साधारण गेल्या तीन महिन्यांपासून कानावर येत होते की, मुंबई शहरातला जो नागपाडा नावाचा भाग आहे, तिथे एक नागोबाचे देऊळ आहे. त्यावरुनच भागाला ‘नागपाडा’ हे नाव पडले आहे. परंतु, हे देऊळ ऐन मुसलमानी वस्तीत आहे. बहुधा ते कुणा मुसलमान व्यक्तीच्याच ताब्यात आहे. यामुळेच ते वर्षभरात एकदाच, फक्त नागपंचमीच्या दिवशीच उघडले जाते. एवढे समजल्यावर मुंबई विषयक जुनी पुस्तके, संदर्भ हे एकीकडे पाहू लागलो आणि एकीकडे हे नागोबाचे देऊळ आज नेमके कुठे आहे, याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष हे देऊळ गाठले. त्याचेच हे अनुभवकथन...
सन १८८९ साली लेखक बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांनी लिहिलेल्या ’मुंबईचा वृत्तांत’ या पुस्तकात उल्लेख सापडला की, मुंबई शहरातल्या नागपाडा या भागाचे ते नाव, नागपंचमीस प्रत्यक्ष प्रकट होऊन भक्तांकडून दूध आणि साळीच्या लाह्या स्वीकारणार्या नागावरून आलेले आहे. मुंबईच्या मूळ सात बेटांपैकी मुंबई या मुख्य बेटाच्या अगदी पूर्व टोकाशी म्हणजे माजगाव बेटाच्या किनार्यानजीक नागपाडा हे एक खेडे किंवा पाडा होता. सन १८४३ साली इंग्रजी ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या काळात प्रसिद्ध झालेला एक नकाशा त्याच पुस्तकात देण्यात आलेला आहे. त्यात नागपाड्याचा उल्लेख चक्क ’व्हिलेज ऑफ नाग’ असा करण्यात आलेला आहे.
इंग्रजी राजवटीत मुंबई शहराचा लोकवस्तीचा पोत कसा होता, याचा मागोवा घेतल्यास असेे दिसते की, फोर्ट भागात मुख्यतः इंग्रज लोक आणि श्रीमंत पारशी, श्रीमंत गुजराती आणि श्रीमंत मराठी व्यापारी राहात. मग काळबादेवी, चिराबाजार या भागात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय राहात. गिरगावात बाबू लोक म्हणजे फोर्टमधल्या सरकारी कचेर्या आणि खासगी व्यापारी पेढ्या यामध्ये कारकुनी करणारे लोक राहात, तर ग्रँटरोडपासून लालबाग-परळपर्यंत श्रमजीवी लोक राहात असत. यामुळे त्याहीवेळी नागपाडा भागात मुसलमान वस्ती होतीच.
परंतु, १९९२-९३च्या दंग्यांनंतर असा फरक निश्चितपणे जाणवतो की, नागपाडा-भायखळा या परिसरातली मुसलमान वस्ती होती तशीच आहे आणि हिंदू वस्ती कमी होत आहे. अशा स्थितीत प्रश्न हा होता की, हे नागोबाचे मंदिर शोधावे कसे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अशा गोष्टी अचूकपणे करीत असतात. परंतु, या भागातले अनेक जुने-जाणते कार्यकर्ते आता उपनगरात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे शोधकार्याला यश येत नव्हते.
अखेर कालच्या नागपंचमीच्या दि. २१ ऑगस्टच्या आदल्या दिवशी एका संघ कार्यकर्त्याकडूनच पक्की माहिती मिळाली. जुना नागपाडा रोड किंवा आताचे नाव महंमद इब्राहिम सारंग मार्ग या परिसरात मस्तान तलाव आहे. सय्यद मस्तानशाह काद्री नावाचा एक मुसलमान साधू सुमारे सन १८१७ ला मुंबईत येऊन इथे राहिला. त्याचा दर्गा, या तलावाच्या काठावर असल्यामुळे याला ‘मस्तान तलाव’ नाव पडले. सन १९१७ मध्ये हा तलाव बुजवून त्या ठिकाणी मैदान बनवण्यात आले. या मैदानापासून अगदी जवळच दोन इमारतींच्या मधल्या छोट्याशा बोळात हे मंदिर असून ते फक्त नागपंचमीला दिवसभर उघडे असते. मात्र, अगोदर कळलेल्या बातमीनुसार, मंदिराचे विद्यमान मालक कुणी मुसलमान नसून हिंदूच आहेत. ते स्वत:देखील तिथेच भेटतील.
या वृत्ताप्रमाणे मी स्वतः आणि माझा संघ स्वयंसेवक मित्र विशाल नाखवा नागपंचमीच्या सकाळीच दि. २१ ऑगस्ट रोजीच नागपाड्यात जाऊन थडकलो. अत्यंत बकाल वस्ती. मस्तान तलावाचे मैदान स्थानिक नगरसेवक भावी आमदार यांच्या प्रयत्नाने एकदम अद्ययावत, पण भवताली मांस विक्रीची खुली दुकाने आणि अन्य व्यापारी गाळे, चाळी, गल्ल्या आणि बोळ. त्यातल्याच एका चिंचोळ्या बोळाला छानसा लाकडी दरवाजा आणि वर पाटी - श्री नागोबा मंदिर. उत्सुकतेने आत शिरलो. एक छोटीशी चौखांबी देवळी आणि तिच्यात पाच फड्यांची नागोबाची मूर्ती. मूर्तीच्या पायाशी काही मानवी आकाराच्या आकृत्या, मारुती किंवा देवी यांच्या पायांखाली त्यांनी पायतळी तुडवलेल्या असुरांच्या मूर्ती असतात, तसेच काहीसे. पण, वर्षानुवर्षे शेंदराची पुटेे चढवल्यामुळे सगळेच अस्पष्ट. नागोबाची मूळ मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असावी, असा अंदाज. उंची सुमारे ५-५.२ फूट. मूर्तीच्या पाठीमागून प्रदक्षिणेसाठी अगदी चिंचोळी वाट.
पुजारी धर्मेशजी यांच्याशी संवाद करीत होतो, तोच मालक कमलेशासिंग चौहान हे स्वतःच आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यांच्या खापर पणजोबांपासून म्हणजे किमान गेल्या सहा-सात पिढ्या हे देवस्थान यांच्या मालकीचे आहे. ते स्वत: व्यवसायाने वकील असून काळबादेवी जवळ लोहारचाळ इथे राहतात. हे देवस्थान जागृत असून नवसाला पावते. लोक नागोबाला चांदीचे छोटे पाळणे इत्यादी वाहतात. मंदिर फक्त नागपंचमीलाच का उघडे ठेवता, या प्रश्नांवर तेे म्हणाले, “केवळ नाईलाजाने असे करावे लागते. आजूबाजूला एकही हिंदू घर नाही. समजा मी कायमस्वरूपी पुजारी नेमला, तरी त्याला इथे राहणे अशक्य आहे. १९९२-९३ च्या दंग्यात हे स्थान उद्ध्वस्त करण्याचा जोरदार प्रयत्न झाला होता. आजही उपद्रवी लोक समोरच्या बोळात केर-कचरा टाकतच असतात.”
निदान नागपंचमीला तरी हिंदू समाजाने बहुसंख्येने या स्थानाला भेट देऊन पुन्हा एकवार इथे हिंदू वहिवाट निर्माण करण्याची गरज आहे. जसे देवाने आपल्याला सांभाळायचे आहे, तसे आपणही देवाला सांभाळायचे आहे.