शिक्षणाची गोडी निर्माण झाल्याने या क्षेत्रातील आवडीच्या विषयात रस घेऊन प्रत्येक परीक्षेत यश मिळवणार्या आणि इतरांनादेखील शिक्षणासाठी प्रेरित करणार्या निलेश महाजन यांच्याविषयी...
पुण्यातल्या रास्तापेठेतील वाड्यात लहानपण रमविणार्या निलेशने आपले आई-बाबा आणि आजोबा (श्रीकृष्ण श्रोत्री) यांच्या मार्गदर्शनात यशाची वाटचाल अखंड सुरू ठेवली आहे. आपल्या आजोबांच्या आठवणीत रमताना निलेश यांनी त्यांच्या अंगभूत कौशल्याचे आणि आईच्या कलेचा वारसा आपण आत्मसात करू शकल्याचा अभिमान वाटतो, अशी भावना व्यक्त केली. आपल्या भावंडांना आईने लहानाचे मोठे करताना जे संस्कार दिले, त्यातून आपल्याला हे यश मिळाल्याचे निलेश आवर्जून सांगतात.
सध्या प्रमुख अग्निशमन विमोचक या पदावर कार्यरत असलेल्या निलेश यांना सोशल मीडियावर समाजासाठी व्यक्त होण्याचा, चारोळी आणि संगीत गायनाचा छंद आहे. कोरोनाच्या काळात तर रुग्णसेवेसाठी उत्स्फूर्तपणे निलेश यांनी सहभाग घेतला. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियातून अधिकृत आणि खात्रीशीर माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी निलेश यांनी केली. यामुळे रुग्णांचे प्राण तर वाचलेच. मात्र, नातेवाईकांनादेखील योग्य माहिती मिळाल्याने निलेश यांना आपण समाजातील घटकांसाठी चांगलं काहीतरी करू शकलो, याचं मोठं आत्मिक समाधान लाभलं.
शिक्षण क्षेत्रातील त्यांची कामगिरी चकित करणारी आहे. २००२ मध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा घेतल्यानंतर २००७ साली ते ‘फायरमन’ पदावर अग्निशमन विभागात रुजू झाले. त्यांचे सासरे कर्नल असल्यामुळे या विभागात शिस्त आणि कठोर कामगिरीबाबतच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांच्याकडून निलेश यांना मिळत गेला. पदवीचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही, ही खंत दूर करण्यासाठी महापालिकेत रुजू झालेल्या सुरक्षा अधिकारी कोंढरे यांच्या मार्गदर्शनातून निलेश यांचा उच्च शिक्षणाचा प्रवास सुरू झाला.
एच. व्ही. देसाई महाविद्यालयामध्ये २०१७ साली ‘बीएससी केमिस्ट्री’ उत्तीर्ण झाल्यावर शिक्षणाची गोडी वाढली. मग येथील अ. ब. चौकातील नारळीकर इन्स्टिट्यूटमध्ये ‘एमबीए’ (एचआर) चे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. यात एक ‘लेबर लॉ’चा अभ्यासक्रम असल्यामुळे आपण विधी क्षेत्रातदेखील शिक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे वाटू लागले. अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द असल्याने कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे, ही जाणीव झाली आणि व्हीआयटीला ‘एलएलबी’ची सीईटी दिली. शिवाजी मराठामध्ये तीन वर्षांचा ’एलएलबी’ अभ्यासक्रम केल्यानंतर कोरोनाच्या काळात ‘डिप्लोमा इन लेबर लॉ’ आणि रानडे इन्स्टिट्यूटमध्ये ‘फोटो जर्नलिझम’चा अभ्यासक्रम केला. मॉडर्न लॉ कॉलेजमध्ये ’डिप्लोमा इन सायबर लॉ’ हा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यावर ‘एलएलएम’देखील यशस्वीरित्या उत्तीर्ण केले. आता ‘फॉरेन्सिक क्रिमिनल लॉ’साठी प्रवेश घेणार असल्याचे निलेश यांनी सांगितले.
केवळ स्वतःच नव्हे, तर पत्नी आणि मुलालादेखील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करताना निलेश यांनी समाजातील शिक्षणासाठी उत्सुक असणार्या, परंतु काही कारणास्तव शिक्षण घेऊ न शकणार्या व्यक्तींनादेखील प्रेरित केले. यासाठी ते आवश्यक ती शैक्षणिक मदत आणि सहकार्य करीत असतात. आपल्याला वर्दीचा अतिशय अभिमान असल्याचे सांगताना, त्यांनी शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग जनसंपर्क वाढवत समाजासाठी करण्याचे व्रत अंगीकारले आहे.
सामाजिक कार्याची आवड जोपासत समाजासाठी आवश्यक ती माहिती पुरविण्याचा वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या माहितीपूर्ण बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा छंद जडल्यामुळे अग्निशमन विभागात त्यांच्यावर जनसंपर्क अधिकार्याचीदेखील जबाबदारी आली. कार्यालयात आलेल्या तरुणांना ते नेहमीच शिक्षणासाठी प्रेरित करत असतात. काही मुलांकडे शिक्षणाची इच्छा असूनदेखील आवश्यक त्या सुविधा नसतात. तेव्हा त्यांना योग्य ती मदत आपण केल्याचे निलेश अभिमानाने सांगतात.
शिक्षणाची गोडी असणे आणि त्यातून समाज समृद्ध आणि शिक्षित करणे, यांसारखे मोठे सत्कर्म नाही. पुण्यातल्या अग्निशमन विभागात कार्यरत तरुण चक्क नोकरी सांभाळून आपल्याला आवडेल, त्या विषयातील परीक्षा अगदी उत्तम श्रेणीत उत्तीर्ण होतो. तेव्हा अभ्यासाचा कंटाळा आणि शिक्षणाची गोडी नसलेल्या आजच्या काही तरुणांसाठी, या युवकाचे कार्य किती प्रेरणादायी आहे, हे अधोरेखित करणे गरजेचे वाटते.
होय, निलेश महाजन या तरुणाची त्याच्या आयुष्यातील वाटचालीची दखल आजच्या तरुणांनी घेणे आवश्यक वाटते. केवळ पदवी प्रमाणपत्र असले पाहिजे, म्हणून शिक्षण घ्यावे, अशी मानसिकता असणार्यांनी निलेश महाजन यांच्या जिद्दीचा वस्तुपाठ अंगीकारला पाहिजे. आपण ज्या समाजात राहतो, त्यांच्या हितासाठी आपण मिळविलेले ज्ञान उपयुक्त ठरावे आणि घेतलेल्या शिक्षणातून त्याचा लाभ समाजाला करून द्यावा, यासाठी निलेश यांची वाटचाल नक्कीच उपयुक्त ठरेल, यात संदेह नाही. त्यांच्या वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
-अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९०२८८९९०६०)