मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात राजकीय नेते, कलाकार यांनी मोठ्या संख्येने आजवर हजेरी लावली आहे. खुपते तिथे गुप्तेच्या रविवार दि.२७ ऑगस्टच्या भागात मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून जितेंद्र जोशी येणार आहे. नुकताच त्याच्या ‘गोदावरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ६९वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. दरम्यान या कार्यक्रमात जितेंद्रने अभिनेते संजय मोने यांच्याबाबत एक महत्वाचा किस्सा सांगत, ठतो माझा बाप आहे आणि त्याने मला अपघातानंतर उभं केलं आहे”, असं म्हटलं आहे.
दरम्यान कार्यक्रमात संजय मोने जितेंद्रबद्दल काहीतरी बोलताना दिसत आहेत मात्र, ते जितेंद्रवर नाराज असलेले दिसून येतात. बोलता बोलता ते अचानक निघून जातात. यावर जितेंद्र म्हणतो, “मी त्यांचा वाढदिवस विसरला होतो. माझ्या हे खूप उशिरा लक्षात आलं आणि मी नंतर त्यांना फोनही केला. अख्खं जग रुसेल पण काका नाही रुसणार. एवढं नातं घट्ट आहे. काका माझ्यावर कधीही नाराज होऊ शकत नाहीत. माझा बाप आहे तो. माझ्या अपघातानंतर त्याने मला उभं केलंय रे. त्या घटनेनंतर त्याने मला मी हिरो असल्याची जाणीव करून दिली. मी हिरो आहे हे त्याने माझ्यात रुजवलं. त्याच्यामुळे मी पुन्हा पाय घट्ट रोवून उभा राहिलोय.”
एकीकडे जितेंद्र त्याच्या भावना सांगत असताना मागून संजय मोने येतात आणि तो अतिशय भावनिक क्षण झालेला दिसून येत आहे. यानंतर मोने यांना बघताच जितेंद्रने त्यांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या पाया पडला. हा एपिसोड २७ ऑगस्टला रात्री १० वाजता झी ५ ओटीटवर बघता येणार आहे.