“फुकट व्याख्यानं देत राहिलो तर मी मेलो तरी”, शरद पोंक्षेचं वक्तव्य पुन्हा चर्चेत

    26-Aug-2023
Total Views |
 
sharad ponkshe
 
 
 
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील बेधडक व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले अभिनेते शरद पोंक्षे यांची हिंदुत्वावरची व्याख्याने खूप गाजतात. पोंक्षेचे सावरकर प्रेम सर्वांना ठाऊक आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणातून किंवा समाज माध्यमातून ते विविध विषयांवर आपली परखड मते व्यक्त करत असतात. दरम्यान, त्यांच्या याच व्याख्यानांमुळेच ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शरद पोंक्षेंनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात वीर सावरकरांचा कार्य करत आहात तर व्याख्यान फुकट दिली पाहिजे असे मला अनेक जण म्हणतात. पण जर मी फुकट व्याख्यानं देत राहिलो तर मी मेलो तरी त्यांना चालणार आहे, असे म्हटले आहे
 
काय म्हणाले पोंक्षे?
 
“सात-आठ वर्षं इंजिनियरिंगचा अभ्यास करून, ते इंजिनीयर फुकटात नोकरी करीत नाहीत. सात-आठ वर्षं मेडिकलचा अभ्यास करून, सात-आठ वर्षं वकिलीचा अभ्यास करून डिग्री मिळवून त्याच्यानंतर एकही माणूस फुकट काहीच करीत नाही. अहो, फुकट सोडा दोन-पाच हजारांसाठी आपण नोकऱ्या बदलतो आणि ही माणसं म्हणतात, पोंक्षेंनी हे खरं फुकट केलं पाहिजे. विस्ताराचं विमान काय माझ्या वडिलांनी बांधलंय? एवढं महान कार्य करतोयस तर जा. एवढी २३ वर्ष व्याख्यानं देतोय, पण एक वाणी असा मला भेटलेला नाही; जो म्हणाला की, तुम्ही उत्तम काम करताय, पाच किलो साखर यांच्या घरी जाऊ दे. कोणीही म्हणत नाही.”
 
शरद पोंक्षे साकारणार डॉ. हेडगेवारांची भूमिका
 
सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्या संगीतमय जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चरित्रपटाचा मुहुर्त समारंभ नुकताच पार पडला. या चरित्रपटाच अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा.स्व.संघ) संस्थापक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची भूमिका साकारणार आहेत. डॉक्टरांनी सुरु केलेली ही संघटना गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत आहे.‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चरित्रपटात डॉ. हेडगेवारांची भूमिका साकारयला मिळत आहे हे मी माझे भाग्य समजतो", अशा शब्दांत शरद पोंक्षे यांनी भावना व्यक्त केल्या.
 
“दोन वर्षांपुर्वीच मला डॉक्टरांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते, मात्र पुढे त्या चित्रपटाचे काही झाले नाही. आणि इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा तीच भूमिका साकारण्याची संधी मला दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी दिली याचा आनंद वाटतो”, असेही पोंक्षे म्हणाले. “काही व्यक्तिरेखा असतात ज्या आपल्याला साकाराव्याशा वाटतात. जसे की, वीर सावरकरांचा मी भक्त असल्यामुळे त्यांची व्यक्तिरेखा साकारावीशी नक्कीच वाटते पण मला माझ्या शरीरयष्ठीमुळे ती भूमिका साकारता येत नाही. तशीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील साकारायची इच्छा आहे, आणि त्याच यादीत डॉ. हेडगेवारांची भूमिका असताना एकदा अचानक दिग्दर्शक योगेश देशपांडे यांचा फोन आला. आणि ते मला म्हणाले ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ असा चित्रपट मी करत आहे. बाबूजींच्या जीवनात डॉ. हेडगेवारांचे अनन्यसाधारण महत्व होते आणि ती भूमिका तुम्ही करावी अशी इच्छा आहे. त्यामुळे ही भूमिका नाकारण्याचे काही कारणच नव्हते. आणि बाबूजींच्या जयंतीदिनी हे जाहिर करायचे होते, तर लागलीच मी मालिकेला आज काहीही काम मी करणार नाही असे म्हणत नकार कळवला”, अशी माहिती पोंक्षे यांनी दिली.