मानचिन्हांना उंची देणारा कलाकार

    29-Aug-2023
Total Views |
Article On Engineer Charudatta Laxman Kulkarni

हजारो गौरवचिन्ह, मानचिन्हांची निर्मिती करून त्यामध्ये स्वत:चा ठसा निर्माण करणार्‍या अष्टपैलू कलावंत अभियंता सी. एल. कुलकर्णी यांचा गौरवपूर्ण प्रवास...

चारुदत्त लक्ष्मण कुलकर्णी यांचा जन्म उच्चशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील उच्चशिक्षित ‘सर्टिफाईड केमिस्ट’ तसेच उत्तम बासरीवादक होते. आई संगीतप्रेमी तसेच कलाकुसरीच्या व हस्तकलेच्या वस्तू तयार करत. साहजिकच त्यांना आई-वडिलांकडून कलेचा वारसा मिळाला. कुलकर्णी यांनी नाशिकच्या सरस्वती विद्यालयात प्राथमिक, तर न्यू हायस्कूलमधून दहावीचे शिक्षण घेतले. शालेय जीवनात त्यांना चित्रकार कमलाकार यार्दी, राम महाले यांसारख्या चित्रकारांच्या मार्गदर्शनात त्यांची कला बहरली. त्यांनी चित्र-शिल्पांसह नाटक, संगीतातही शालेय-महाविद्यालयीन जीवनात कलेचा ठसा उमटवला. लोकहितवादी मंडळासह त्यांनी स्वत:ची संस्था असलेल्या ’कलाअर्घ्य’मधूनही विद्यार्थीदशेत आणि त्यानंतरही त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेत मोठे योगदान दिले.

कुलकर्णी यांनी दहावीनंतर मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा व नंतर नागपूर येथे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा पोस्ट डिप्लोमा प्रथम क्रमांकाने पूर्ण केला. पुण्याजवळील दापोडी येथे एसटी वर्कशॉप येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ‘किर्लोस्कर ट्रॅक्टर्स’ येथे नोकरी केली. १३ वर्षं नोकरी केल्यानंतर ते वाहन सर्व्हिस सेंटर, कार बॅटरी डिस्ट्रीब्युटरशिप, दुचाकी सर्व्हिस सेंटर अशा अनेक व्यवसायात मुसाफीरी केली.

नाशिकचे प्रसिद्ध मूर्तिकार तांबट यांचे जावई कैलास तांबट यांना एकदा ट्रॉफी तयार करून हवी होती. ती तयार करून देत कुलकर्णी अपघाताने ट्रॉफी व्यवसायत आले. त्यावेळी सहज छंद म्हणून, मित्रांसाठी तयार केलेल्या ट्रॉफीज पाहून कुलकर्णी यांना ट्रॉफी, गौरवचिन्ह, स्मृतिचिन्ह तयार करण्याच्या अनेक ऑडर्स मिळाल्या. कलात्मक दृष्टिकोन, सर्जनशील विचार आणि ’आऊट ऑफ थिंकिंग’ गोष्टी कलाकृती देण्यामध्ये हातखंडा असलेल्या कुलकर्णी यांनी ट्रॉफी कलेलाच व्यावसायिक रुप दिले. प्रारंभी मुख्य व्यवसाय सांभाळून त्यांनी ट्रॉफी निर्मितीचा जोड व्यवसाय केला. नंतर मागणी वाढत गेल्याने पूर्ण वेळ ट्रॉफी निर्मिती व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. कुलकर्णी यांनी आजपर्यंत ४० हजार डिझाईन्स गौरवचिन्ह, ट्रॉफीसाठी तयार केल्या आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा ’सावाना’तर्फे सत्कार केला गेला. त्यासाठी कुलकर्णी यांनी मानचिन्ह तयार केले. मो. घ. तपस्वी यांच्या अमृत महोत्सवाचे मानचिन्ह, मुक्त विद्यापीठातर्फे प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली, त्यासाठीचे मानचिन्ह यावरही त्यांचेच नाव आहे. यासह ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’तर्फे दिल्या जाणार्‍या ‘जनस्थान पुरस्कार’ तसेच ‘गोदावरी गौरव पुरस्कारा’चे सन्मानचिन्हही त्यांनीच तयार केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विश्वास ठाकूर यांनी त्यांचा दिल्लीत जाऊन सत्कार केला होता. त्याचेही मानचिन्ह कुलकर्णी यांनी तयार केले. गौरवचिन्ह, सन्मानचिन्हांमध्ये काय असावे, असे विचारले असता कुलकर्णी सांगतात, “गौरवचिन्ह कोणत्या निमित्ताने कोणाला देणार आहे हे महत्त्वाचे. ज्या व्यक्तीला ते दिले जाते, त्यांची ओळख त्या गौरव चिन्हात प्रतीत व्हावी. सन्मार्थीच्या प्रतिष्ठेला साजेसे त्याच्या कामाचे प्रतिबिंब दाखवणारे गौरवचिन्ह असावे. पाहताक्षणी सन्मानमूर्तीचे कार्य त्यातून प्रतिबिंबित व्हावे.”

