प्रत्येक स्वराला वर्ण का असतो? याचेही एक शास्त्र आहे. काचेच्या भिंगातून सूर्यकिरणे धाडल्यास पीशंग वर्ण आतल्या बाजूला तर जांभळा वर्ण पट्टीच्या बाह्यांगाकडे धाव घेतो. दीर्घ कंपन लहरींचे स्वर बाह्यांगाकडे तर लघुकंपनलहरीचे स्वर अंतरंगाकडे वळतात. पीशंग वर्णाचा स्वर षड्जाला लागून तर नीलवर्णी धैवत षड्जाचे दूर आहे. व्यक्तातून अव्यक्ताकडे धाव घेणारा निषाद भगवान श्रीकृष्णाच्या जांभळ्या वर्णासारखा श्यामल वर्णाचा आहे. शुभ्रातून भासमान होणार्या षड्जाची गती श्यामवर्णाच्या निषादात होते. निषादानंतर पुन्हा षड्ज जन्म घेतो.
‘अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत’ अशी ही स्वरांची व्यक्ता-व्यक्त परंपरा आहे. चराचर सृष्टीच्या मूलाकडे म्हणजे अव्यक्त अशा श्यामाकडे धाव घेणार्या निषादात विकृती उत्पन्न झाल्यास चित्ताला विषाद होतो. कंपनलहरी जशा उच्च व दीर्घ होत जातात, तसा त्यांचा वर्ण शुभ्रापासून श्यामाकडे क्रमशः होत राहील. म्हणून षड्जाचा शुभ्र तर निषादाचा श्यामवर्ण असतो. मध्यम तेजस वर्णाचा आहे. मध्यम ग्राम देवतांचा ग्राम मानला गेला आहे आणि आता देवतांसह मध्यम ग्रामाचाही लोप झाला आहे. गंधार ग्राम गंधर्वाचा. गंधर्व ही आपतत्वातील अस्तित्वे असल्याने आपतत्वाचे साधन करणार्यांना गंधर्वांची अनुभूती येते. इतकेच नव्हे, तर स्वतः साधकच गंधर्व बनत असतो. गंधर्वग्राम लोप पावल्यासारखा वाटत असला तरी गंधारग्रामाचे साधन करणार्या गंधर्वांना गंधारग्रामाचा आजही प्रत्यय येऊ शकतो.
आपतत्वाचे परिचायक म्हणजे गंधर्व आणि आपतत्वाचे स्वामी भगवान शिवशंकर होत. भगवान शिवाच्या दर्शनात नेहमी यक्ष, गंधर्व, किन्नर आदी स्वरयोनी घुटमळत असतात. याचे कारण हेच होय. शिवदर्शनात नारदतुंबरूंचाही संबंध येतो. सर्व शास्त्रांचा उगम भगवान शिवांपासूनच आहे. योगशास्त्राचे आद्यजनक भगवान शिवशंकर असल्याने सर्व शास्त्रांचे जनक भगवान शिवशंकर असल्यास नवल नाही. पण सर्व शास्त्रांच्या आधी जर कोणते शास्त्र उत्पन्न झाले असेल तर ते संगीतशास्त्र होय. संगीतशास्त्राचा आणि योगशास्त्राचा इतका निकट संबंध आहे. राजयोगी व हठयोगी गायक नसला तरी एका विशिष्ट अवस्थेत त्याला अनाहतनाद किंवा वेदनाद ऐकू येतातच, इतका योगशास्त्र व गानयोग यांचा संबंध आहे. गानयोगाला रंजक करण्याचा प्रयत्न केला की संगीत शास्त्र उत्पन्न होते. गानयोगाची फले पदरात पाडून घेण्याची रंजककला म्हणजे संगीतशास्त्र म्हणता येईल. भगवान शंकराला प्रसन्न करण्याचे दोन मार्ग. एक तर तप करणे किंवा गानयोगाने शंकराला वश करणे.
भगवान शंकराला प्रसन्न केल्यानंतर आपतत्वाचे सर्व भांडार साधकासमोर खुले होते. आप म्हणजे प्राप्त करणे. आपतत्वाच्या साधनेतून गंधारग्रामाचा अभ्यास केल्यास सर्व प्राप्त होत असते, अगदी दिवे लावण्यापासून पर्जन्यापर्यंत, फुलांना बहरवण्यापासून तो प्रत्यक्ष फुले उत्पन्न करण्यापर्यंत आणि अप्सरा भोगापासून ते तहत देवतांच्या दर्शनापर्यंत, सारे सारे गंधारग्रामाच्या अभ्यासामुळे प्राप्त होत असतात. विधायक संगीत म्हणजे प्रत्यक्ष वस्तू वा घटना उत्पन्न करण्याचे सामर्थ्य गंधारग्रामात आहे. पण, त्याकरिता साधकाला स्वतः गंधर्व बनावे लागते. केवळ तानबाजी करणारा साधा गायक गंधर्व बनू शकत नाही. त्याकरिता साधने आहेत व शिस्तबद्ध जीवन आहे.
