हिंदू सेवा संघ वनवासी पाड्यातील वनवासींसह विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्काराची ज्योत पेटवणार्या हिंदू सेवा संघाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया.
हिंदू सेवा संघ (महाराष्ट्र) या समाजसेवी संस्थेची स्थापना दि. २२ डिसेंबर, १९६६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक दामोदर वामन उपाख्य दामू अण्णा टोकेकर यांच्या संकल्पनेतून झाली. हिंदू सेवा संघाचे संस्थापक दामूअण्णा टोकेकरांची कर्मभूमी असणारे मनोर जवळील अंभाण याठिकाणी हिंदू सेवा संघाच्या कामाचा प्रारंभ झाला. रा. स्व. संघाचे प्रचारक रघुनंदन दिघे याचे सहकार्य दामूअण्णांना मिळाले. कल्याण मुरबाड रस्त्यावर कल्याणपासून १५ किमी अंतरावर निसर्गरम्य अशा ३० एकर जागेत सेवाकेंद्र कार्यरत आहे. कल्याण येथील दानशूर व्यक्ती सावळारामभाऊ भिडे यांनी हिंदूसेवा संघाला एक पैसा ही न घेता ही जागा दान केली आहे.
समाजावरील त्याकाळी आलेली ग्लानी दूर करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अशिक्षित वनवासी समाज यांना विद्यार्थी वसतिगृह चालवून तसेच इतर ज्ञानप्रसारणाचे कार्य करून मदत करणे हे संस्थेचे उद्दिष्ट्य आहे. ही संस्था शासनमान्य आहे. संस्थेच्या मालकीची ठाणे व पालघर जिल्ह्यात ६० एकर जागा असून, पालघर जिल्ह्यात अंभाण व बाळकापरा व ठाणे जिल्ह्यात मामणोली व डोळखांब अशी चार केंद्र कार्यरत आहेत. या चार ही केंद्रात मिळून १५० च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
‘मॅड फाऊंडेशन’, मुंबई यांच्या सहकार्याने विक्रमगड येथे निवासी वसतिगृहाच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र चालवण्यात येते. सध्या २००च्या आसपास विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. येथील वसतिगृहात तलासरी रायगड जिल्हा, मामणोली परिसर, अंबरनाथ, बदलापूर इत्यादी ठिकाणचे मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थी वास्तव्यास आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर स्वावलंबन, स्वच्छता, समाजसेवा, शिस्त, बंधुभाव इत्यादी गोष्टींचे संस्कार केले जातात. विद्यार्थ्यांच्या निवास, शिक्षण, आरोग्य, क्रीडा इ.ची सर्व व्यवस्था केंद्रामार्फत केली जाते. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. मामणोली व अंभाण दोन्ही केंद्रात आपण गोशाळा उभारल्या आहेत. व दोन्ही गोशाळेत मिळून १०० च्या आसपास गोधन आहे. गायीपासून मिळणार्या दूधाचा वापर केंद्रातील मुलांसाठी केला जातो, तर शेणाचा उपयोग गोबर गॅस व शेतीसाठी केला जातो. केंद्राच्या सात एकर जागेत शेती केली जाते.
त्याचप्रमाणे हिवाळी भाजीपाला, कडधान्य, सफेद कांदा, भुईमूग यांचे ही उत्पन्न घेतले जाते. विहीर, सिंचन, विहिरीचे पाणी, रासायनिक खताऐवजी शेणखत, उत्तम प्रकारचे बियाणे वापरले जाते. त्यामुळे शेती उत्पादन बर्यापैकी होते. मामणोली व अंभाण येथील शेतजमिनीत भात, पालेभाज्या, कडधान्ये यांचे उत्पन्न घेतले जाते व ते वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी वापरले जाते. पण ते पुरसे नसते. शेताच्या बांधावर आंबा, फणस, बोर, साग, फुलझाडे मोठ्या संख्येत जतन केली आहेत. चार ही केंद्रांच्या परिसरात डॉक्टरांच्या मदतीने मोफत वैद्यकीय शिबिरे घेतली जातात. त्याचा लाभ आसपासच्या गाव व पाड्यावरील वनवासींना घेता येतो. सर्व केंद्राच्या निसर्गरम्य परिसरात सहली, शाळा, कॉलेजची साहस शिबिरे, आकाशदर्शन अशा विविध कार्यक्रमांसाठी संस्थेची जागा अत्यल्प दरात उपलब्ध करून दिली जाते. यासाठी चहा, नाश्ता व रुचकर भोजन हे पण अत्यल्प दरात दिले जाते. केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात केंद्राचा संपर्क राहावा म्हणून दरवर्षी केंद्राच्यावतीने मकरसंक्रात, गुरूपौर्णिमा, रक्षाबंधन, विजयादशमी इत्यादी उत्सव साजरे केले जातात.परिसरातील नागरिक त्यात सहभागी होत असतात.
