आजच्या लेखाचे नायक हेमंत सुर्यवंशी हे एका अमूर्त शैलीचे जाणकार, अनुभवी दृश्यकलाकार आहेत. सांस्कृतिक विभागात महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलेले आहे. व्याकरण नसलेली त्रिवेणी कला, रोमांचक आहे. म्हणूनच या कलेला आत्मसात करण्यासाठी चित्रकार सूर्यवंशी यांनी अथक मेहनत घेतली. त्यातूनच निर्माण झालेली त्यांची अमूर्त शैली उत्स्फूर्त अभिव्यक्तीची चैतन्यदायी मूर्तिमंतता भासते.
दृश्यकला क्षेत्रात रोज काही ना काही तरी घडत असते. सुरू असते. मूर्त-अमूर्त शैली प्रकारांवर तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या नजरेने बघत असतो, पाहत असतो. प्रचलित आशयानुसार मूर्त म्हणजे ‘रिअॅलिस्टिक स्टाईल’ किंवा ‘वास्तवादी शैली’ असे साधारण म्हणतात, तर ‘अमूर्त’ म्हणजे ‘अॅब्स्ट्रॅक स्टाईल’ किंवा ’अवास्तवादी शैली’ असे साधारण मानतात. मागच्या महिन्यात एका खासगी चॅनेलवर एका दृश्यकलाकाराची मुलाखत पाहत आणि ऐकत होतो. त्या कलाकाराने ‘मूर्त आणि अमूर्त चित्रकला शैली’यावर स्वतःच्या अनुभवानुसार वेगळ्याच अंगाने विचार मांडला होता. त्यांच्या मते, ‘मूर्त’ म्हणजे डोळ्यांना दिसणारी कला आणि ‘अमूर्त’ म्हणजे अर्थातच डोळ्यांना न दिसणारी कला. मुद्दा गोंधळात टाकणारा जरी प्रथमदर्शनी वाटला असला, तरी विचार करायला भाग पाडणारा निश्चित आहे, असे मला त्या क्षणी वाटलं. असो.
‘अमूर्त’ या शब्दाकडे आपण ’अॅब्स्ट्रॅक स्टाईल,’ अशाच आशयाने पाहुयात. माझ्या निरीक्षणानुसार, ’मूर्त’ म्हणजे सर्वसामान्यांना समजायला-पाहायला आवडणारी किंवा पसंतीला पडणारी कलाशैली, तर ’अमूर्त’ म्हणजे विशिष्टदृष्टी म्हणजे ज्यांच्याकडे विशेष नजरेने पाहण्याची कला-विचार आहे. तसेच, अशा शैलीतील, कलाकृतीतील निर्मितीच्या विचारापर्यंत डोकवून पाहण्याची तयारी आहे आणि त्यातून मिळणारा आनंद उपभोगण्याची अनुभूती घेता येते. ती शैली अर्थात अमूर्त चित्रशैलीतील कलाकृतींना तुलनेने कमी म्हणण्यापेक्षा निवडक कला रसिक लाभतात, असं सर्वसाधारण निरीक्षण आहे.
आजच्या लेखाचे नायक हेही एका अमूर्त शैलीचे जाणकार, अनुभवी दृश्यकलाकार आहेत. सांस्कृतिक विभागात महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलेले आहे. सारंगखेडा येथील ’चेतक महोत्सवात’ ’अश्व पेंटिंग्ज’च्या ज्युरी म्हणून मागील वर्षी जाण्याचा योग आला होता. तेथील आणखी एक ज्युरी प्रा. राजेंद्र महाजन सर आणि दुसरे ज्येष्ठ चित्रकार हेमंत सुर्यवंशी सर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यावेळी हेमंत सुर्यवंशी सर यांची औपचारिक ओळख प्रा. महाजन सरांनी करून दिली. प्रदर्शनातील कलाकृतींचे परीक्षण म्हणण्यापेक्षा अवलोकन करताना आम्हा तिघांनाही जवळपास एकमत होताना, मी अनुभवले. ज्युरींचे एकमत होणे, ही बाब खरं तर एक प्रकारची लॉटरीच म्हणावी. कारण, ज्युरींचा ही एकाहून एक सरस ’ग्रिव्हेंस’ अशावेळी ऐकण्यात वेगळीच मजा येते. मला आवडलेली कलाकृतीच कशी बक्षिसपात्र ठरते, यावरील प्रत्येक ज्युरींचं स्पष्टीकरण, हे त्यांचा अनुभव आणि त्यांची विचारांची बैठक प्रतीत करीत असते. येथे आमची तिघांची वैचारिकता मिळती-जुळती ठरली आणि सुर्यवंशी सरांची खूप जुनी ओळख आहे, असा अऩुभव यायला लागला.
