मुंबई : केंद्र सरकारने शालेय शिक्षणात मोठे फेरबदल केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींची अंमलबजावणी करताना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षण-परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींनुसार बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जातील.
तसेच, विद्यार्थ्यांना हा पर्याय दिला जाईल की ते दोन्ही सेमिस्टरचे सर्वोत्तम गुण अंतिम मानू शकतील. याव्यतिरिक्त, मंत्रालयाने बोर्डांना मागणीनुसार परीक्षा आयोजित करण्याची क्षमता विकसित करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत केंद्रीय बोर्ड असो की स्टेट बोर्ड, सर्व परीक्षा वर्षातून एकदाच घेतल्या जातात.
नवीन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांच्या विषयांची समज आणि त्यांच्या स्पर्धात्मक कामगिरीचे (अचिव्हमेंट ऑफ कॉम्पिटेंसीज) मूल्यांकन करेल. शिक्षण मंत्रालयाने केलेल्या बदलांनुसार, इयत्ता ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना शाखा निवडण्याची सक्ती असणार नाही.
यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्यास स्वातंत्र्य मिळेल. सध्या सर्वच मंडळांच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक इत्यादींपैकी एका शाखेची निवड करावी लागते. नवीन बदलांनुसार विद्यार्थ्यांना ११वी आणि १२वीच्या वर्गात दोन भाषा विषय निवडावे लागतील, त्यापैकी एक भारतीय भाषा असणे बंधनकारक असणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी पुस्तके तयार केली जाणार आहेत. त्यामुळे नवीन परीक्षा नियमांची अंमलबजावणी २०२४-२५ या वर्षापासून केली जाणार आहे.