जव्हार व डहाणू तालुक्यातील सुमारे ११५ गावांत दरवर्षी हिंदू सेवा संघातर्फे गणेशोत्सव साजरे केले जातात.त्यासाठी संघाचे कार्यकर्ते गणेशमूर्ती व आरतीची पुस्तके मोफत देतात. दरवर्षी गावांतील देणगीदार केंद्राला गणेशमूर्ती देत असतात. केंद्रात अडीच दिवसांचा गणपती असतो. वसतिगृहातील विद्यार्थी पूजा, आरती, भजन करतात. त्यामुळे त्यांच्यावर एक चांगला संस्कार होत असतो. गणेशोत्सव काळात गावात पूर्णपणे मद्यपानास बंदी असते. त्यामुळे व्यसनमुक्तीचा नकळत संस्कार होत असतो. ग्रामस्थ एकत्र येऊन पूजाअर्चा, आरती, भजन, प्रसाद वाटप करतात. गेल्या अनेक वर्षांपासून वनवासी पाड्यावर जाऊन महिलांना भाऊबीज भेट म्हणून साडी चोळी व मिठाई वाटली जाते. कधी कधी ब्लॅकेट, चादरी इत्यादी वस्तू पण वाटल्या जातात. हिंदू सेवा संघाच्या माध्यमातून अंभाण व विक्रमगड येथे वनवासी समाजातील विवाहइच्छुक जोडप्यांचे सामूहिक विवाह समारंभ आयोजित केले जातात.
देशाच्या विविध भागातून दररोज घरापासून दुरावलेली अनेक मुले ठाणे, मुंबई परिसरात येतात. त्यांच्यावर वाईट संस्कार होऊ नयेत म्हणून ‘समतोल फाऊंडेशन’ या शासनमान्य संस्थेमार्फत मामणोली केंद्रातील मनपरिवर्तन शिबिरात आणले जाते व सुमारे ५० दिवसांच्या कालावधीत त्यांच्यावर विविध संस्कार करून पालकांच्या स्वाधीन केले जाते. पर्यावरण दक्षता मंच ठाणे यांच्या माध्यमातून ‘निसर्गायन’ या प्रकल्पातंर्गत गांडूळखत, औषधी वनस्पती यांची लागवड व संगोपन या विषयावर कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे शिक्षण दिले जाते. निसर्गरम्य व प्रदूषण केंद्रात दरवर्षी नोव्हेंबर ते मे या दरम्यान खगोलप्रेमी अभ्यासक आकाश निरीक्षणाची शिबिरे घेतली जातात. त्यांची सर्व व्यवस्था केंद्र आत्मियतेने करीत असते. विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार व्हावेत, शेतीसंबंधी प्राथमिक स्वरूपाचे ज्ञान व्हावे म्हणून केंद्रातील शेतजमीन विद्यार्थ्यांमार्फत वांगी, दुधीभोपळा, पडवळ, मिरची तसेच पालेभाज्या लावणे, खतपाणी घालणे इत्यादी कामे करवून घेतली जातात.
विद्यार्थीदेखील ही कामे आनंदाने करतात. विद्यार्थी स्वत:ची कामे स्वत: करीत असल्याने त्यांना स्वावंलबनाची सवय ही लागते. विविध कारणांमुळे अनेक वनवासी बांधव परधर्मात गेले आहेत. अशा बांधवांना त्यांच्या इच्छेनुसार हिंदू धर्मात परत घेणे, असे कार्यक्रम पण संस्थेतर्फे आयोजित केले जातात. हिंदू सेवा संघाचे संस्थापक दामू अण्णा टोकेकर, संस्थापक अध्यक्ष भगवानराव जोशी, केंद्राला जागा देणारे टिळकभक्त सावळारामभाऊ भिडे यांचे स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या कार्यक्रमांना परिसरातील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय विचारांचे संस्कार व्हावेत म्हणून अभ्यासाव्यतिरिक्त वेळात देशभक्तीपर गीत, अथर्वशीर्ष पाठांतर, राष्ट्रीय पुरुषांचे चरित्रकथन, योगाभ्यास इत्यादी गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या जातात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या शारीरिक बळकटीसाठी विविध प्रकारचे व्यायाम, सूर्यनमस्कार, स्वदेशी खेळ त्यांच्याकडून करून घेतले जातात.
या केंद्रातील विद्यार्थ्यांना समाजातील दानशूर व्यक्ती, समाजसेवी संस्था, संघटना, विविध प्रकारची मदत सेवाभावी वृत्तीने करीत असतात. ही संस्था समाजातील दात्यांकडून आलेल्या देणगीद्वारे गेली ५५ हून अधिक वर्षे कार्यरत आहे. देणगीदारांना आयकरात ८० जी अन्वये सवलत मिळते.