काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात कागदावर धावणारी मेट्रो प्रत्यक्षात उतरविण्याचे काम केंद्र आणि राज्यामधील भाजपच्या सत्ताकाळात झाले. केवळ टीका आणि राजकीय कुरघोड्यांमध्ये व्यस्त असलेल्या आघाडीच्या सत्ताकाळात पुण्यात मेट्रो उन्नत (एलेव्हेटेड) करायची की भूमिगत (अंडरग्राऊंड) यावरच अनेक वर्षे खल सुरू होता. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. सत्ताकाळात राष्ट्रवादीलाही कामगिरी करता आलेली नव्हती. अरुंद रस्ते, अतिक्रमणे, रस्त्यांवरील खड्डे, वाहनांची वाढती संख्या अशा एक ना अनेक समस्यांनी पुणेकर पुरते जेरीस आले होते. २०१४ साली राज्य आणि केंद्रात सत्तांतर झाले. २०१७ साली पुण्यात भाजपची एकहाती सत्ता पालिकेवर आली. या तिन्ही यंत्रणांच्या समन्वयामधून मेट्रो प्रकल्प मार्गी लागला. पुण्याच्या विविध भागांमध्ये मेट्रोचे खांब उभे राहू लागले. मेट्रो मार्गाचं कुतूहल पुणेकरांच्या मनात जागृत होऊ लागलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यांच्याच हस्ते मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या हस्ते मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. वनाज ते रुबी हॉल आणि पिंपरी ते शिवाजीनगर या दोन मार्गांवर मेट्रो धावू लागली आहे. एवढेच नव्हे, तर इंटरचेंज सुविधेमुळे प्रवासी संख्या वाढू लागली आहे. नुकतेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याच्या मेट्रोमध्ये कोण बसतंय का पाहा? असा प्रश्न केला होता. मेट्रोमधून आजवर सात लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामधून मेट्रोलाही लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. केवळ मेट्रो स्थानक बांधायचे म्हणून बांधण्यात आलेले नाहीत. प्रत्येक स्थानक कल्पकतेने उभारण्यात आले आहे. शिवाजीनगर स्थानकाचा परिसर म्हणजे अस्सल पुणेरी संस्कृतीचा भास. राजकारणी आपल्या सोयीप्रमाणे टीका-कौतुक करीत राहतील. त्यात विशेष असे काही नाही. मात्र, पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता वाहतूककोंडीवर त्यांना पर्याय मिळाला आहे, असे दिसते. दैनंदिन वाढती प्रवासी संख्या ही नियोजनकर्त्यांचा (पॉलिसी मेकर्स) उत्साह वाढवणारी आहे. सध्या तरी पुण्याची मेट्रो सुसाट आहे.
पुण्याला भविष्याची आशा
पुण्याच्या पश्चिम भागातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने उभारण्यात आलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपूल आणि जोडणार्या रस्त्यांचे लोकार्पण नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पुणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आणि विशेषतः ऑटोमोबाईल उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार असल्याचे सांगितले. याबाबतचे विश्लेषणही त्यांनी आपल्या यावेळच्या वक्तव्यांमधून केले. या तिघांच्याही भाषणाचे आकलन केल्यास भविष्यात पुण्याला मोठ्या संधी उपलब्ध होण्याची आशा आहे. पुण्यामध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणार आहे. ’आयटी हब’ असलेले पुणे ’ऑटो हब’ म्हणून उदयास येणार आहे. पुण्याभोवती असलेल्या ऑटोमोबाईल कंपन्यांमुळे ’ऑटो इंडस्ट्री’ची ’इकोसिस्टीम’ तयार झालेली आहे. त्यामुळे भविष्यात हे क्षेत्र आणखी विस्तारणार आहे. त्याकरिता आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. भारत जगातला तिसर्या क्रमांकाचा ’ऑटोमोबाईल’ उत्पादक बनलेला आहे. आगामी पाच वर्षांत तो पहिल्या क्रमांकावर जाण्याची शक्यता गडकरी आणि फडणवीसांनी वर्तविली आहे. त्यावेळी पुणे शहर आपसूकच ’ऑटो हब’ म्हणून ’ऑटोमोबाईल इंडस्ट्री’च्या केंद्रस्थानी येणार आहे. यावेळी गडकरी यांनी बोलताना भविष्यात दोन तत्त्वज्ञान महत्वाचे ठरणार आहेत. ‘इनोव्हेशन-सायन्स-टेक्नोलॉजी-रिसर्च स्किल अॅण्ड सक्सेसफूल प्रॅक्टिस’ ज्याला आपण ’ज्ञान’ म्हणतो. या ज्ञानाचे रुपांतरण अर्थात ’कन्व्हर्शन ऑफ नॉलेज’... दुसरी म्हणजे ‘नो मटेरियल इस वेस्ट अॅण्ड नो पर्सन ईज बेस्ट, इट इज डिपेंड अपॉन द अॅप्रोप्रिअट टेक्नोलॉजी, इट ईज डिपेंडिंग अपॉन द व्हिजन ऑफ लिडरशीप. दॅट यू कॅन कन्व्हर्ट टू वेस्ट इन द वेल्थ.’ अशी व्याख्या केली. पुणे शहर तर ज्ञानाचे विद्येचे माहेरघर आहे. त्यामुळे पुण्याकडून भविष्यात मोठ्या आशा आहेत. त्याकरिता शिस्त, नियोजनबद्ध विकास आणि नागरी योगदान आवश्यक आहे.