‘कोविड‘ काळानंतर सी. एल. कुलकर्णी यांच्या आयुष्याला विलक्षण कलाटणी मिळाली. एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील ’तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे’ या मालिकांमध्ये त्यांना कुटुंबप्रमुख व्यक्तीची भूमिकेची संधी मिळाली. आजोबाच्या या भूमिकेनंतर आज त्याची ओळख ‘तात्या आजोबा’ अशीच झाली आहे.

सी. एल. कुलकर्णी यांना आज अनेक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले जाते. आर्किटेक्चर महाविद्यालयामध्येही त्यांनी चार वर्षं अध्यापन केले आहे. ट्रॉफीज, स्मृतिचिन्ह, गौरवचिन्ह यांचे प्रदर्शनही त्यांनी हार्मनी आर्ट गॅलरीत भरवले होते. दर रविवारी कुलकर्णी ‘मिसळ क्लब’च्या निसर्गचित्रणासाठी जात असतात. गेली ३४ वर्ष ते निसर्गचित्रांचा प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन सराव करत आहेत. २०१८ मध्ये त्यांचे साडेतीन हजार कवितांचे काव्यखंड’ अज्ञातवास’ याचे साहित्यिक अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहेत. २०१२ मध्ये त्यांची १२ पुस्तके प्रकाशित झाली, तर आजवर १३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘विक्रमी अष्टोप्रहर’ कार्यक्रमाचे त्यांनी लिलया नियोजन केले आहे. चित्रकला, गायन, ट्रॉफी मेकिंग, अभिनय, शिल्प, अध्यापन या आणि अशा अनेक क्षेत्रातून ते आज भरीव योगदान देत आहेत.

आजवरचे आपल्या यशात पत्नी माधुरी कुलकर्णी हीचे स्थान मोठे असल्याचे ते नमूद करतात. त्यासह मित्र नितीन बिल्दीकर, धनंयज गोवर्धन, यशवंत जोशी, सचिन पाटील यांच्यासह ‘मिसळ क्लब’चे सहकारी यांचेही मोठे स्थान असल्याचे ते सांगतात. “जगात जे जे काही सुंदर, उदात्त आहे त्यांची निर्मिती करणे, त्यातून स्वानंदासह दुसर्‍यांना आनंद देत राहणे, हेच ध्येय आहे. कलेसाठी कार्य करताना आपल्या अनुभव, ज्ञानाचा इतरांना फायदा व्हावा म्हणून शेवटपर्यंत कार्य करत राहण्याचा त्यांचा मानस आहे.” सी. एल. कुलकर्णी यांना या आणि त्यांच्या एकूणच स्वप्नांसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनस्वी शुभेच्छा..!

निल कुलकर्णी 
९३२५१२०२८४