राऊतांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवली तर डिपॉझिटही जप्त होईल...कारण
21-Aug-2023
Total Views |
मुंबई : उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पक्षादेश आल्यास आपण तुरुंगवारीही करायला तयार आहोत, तसेच निवडणूक लढविण्यासंदर्भात पक्षनेतृत्वही इच्छुक आहे, अशी पुडी राऊतांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत सोडली. मात्र, ज्या मतादार ईशान्य मुंबईतील मतदार संघावर संजय राऊत दावा करत आहेत तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा प्रचंड दांडगा जनसंपर्क आणि भाजपची बूथरचना यांचा विचार करता हा किल्ला अभ्येद्य आहे. ५ लाख १४ हजार ५९९ इतक्या मतांसह विजय मिळवला. संजय दिना पाटलांना २ लाख २६ हजार ८४६ मताधिक्याने धुळ चारली होती.
या मतदार संघाचा इतिहास पाहिला तरीही ही बाब लक्षात येईल. ईशान्य मुंबई या मतदारसंघामध्ये कधीही सलग एका पक्षाचा खासदार निवडून आला नव्हता मात्र, २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या लोकप्रियतेच्या जोरावर आणि देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेल्या करिश्म्यात खासदार मनोज कोटक यांनी इतिहास रचला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दीना पाटील यांना निवडणूक निकालांच्या पूर्वीही या मतदार संघात कोण जिंकणार, यापेक्षाही भाजप कोणाला तिकीट देणार, यावर अक्षरशः वादळ उठले होते.
त्यानंतर नाट्यमयरित्या भाजपचे मुंबई महानगरपालिकेचे गटनेता मनोज कोटक यांना तिकीट जाहीर झाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते छातीठोकपणे ‘आम्हीच जिंकणार,’ असे सांगत होते. कारण, संजय पाटील यांनी मनोज कोटक यांच्या खूप आधीपासून प्रचाराला सुरुवात केली होती. संजय पाटील हे २००९ साली खासदार म्हणून जिंकून आले होते. या पार्श्वभूमीवर प्रचाराला कमी वेळ मिळाला असतानाही मनोज कोटक यांनी विजयाची माळ आपल्या गळ्यात टाकली. कारण, भाजपचे गटनेता म्हणून मनोज कोटक यांचा जनसंपर्क चांगलाच होता. भाजपचे संघटन तसेच जिल्ह्याचे इतर पक्षीय राजकारण आणि प्रश्न यांची मनोज कोटक यांना चांगलीच जाण होती.
मतदार संघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभावही पाहायला मिळाला. या मतदारसंघात ‘घर घर मोदी अभियान’, ‘शतप्रतिशत भाजप अभियान’ गेली तीन वर्षे सुरूच होते. त्याचा लाभ मनोज कोटक यांना झाला. दुसरीकडे संजय पाटील यांचा जनसंपर्क या मतदारसंघात होता, पण राष्ट्रवादीचा प्रभाव या मतदारसंघात नगण्यच! त्यातही इथल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना नेहमीच राष्ट्रवादीचा खासदार का, असा प्रश्न पडलेला. त्याचाही फटका इथे राष्ट्रवादीला बसला. या मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीनेही आघाडी घेतली. २०१४ साली इथे भाजपने ६०.९० आघाडी घेत बाजी मारली होती. ईशान्य मुंबईमध्ये नव्या खासदाराचा, पर्यायाने नव्या नेत्याचा उदय म्हणून युतीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनीही मनोज कोटक यांनाच संधी दिलीयं.
आत्ताही ही जागा भाजपकडेच आहे. या जागेवर तेव्हाही शिवसेना-भाजप महायुतीचा उमेदवार होता आणि तो आजही कायम आहे. संजय राऊतांनी उचलली जीभ लावली टाळ्याला या प्रमाणे या मतदार संघावर आपला दावा केलायं. मात्र, राऊतांनी फारसा याबद्दल बोलताना फारसा होमवर्क केला नाही, असचं दिसतंय. कारण ज्या मतांवर ते दावा करतायतं, ती महायुतीची म्हणजे भाजप आणि शिवसेनेची मते आहेत. उबाठा गटाला निवडणूक लढविण्यासाठी इथे नव्याने मतदार मोर्चा बांधणी करण्याची गरज आहे.
सुनील राऊतांच्या एका मतदार संघाच्या जीवावर राऊत लोकसभेच्या जागेचा दावा करत असतील तर ते गणितही असं आहे. ईशान्य मुंबईत एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदार संघात मुलूंड मतदार संघातून भाजपचे मिहीर कोटेचा हे निवडून येतात. मुंबईकरांच्या समस्या आणि त्यांच्या हितासाठी भिडणारा आमदार, अशी कोटेचा यांची ओळख आहे. घाटकोपर पूर्व मतदार संघात पराग शाह, घाटकोपर पश्चिममध्ये राम कदममध्ये दोघांनीही आपले मतदार संघ मजबूत केले आहेत. उर्वरित दोन मतदार संघात विक्रोळीतून संजय राऊतांचे भाऊ सुनील राजाराम राऊत तर मानखुर्दहून अबू आजमी निवडून येतात. या जागांवर बंधू सुनील राऊत आणि भांडुपचे आमदार रमेश कोरगावकर सोडले तर राऊतांच्या पाठीशी नेहमीप्रमाणे उभं रहाणारं कुणीही नाही. याच कारणास्तव राऊतांनी या मतदार संघातून निवडणूक लढवली तर डिपॉझिट जप्त होण्याचीही शक्यता जास्त आहे.
संजय राऊतांनी सिंधुदुर्गातून लढावं!
भाजप आमदार नितेश राणेंनीही संजय राऊतांवर टीका केली आहे. "राऊतांनी साधी सरपंचपदाची निवडणूक लढवून दाखवावी, त्यानंतर खासदारकी लढविण्याच्या बाता कराव्यात," अशी टीका त्यांनी केली आहे. संजय राऊत ज्या वॉर्डमध्ये रहातात तिथे काँग्रेसचा नगरसेवक आहेत. ईशान्य मुंबईची जागा महाविकास आघाडीच्या अनुषंगाने विचार केल्यास राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे राऊत पवार गटातून निवडणूक लढवणार का?, अशी माझी शंका खरी ठरली. निवडणूक लढविण्याची एवढीच इच्छा असेल तर राऊतांनी रत्नागिरी सिंधुदुर्गतून निवडणूक लढवावी तुझं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय रहात नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.