पाटणा, बंगळुरूनंतर आता दि. ३१ ऑगस्टला ‘इंडिया’ आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. आगामी लोकसभेच्या रणनीतीऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराजित करण्यावरच बैठकीत मंथन तथा कुंथन होईल, हे कुणी सांगण्याची गरज नाही. देशातील २६ विरोधी पक्ष या बैठकीला हजेरी लावण्याची शक्यता आहे. परंतु, बैठकीआधीच राहुल गांधींवर त्यांच्या नेतेमंडळींकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव सुरू झाला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तर राहुल गांधी यांना थेट ‘इंडिया’ आघाडीकडून आगामी लोकसभेसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. राहुल गांधी हे काँग्रेसचा चेहरा असून, तेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे गेहलोत म्हणाले. सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा साक्षात्कारही त्यांना झाला. स्वतः राजस्थानचे मुख्यमंत्री असताना गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी जो गोंधळ घातला होता, त्याने काँग्रेसलाही काही प्रमाणात हादरे बसले होते. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्या वादावादीत राजस्थामधील काँग्रेस सरकार कोसळता-कोसळता राहिले. गेहलोत यांनी त्यावेळेस सरळसरळ काँग्रेस हायकमांडला वेठीस धरले होते. मुख्यमंत्रिपद आणि काँग्रेसचे अध्यक्षपद अशा दोन्ही जबाबदार्या त्यांना हव्या होत्या. परंतु, नंतर सगळा डाव फसला आहे. ते मुख्यमंत्रिपद वाचवता-वाचवता त्यांना नाकीनऊ आले. आता हेच गेहलोत राहुल गांधींची स्तुती करण्यात व्यस्त आहेत. राजस्थानमधील हिंदू आणि धार्मिक स्थळे धोक्याच्या स्थितीत असताना गेहलोतांना कळवळा येत नाही. त्यांच्या कुकर्मांचीच फाईल असलेल्या ‘लाल डायरी’ विरोधातही ते चक्कार शब्द काढत नाहीत. परंतु, देशातील अन्य विषयांत त्यांना खूप सारे बोलायचे असते. मुळात खुशमस्करी करावी तर किती करावी, त्याला काही मर्यादा? बरं, गेहलोतांनी राहुल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जरी जाहीर केले, तरी त्यांना तो अधिकार नाही आणि विरोधी आघाडीतील इतर पक्ष यावर सहमत होतील, याची तर सुतराम शक्यता नाही. निवडणूक दूर असली, तरी गेहलोतांनी अशी ‘गांधीगिरी’ करण्यापेक्षा निसटलेले राजस्थान सांभाळावे, अन्यथा खुर्ची तर जाईल ती जाईलच; परंतु ‘आप’सारखा आणखी एखादा पक्ष आघाडीबाहेर पडायचा.
‘चांद्रयान’ अन् अल्पज्ञान
भारताने ‘चांद्रयान-३’च्या माध्यमातून इतिहास रचला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराजित करण्यासाठी हातात हात घेऊन गळे काढणार्या ’इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी आपले अकलेचे तारे तोडले. अगदी इयत्ता दहावीचा मुलगाही शरमेने मान खाली घालेल, असे दिव्यज्ञान या नेत्यांनी पाजळले. ‘चांद्रयान-३’ विषयी नेत्यांच्या संदर्भहीन प्रतिक्रियांमुळे त्यांच्या अल्पज्ञानाची प्रचिती देशाला आली. तिकडे चार्याशी विशेष सख्य असलेल्या लालू यादवांचे पुत्र तेजप्रताप यांनी, ‘चांद्रयान-३’ हवामानाची आणि इतर सर्व ग्रहांविषयी माहिती देणार असल्याचे म्हटले. धक्कादायक बाब म्हणजे, हे महाशय सध्या बिहारचे पर्यावरणमंत्री आहेत. लालूंच्याच राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते शक्तिसिंग यादव यांनी तर थेट ‘नासा’ला शुभेच्छा देण्याचा पराक्रम केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना, तर ‘चांद्रयाना’विषयी अतापताच नव्हता. शेवटी शेजारी उभ्या असलेल्याने कानात कुजबूज करून त्यांना याविषयी माहिती दिली. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर सर्वांना मागे टाकून अंतराळवीर राकेश शर्मा यांना चक्क राकेश रोशन बनवून टाकले. राकेश रोशन हे चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता हृतिक रोशनचे वडील आहेत. हृतिकला एका चित्रपटात जादू मिळाला होता, त्याचा प्रत्यय पुन्हा ममतांच्या वक्तव्याने हृतिकला आला असेल. दरम्यान, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा हे दोन रशियन अंतराळवीरांसह दि. ३ एप्रिल, १९८४ साली सोव्हिएत संघाच्या रॉकेटद्वारे अंतराळात गेले होते. त्यांनी तब्बल आठ दिवस अंतराळात व्यतित केले होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी इतिहासाचा पार चुराडा करून टाकला. राजस्थानचे मंत्री अशोक चांदना यांच्या आडनावात चंद्र असूनही त्यांनी चांद्रयानातील यात्रेकरूंचे अभिनंदन केले. जे की ‘चांद्रयाना’त माणूस गेलेलाच नाही, फक्त लॅण्डर आणि रोव्हर पाठवले गेले आहेत. भारत भविष्यात मानवाला चंद्रावर पाठवणार आहे, त्यासाठी चांदना यांनी बहुधा आधीच शुभेच्छा दिल्या असाव्या. काँग्रेसच्या दिग्गीराजांनी तर शुभेच्छा द्यायच्या सोडून ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना गेल्या १७ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. असो. एकूणच विरोधक म्हणून आधीच अपयशी ठरलेल्या या नेत्यांच्या अल्पबुद्धीची कीव करावी तितकी कमीच!