उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सारे ताळतंत्र सोडत देशाचे पंतप्रधान, केंद्र सरकार तसेच भाजपविरोधात बडबड केली. त्यांची बडबड फारशी गांभीर्याने घ्यायची नसते. तथापि, म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतो म्हणूनच त्यांच्या या बेताल बडबडीची दखल घ्यावी लागते. भाजपविरोधातील सर्वपक्षीयांच्या आघाडीची बैठक मुंबईत पार पडेल. त्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे असल्यामुळेच पुनश्च त्यांचा मोदीद्वेष उफाळून आला का, हाच खरा प्रश्न...
'भाजपविरोधात सर्व’ असे जे विरोधी पक्ष ‘इंडिया’ या नावाने एकत्र आलेले आहेत, त्यांची बैठक मुंबईत येत्या ३१ तारखेला होणार आहे. या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे तसेच शरद पवारांकडे. अर्थात काँग्रेसचीही त्यांना मदत होणार आहे. २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आघाडीच्या ध्येयधोरणांवर चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच, त्यासाठीच्या विविध समित्याही स्थापन केल्या जातील, असा तर्क आहे. सत्ताधारी भाजपप्रणित रालोआ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) समोर ‘इंडिया’चे कडवे आव्हान असेल, असे विरोधक छातीठोकपणे म्हणत असले, तरी त्यांनाही या आघाडीच्या भवितव्याची शाश्वती नाही. पंतप्रधानपद तसेच जागावाटप हे कळीचे मुद्दे आहेत. देशहिताच्या समस्यांवर कोणतीही चर्चा मुंबईत होईल, अशी अपेक्षा अजिबात नाही. जी आघाडी आपापले सुभे, तसेच घराणेशाही वाचवण्यासाठी केली गेली, ती आपला सुभा सुरक्षित कसा राहील, याचीच काळजी सर्वप्रथम घेणार! नव्हे, त्यासाठी तर त्यांनी ही आघाडी उभारली आहे. हे सगळे विस्ताराने नमूद करायचे कारण म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी हिंगोली येथील सभेत जी बेताल बडबड केली, त्याचा समाचार घेण्यासाठी. ‘बाटग्याची बांग जोरात’ असे म्हटले जाते.
मुंबईतील बैठकीचे आयोजन करायचे असेल; तसेच आघाडीतील महत्त्वाची पदे पदरात पाडून घ्यायची असतील, तर भाजप पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा द्वेषही तितकाच जास्त हवा. संख्याबळ दाखवून काही मिळवावे, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे ते नाही. सगळे सनदशीर मार्गाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी शिवसेनेकडे आहेत. शिल्लक सेनेत काय आहे? काहीच नाही. म्हणूनच भाजप, मोदी आणि फडणवीस यांच्याविरोधात बेताल बडबड करणे, हाच एकमेव पर्याय उद्धव ठाकरेंकडे उरतो. त्याला अनुसरूनच त्यांची अलीकडची एकूणच विधाने. उद्धव काय-काय बडबडले, हे विस्ताराने नमूद करण्याची कोणतीही गरज नाही. तथापि, ‘आधीच मर्कट त्यात दारुचा प्याला’ अशी अवस्था झाल्याने काय होते, याचे उदाहरण म्हणून उद्धव यांच्या हिंगोलीतील बडबडीकडे बघावे. संपूर्ण भारतवर्षाला ज्याचा अभिमान वाटावा, अशा ऐतिहासिक ‘चांद्रयान-३’ पासून ते जगाचे नेते म्हणून ज्यांचा लौकिक झाला आहे, अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांबद्दल त्यांनी अतिशय खालच्या स्तराला जात वायफळ बडबड केली. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतो, असे म्हणतात. म्हणूनच उद्धव यांच्या या बडबडीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
विरोधकांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ असले, तरी ती प्रत्यक्षात देशद्रोही शक्तींना बळ देण्याचे काम करणार्या टाळक्यांचीच टोळी. कर्तृत्वात दाखवून काही घ्यावे, असे म्हटले तर ते अजिबात नाही. उद्धव यांनी मुख्यमंत्रिपद उपभोगले, ते महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात करूनच. महाराष्ट्रातील जनतेने भाजप-सेना युतीला स्पष्ट बहुमत दिले होते. ही युती निवडणूकपूर्व युती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत उद्धव यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, हे वारंवार प्रचारसभा दरम्यान सांगितले गेले. किंबहुना, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, हे आधीच ठरलेले होते. त्यावेळी उद्धव यांना ‘बंद खोलीत’ जे काही घडले, त्याचा विसर पडला होता. किंबहुना, त्यांनी हेतूपुरस्सर त्याचा उल्लेख केला नाही, असे आज ठामपणे म्हणता येते. फडणवीस यांचे नेतृत्व हे जनसामान्यांत लोकप्रिय झाल्यानेच काँग्रेस, राष्ट्रवादी यांची डाळ शिजली नाही. भाजप-सेना युतीवरच लोकमान्यतेची मोहर उमटली.