दृश्यकलेत अंतःस्फूर्तीने निर्माण होणारी कला ही चिरंतन आनंद देणारी कला असते. आपल्याकडे ’ट्रायबल आर्ट’ किंवा ’आदिवासी कला’ या अंतःस्फूर्तीतून जन्माला आलेल्या असतात. या कलानिर्मितीला प्रचलित कलाशिक्षणातील आखीव-रेखीव परिणाम लागू ऩसतात. ही कला उत्स्फूर्तपणे व्यक्त होते, अशा कला प्रकारावर चित्रकार सुर्यवंशी यांनी संशोधनात्मक काम केलेले आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरांवरील विविध संस्थांचे पुरस्कार अनेकदा मिळालेले आहेत. त्यांच्या यशाचं गमक त्यांच्या अथक मेहनतीमध्ये आहे. आपल्या कामावर आणि आपण करीत असलेल्या संशोधनावरील निष्ठा त्यांना त्यांच्या स्वतंत्र कलाशैलीपर्यंत घेऊन आली असावी, असे वाटते.
त्यांच्या सरकारी सेवा काळात विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी स्मृतिप्रवण काम केले, अशी त्यांची मुख्य ओळख देता येईल. जबाबदारीच्या पदांवर अधिकारी म्हणून काम करीत असताना एक प्रकारचं दडपण-ताण मनावर असतोच. अशा परिस्थितीला समर्थपणे पेलण्यासाठी चित्रकार सुर्यवंशी यांनी दृश्यकला निर्मितीकडे ‘उपचार’ म्हणून पाहिले असावे. कारण, त्यांची चित्रनिर्मितीची शैली पाहिली तर तसे जाणवते. मनावरील ताण कमी करण्यासाठी किंवा हलका करण्यासाठीची कुंचल्यांच्या फटकार्यांची जादुई करामत पाहिली की, मूर्तामूर्त भाव कुठचा कुठे लोप पावतो. चित्राकृती आणि रसिक मन यांच्यातील ‘प्रयागराज’ बनून जाते. संगम होतो आणि सुर्यवंशी यांची कलाकृती रसिक मनाचा ठाव घेते.
महाराष्ट्र राज्य, दक्षिण मध्य क्षेत्राचे सेंटर नागपूर आणि चंदीगढ येथे त्यांनी ‘कल्चरल ऑफिसर’ म्हणून काम केले आहे. छत्तीसगढच्या, विणकर सेवा केंद्रात ते अधिकारी होते. तेव्हा त्यांना प्रदीर्घ इतिहास असलेल्या तेथील आदिवासी कला आणि गृहचित्रांकडे ते आकर्षित झाले. त्यांनी या दोनही कलाप्रकारांकडे संशोधनात्मक, परंतु कलाकाराच्या दृष्टीने पाहिले. त्यामुळे निर्माण होणार्या कलाकृती या ’राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त ठरत गेल्या.
ते म्हणतात की, “लोककला, आदिवासी कला आणि हस्तकला या भारतीय कलांचे मूळ आहेत. भूतकाळातील हरवलेल्या संस्कृतीचा महत्त्वाचा दुवा या त्रिवेणी कला आहेत. या तीन्ही कला, आपल्या संवेदनांचा शोध घेण्यास प्रवृत्त करतात. माझ्या अचेतन मनाची तपासणी करण्यासाठी त्यांचा आदिम कलेशी असलेला संबंध आणि समांतरता मला मोहित करते.” हे चित्रकार सुर्यवंशी यांचे विचार एखाद्या साधकापेक्षा वेगळे नाहीत.
व्याकरण नसलेली ही त्रिवेणी कला, रोमांचक आहे. म्हणूनचया कलेला आत्मसात करण्यासाठी चित्रकार सूर्यवंशी यांनी अथक मेहनत घेतलेली आहे. त्यातूनच निर्माण झालेली त्यांची अमूर्त शैली उत्स्फूर्त अभिव्यक्तीची चैतन्यदायी मूर्तिमंतता भासते. आदिवासी आणि आदिम कला त्यांना नेहमीच आकर्षित करते, असं ते सांगतात. त्यातूनच त्यांनी त्यांची स्वतःची चित्रित भाषा विकसित केली आहे.
त्यांच्या या अथक कलाप्रवासाला दीर्घायुष्यासह सुयश लाभावे, हीच त्यांना सदिच्छा.
प्रा. डॉ. गजानन शेपाळ