मध्यमग्राम म्हणजे मार्गी संगीत. समाधीपासून ते तुकाराम महाराजांसारखे सदेह स्वर्गाला जाण्याचे सामर्थ्य या मार्गी संगीतातच म्हणजे मध्यमग्रामात आहे. साधक देवतांच्या अवस्थेत गेला की त्याच्या मुखातून निघणारे स्वर मध्यम ग्रामाचेच असतात. मध्यमग्रामाच्या श्रुती षड्जग्रामाच्या श्रुतिंच्या अधे-मधे असल्याने मध्यमग्रामाचे संगीत साधारण असाधक गायकाला बेसूर वाटेल. परंतु, त्याच बेसूर वाटणार्या गायनात नराचा नारायण करण्याचे सामर्थ्य आहे. साधक सदेह स्वर्गाला जाऊ शकतो. या मध्यमग्रामाचे वर्णन तुकाराम महाराज करतात, ‘वेडा वाकुडा गाईन ख परि तुझाची म्हणवीन’॥ मध्यम ग्रामाबद्दलच्या अनुभवांवर पुढे चर्चा येईलच.
स्वरांना रंग असतात ही शास्त्रीयता पाश्चात्यांना इतके दिवसपर्यंत एक रंजक कल्पनाविलास वाटत असे. भारतीय संगीतशास्त्राबद्दल सहानुभूती बाळगणार्या ‘सर वुइलार्ड जोन्स’ यांनी स्वरांचे रंगवर्ण आणि राग रागिणींच्या प्रतिकृती या भारतीय संगीतातील सत्यांना बुद्धिमान ग्रीकांनाही न सुचलेली, परंतु भारतीय अंत:करणाची विशेषता असलेली एक रम्य कल्पनासृष्टी म्हणून त्याचे वर्णन केले आहे. (पाहा ‘ट्रीटीज ऑन द म्युझिक ऑफ हिंदुस्थान’) आपल्या प्राचीन शास्त्रांबद्दल अज्ञानामुळे साशंक असलेल्या काही भारतीयांनाही तसेच वाटते. परंतु, स्वरांना रंग राहणे ही आता कविकल्पना राहिली नसून एक शास्त्रीय सत्य बनले आहे. प्रख्यात रशियन वैज्ञानिक ‘कूजोह नोव्ह’ यांनी स्वरांच्या रंगाबद्दल बरेच संशोधन करून ठेवले आहे. त्यांचे नावही त्यांच्या संशोधन कार्याला साजेसेच आहे.
‘कूजोह नोव्ह’ म्हणजे संस्कृत शब्द ‘कूजन आव्ह’ ‘कूजन’ करुन ‘आव्ह’ म्हणजे बोलावणारा असा तो ‘कूजनोव्ह’ त्यांच्या ओत उपकरणावर (इलेक्ट्रॉनिक अँपरँटस) त्यांनी स्वरांच्या कंपनांचे रंग टिपले असून, कोणत्या कंपनाच्या स्वराला कोणता रंग असतो त्याची सूची तयार केली आहे. ते म्हणतात, प्रत्येक स्वराला त्याचा एक रंग असतो, पण गीत वा संगीत जलद चालू ठेवल्यास विभिन्न रंगांचे अभिसारण होऊन त्याचा एकूण परिणाम एक पुसट रंगचित्रपट होण्यात होतो. पाश्चात्य संगीताला स्वरांचे रंग व रागरागिण्यांची स्वरुपे ही एक नवीनच कल्पना असल्याने त्यांच्या संगीतातील स्वरांची रचना त्यांच्या पारंपरिक अभिरुचीलाच पोषक आहे. स्वरांचा योग्य न्यास, विन्यास, कंप, पुनरावृत्ती व तत्सम शास्त्रीय ठेवण उत्पन्न करण्याची कला त्यांच्या संगीतशास्त्राला अवगत नसल्याने तसली पाश्चात्त्य गीते वाजविल्यामुळे कूजोहनोव्ह यांचे ओतफलकावर रंगांचे पुसट अभिसारण झाले असावे. प्राचीन भारतीय संगीतशास्त्राच्या आधारे रचलेले एखादे गीत त्या ओतफलकावर कंपित केले असते, तर त्यातून एखाद्या रागिणीचे स्वरुप त्या फलकावर झळकले असते. यावरुन संगीत दर्पणात वर्णन केलेले स्वरांचे वर्ण व रागरागिण्यांची स्वरुप वर्णने किती शास्त्रीय आहेत, याची कल्पना येईल. भारतीय शास्त्रांना कल्पनाविलास मानणेच आता अशास्त्रीय होऊन बसले आहे.
स्वरांचे पंचगुणात्मक स्वरूप
पाश्चात्त्य संगीत जगतात पुन्हा एक प्रयोग चालू आहे. विशिष्ट कंपनांचा भडिमार केल्यावर पेय पदार्थाची चव बदलते, तर नसलेली नवीन उत्पन्न होते. म्हणजे भारतीय सांख्यदर्शनानुसार पाश्चात्त्यांचे संगीत प्रयोग आपतत्वापर्यंत आले आहेत. आपतत्वाचा गुण, रस व चव हा आहे. पाश्चात्त्य जगाने आता स्वरांना नाद, रंग व चव हे गुण दिले आहेत. राहिले स्पर्श व गंध गुण. स्पर्श गुण वायुतत्वाचा तर गंध गुण पृथ्वितत्वाचा आहे. (क्रमश:)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे