न्हावून धुवून केस बांधले, लाविला टिळा
काचोळी हिरवी, शालु भरजरी निळा!
पाचपदरी मोहनमाळ घातली गळा
शिवमंदिरी चालले अशी मी शुचिर्भूत होऊनी
तोवरी थांबा ना घरधनी!
केवळ देवदर्शनाला शुचिभूर्त होऊन चाललेल्या ललनेचे हे वर्णन नाही, तर शांताबाई शेळके यांनी चक्क बरसणार्या त्यातही श्रावणातल्या सरीचे वर्णन व सरीच्या धरतीवर कोसळणार्या नृत्य प्रकाराला चक्क ‘लावणी’ नाव देऊन ‘लावणी श्रावणाची’ या गाण्यात चक्क लावणी सादर केली.
पायांत पैंजण लावून नृत्य करणार्या जलधारांचे कसब, जणू भृंगाच्या घोंघावणार्या आवाजातून पैंजणाचा झंकार जसा असतो त्यातील साधर्म्य, तसेच नृत्य सोहळ्याला मिळणारे नैसर्गिक संगीत जसे ढगांचा आवाज, जलधारांचा कोसळतानाचा आवाज तसेच जलधारांचा धरणीवर मिलाप होतानांची टिपटिप स्वरांची आलापी म्हणा, रिदम म्हणा, त्याला सोबत म्हणून दामिनीचे अधूनमधून मिळणारे ‘लायटिंग इफेक्ट’ या व अशा वर्णनाच्या अनेक कवितांनी मराठी पद्य साहित्य समृद्ध आहे. परंतु, निसर्गाच्या या नृत्याविष्कारातूनच चक्क लावणीचे स्वर प्रसवणारे शब्द पेरणार्या शांताबाईंची कल्पकता व शब्द सामर्थ्य अद्वितीय आहे म्हणून ही लावणी निवडली आहे.
‘काव्य काय स्फुरावे - सांडुनिया वाया न जावे’ म्हणून शांताबाईंनी काव्याला लावणीच्या दावणीलाच बांधून ठेवले. लावणी म्हटले की स्त्रियांच्या नखरेल बाजांचे व चावट श्रृंगाराचे वर्णन ठरलेले. परंतु, शांताबाईंनी ‘लावणी’ या प्रकाराला पावित्र्याने आंघूळ घालून शुचिर्भुत केले. श्रावणातल्या पावसाळी दिवसाच्या पवित्र वातावरणात न्हावून धुवून लांब केशकलाय कंच बांधून, ताज्या चेहर्यावरील कपाळी टिळा लावून, तसेच भरजरी निळा शालू जे पारंपरिक खानदानी वस्त्र आहे व हिरवी कंचुकी असे वस्त्रप्रावरण नेसून व गळ्यात पाच पदरी मोहनमाळ इ. सौभाग्यवतीच्या लेण्याने नटून ही ललना श्रावणातील दैवत महादेवाच्या मंदिरी जाण्यास निघाली, तोपर्यंत म्हणजे शिवपूजा आटोपून येईस्तोवर ‘हे घरधन्या तू प्रतीक्षा कर!’ इतका शुद्घ व उदात्त हेतू, लावणीतून प्रगट केला. पावसाळी वातावरण शुद्धता व पवित्र भाव कसे जागृत होतात, याचे दर्शनच घडविले.
आधीच श्रावण मास, त्यातही पहिला सोमवार, निर्जळी उपासाचा. भ्रताराच्या भल्यासाठीच धारण केलेले अवघड व्रत पाळण्यासाठी शिवाला पुजून येते तोवर प्रतीक्षा करा, अशी काकुळत करणारी नारी, लावणीतून वर्णावी ती शांताबाईंनीच! श्रावणातली समृद्धी श्रावणसरींमुळे कशी वाढते?
बाहेरसारखी श्रावणसर कोसळे
हिरवळून बहरले सळसळती हे मळे
प्राजक्त फुलुनिया अंगणात दरवळे
लक्ष फुलांचा येईन म्हणते शंकरास वाहुनी! तोवरी थांबा ना घरधनी!