तथापि, उद्धव यांच्या वैयक्तिक, राक्षसी महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले, ते निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावरच. म्हणूनच मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे आहे. तसेच, ‘वचन बंद खोलीत दिले होते,’ असे म्हणत त्यांनी केव्हा स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, ते सामान्य शिवसैनिकाला कळलेही नाही. स्वतःसह त्यांनी पोरकट, बेताल, अपरिपक्व आदित्यलाही मंत्रिपद दिले आणि सामान्य शिवसैनिक बघतच राहिला. आज ते लोकशाही वाचवण्याच्या गोष्टी करतात. लोकशाही म्हणजे काय? याची व्याख्या तरी उद्धव यांना माहिती आहे का, हाच आमचा प्रश्न. लोकशाही वाचवण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा गड सांभाळण्यासाठी तुम्ही एकत्र आला आहात. ‘मातोश्री’च्या बाहेरचा महाराष्ट्र तुम्ही आता शिवसेना हातातून निसटल्यावर फिरायला सुरुवात केलीत, अन्यथा ‘कलानगर म्हणजे महाराष्ट्र’ आणि ‘मातोश्री म्हणजे मुंबई’ ही तुमची संकुचित व्याख्या. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी,’ असे म्हणत याच उद्धव यांनी कोरोनासारख्या संकटाच्या काळातही आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकली. ज्यांनी ‘कोविड’ काळात मृतांच्या टाळूवरचेही लोणी खाल्ले, ते आता केंद्रातील भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करताहेत.
मेहबुबा मुफ्तीसोबत भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये का सरकार स्थापन केले? याचे उत्तर जेव्हा ‘३७० कलम’ रद्द झाले, तेव्हा संपूर्ण देशाला कळले. आजही ज्या मेहबुबा मुफ्ती काश्मीर खोरे पेटवण्याची भाषा करतात, त्यांच्या शेजारी उद्धव बसतात, तेव्हा ते असे का करतात, हे न समजण्याइतकी जनता भाबडी नाही. मेहबुबा यांना त्यांचे बंद झालेले दुकान पुन्हा सुरू करायचे आहे, खोर्यात प्रस्थापित झालेली शांतता त्यांना, त्यासाठी नष्ट करायची आहे. उद्धव यांनाही त्यांचे दुकान पुन्हा उघडायचे आहे. सामान्य शिवसैनिकाला मोठे करायचे आहे, असे म्हणत म्हणतच यांनी स्वतःच्या सात पिढ्यांची सोय करून ठेवली सामान्य शिवसैनिक आहे तिथेच राहिला! त्यासाठीचा हा सारा त्यांचा अट्टाहास. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांच्या नाकाखालून त्यांची शिवसेना सोबत नेली, त्यांच्यावर त्यांचा विशेष राग असणे, हे अत्यंत स्वाभाविक. म्हणूनच ते फडणवीस यांच्यावर संधी मिळाली की, पातळी सोडून टीका करतात. अर्थात, आम्हाला ती पातळी सोडून वाटते, उद्धव यांची पातळीच ती असेल, तर त्यांच्या दृष्टीने ते योग्य ‘पातळी’वर आहेत.
तथापि, त्यांच्या बेताल बडबडीतून समोर आलेली एक गोष्ट मात्र चिंताजनक अशीच आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे लोकार्पण जानेवारी महिन्यात होणार आहे. त्यावेळी देशात दंगली पेटवल्या जातील, असे ते म्हणतात. यासाठी त्यांनी सत्यपाल मलिक तसेच महूआ मोईत्रा यांचा दाखला दिला. याचा अर्थ उद्धव हे देशद्रोही शक्तींच्या संपर्कात आहेत का? उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित झालेली आहे. श्रीराम मंदिराचे कारण पुढे करत या देशद्रोही शक्ती घातपाताच्या तयारीत आहेत का? याची माहिती उद्धव यांना असेल, तर केंद्र सरकारने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन या कटाची पाळेमुळे उघडून का टाकू नयेत? असाही ते केंद्रीय यंत्रणांचा सरकार दुरुपयोग करते, असा आरोप करतच असतात. मात्र, केंद्रीय यंत्रणांनी उद्धव यांची चौकशी करून जानेवारी महिन्यात नेमके काय होणार आहे, याची माहिती घ्यावीच, अशी आम्ही आग्रही मागणी करत आहोत!