासाहेब ठाकरेंची भाषाशैली, विचार ऐकण्यासाठी दसरा मेळाव्यालाही जात असत. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर गावी गणेशोत्सवात त्यांनी ‘सत्याचा अन्याय’ हे तीन अंकी नाटक लिहून त्यात सत्या दरोडेखोराची भूमिका साकारली. त्यावेळी नाटकाला ७०० रूपयांचे बक्षीस मिळाले. पुढे महर्षी दयानंद महाविद्यालयातून त्यांनी इयत्ता बारावीत विज्ञान शाखेचे शिक्षण घेतले.

दरम्यान, ताप आणि रक्ताल्पता यांमुळे तीन वर्षं त्यांना गावीच आराम करावा लागला. या काळात त्यांनी शेतात मदत करण्याबरोबरच वाचनाची आवड वाढवली. अभेपुरी ग्रामपंचायतीचे स्वतःचे वाचनालय असल्याने त्याचा फायदा घेऊन त्यांनी असंख्य पुस्तके वाचली. वडील निवृत्त झाल्यानंतर मुंबईत रेल्वेत नोकरीला असलेले मामा शिवाजीराव पाचपुते यांच्याकडे हिंदुराव गेले. मामांची माटुंगा रेल्वे स्थानकाशेजारीच व्यायामशाळा असल्याने, त्यांनी तिथे व्यायामाचे धडे घ्यायला सुरुवात केली. मुंबई विद्यापीठातून बहिस्थ विद्यार्थी म्हणून कला शाखेचे शिक्षण घेत त्यांनी पोलीस भरतीसाठीही प्रयत्न सुरू केले. मात्र, रेल्वे ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी फीटर म्हणून त्यांची निवड झाली. तीन वर्षं माटुंगा वर्कशॉपमध्ये अप्रेंटिसशिप केली. मात्र, त्यांना नोकरीत कायम केले गेले नाही. शेवटी आंदोलन केल्यानंतर २००४ साली त्यांना कायम करण्यात आले. हिंदुराव यांना सोलापूर विभागात नोकरी मिळाली. नाईट पेट्रोलिंग करण्यासह अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी नोकरी केली.

२०१० साली पुन्हा आजारपण आणि मानसिक खच्चीकरणामुळे नोकरी सोडावी लागली. मुलांचे शिक्षण आणि अन्य कारणांमुळे ते कुटुंबासह वाईत स्थायिक झाले. यावेळी शिवचरित्राचा अभ्यास करत त्यांनी व्याख्याने देण्यास सुरुवात केली. यानंतर प्रवचन, कीर्तनेही ते करू लागले. २०११ साली निसर्गोपचार अभ्यासक्रमाचे धडे घेतले. हाडवैद्य, चुंबक, मर्म चिकित्सांचे ज्ञानही अवगत केले. २०१२ साली त्यांनी विजयाताई भोसले यांच्या सहकार्याने पंचदिनी कीर्तन महोत्सव आयोजित केला. पुढे बजरंग दलाच्या सातारा जिल्हा संयोजकपदाची जबाबदारी मिळाली. ‘हिंदुस्थान प्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांना भेटण्याचा योग आला. बलिदान मासाचा प्रचार करण्यासाठी हिंदुराव १५ दिवस विदर्भ आणि मराठवाडा दौर्‍यावर गेले.

धर्माची बहीण समजून त्यांनी आतापर्यंत २० ते २२ ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे सोडवली आहेत. कीर्तन, प्रवचनातून गोरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचविण्याठी ते प्रयत्नरत आहेत. हिंदुत्ववादी विचार आणि व्याख्यानासाठी ते कोणतेही मानधन घेत नाही. गडकोट स्वच्छता मोहीम, गडकोट मोहीम, दुर्गादौड अशा अनेक उपक्रमांत ते सहभाग घेतात. रा. स्व. संघाच्या शाखेतही हिंदुराव नियमित जातात. आई-वडिलांच्या निधनानंतर आर्थिक संकटाचाही त्यांनी धीराने सामना केला. डॉ. प्रवीण माने, विनायक माने, निलेश पवार, सागर सुतार, राहुल खरात, सागर मालुसरे यांचे हिंदुरावांना सहकार्य लाभते. संतसाहित्यात पीएचडी करण्याचाही त्यांचा मानस आहे.

“देव, देश आणि धर्मासाठी जे जे शक्य होईल, ते करतो. लहानाहून लहान म्हणून जगा, हा गुरूजींचा संदेश कायम समोर आहे. वारकर्‍यातला धारकरी आणि धारकर्‍यातला मी वारकरी आहे. शिवबा आणि विठोबा दोन्ही मला दैवतासमान आहेत. सर्वाधिक सण हिंदू धर्मात आहेत, ज्यांचा उद्देश संघटित होणे हा आहे. अर्थार्जन आणि कुटुंब सांभाळून प्रत्येकाने धर्मकार्य करावे,” असे हिंदुराव सांगतात. हिंदुत्वासाठी झटणार्‍या हिंदुराव गोळे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.