वर्षाऋतुत खरे तर पावसाचे दोनच महिने - आषाढ व श्रावण. संपूर्ण आषाढमासी आपल्या धुवाँधार आतषबाजीने पादाक्रांत केलेल्या धरतीवर, सरावलेल्या सैनिकाप्रमाणे सारख्या पर्जन्यधारा कोसळतात. चिंब भिजलेली धरतीमाता, त्यावरील हिरव्यागार शालीने नटलेल्या शेतमळ्यांचा हिरवाईने बहरून जाते. भगवंताला प्रिय असणार्या प्राजक्त पुष्पांचा तर हा धारण महिना. लाखो फुलांचा भार सहन न झाल्यामुळे संपूर्ण अंगणात पुष्पांचा सडा टाकणारा प्राजक्त या मोसमांत रंगात येतो व ही ललना विनंती करते - तुमच्यासाठी प्राजक्ताची लाखोळी शंकरास वाहणाच्या व्रताची आजची फेरी करून येते तोवर थांबा हो घरधनी!
तोवर थांबा हो घरधनी! त्यातही लावणीतला समेचा शब्द ‘घरधनी’ काय नजाकतीचा उचलला! मराठीने धारणे केलेला उर्दू अविष्कार. म्हणूनच उर्दू अंगाची लावणी मराठीत करूनही तोच तोरा कायम ठेवला. उर्दूत लावणी प्रकार नसतो, परंतु या लावणीला नैसर्गिक श्रृंगार रसाने तो बाझ आला. एवढेच.
लावणी म्हटली की, एवढ्या तेवढ्या किंवा हलक्या फुलक्या श्रृंगार रसाच्या शब्दांवर भागेल तर त्या शांताबाईं कसल्या! पुढील कडव्यात लावणीतील अंतरंगातील भाव पाहा - कवियत्री कशा प्रगट करतात!
बाहेरी श्रावण, श्रावण फुलला घरी
उन्ह तुमचे माझ्या, झिरमिर श्रावणसरी
उमटेल इंद्रधनु, रंगीत माझ्या उरी
उन्हात पाऊस पावसात उन्ह, खेळ बघू रंगुनी
तोवरी थांबा वो घरधनी!
उर्दूतील गझल सम्राट कवी साहिर लुधियानवी यांना जर शांताबाईंचे हे गझलसदृश्य काव्य अर्थासहित गावून दाखविले असते, तर तेहि दिङ्मूढ झाले असते!
बरसाती वातावरण, त्यातही चिंब भिजलेल्या रात्री व दिवस यांच्या अविष्काराने मानव प्रकृतीतही निसर्गातील श्रृंगारीक भाव प्रगट होतात. अर्थात मानव देह हाही निसर्गाचाच अविष्कार आहे. श्रावण सरीच्या नशेत जसे बाह्य जग धुंद होते. तसेच, अंतर जग म्हणजे घरात व अंतर्मनात देखील धुंदीचे वलय जागृत होते. लावणी म्हणणारी रसिकतेत डुंबून म्हणते, तुमच्या अंतर्मनातील उन्ह म्हणजे ताप व माझ अंतरंग चिंब करणारी श्रावणसर यांच्या मिलनाने माझ्या मनी निश्चितच भावभावनेचे इंद्रधनु निर्माण होईल. अशा प्रकारे ऊन-पाऊस यांचे परस्पर विरोधी खेळात रंगून होईस्तोवर हे घरधनी तुम्ही थांबा.
भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीत इ. लिहिणार्या शांताबाईंनी निसर्गावर त्यातही दर्यावर अफाट काव्यसंपदा निर्माण केली आहे. त्यांच्या दर्यावरील काव्यसंपदेतील अफाट कल्पनांच्या सागरावर मराठी रसिक गेली चार दशके हिंदोळत होता. प्रस्तुत काव्यात निसर्गावर त्यातही श्रावणसरींच्या गोड उन्मादावर चक्क लावणी सादर करून शांताबाईंने आपले बहुआयामित्व सिद्ध केले.
म्हणूनच या श्रृंगाराने युक्त श्रावणात शांताबाईंची आठवण!!
रमेश पोफळी
७७७५९००८२४