शिमल्यात मृत्यूचे थैमान! शिवमंदिरात आणखी एकाचा मृतदेह सापडला
मृतांची संख्या १४ वर, अजूनही ७ बेपत्ता
17-Aug-2023
Total Views |
शिमला : हिमाचलमधील शिमला येथील शिव बावडी मंदिरातून आणखी एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे प्राध्यापक पीएल शर्मा यांचा आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या बचावकार्यात आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी अद्याप एकाची ओळख पटलेली नाही.
१४ ऑगस्ट रोजी शिवबावडी मंदिराचे भूस्खलन झाल्याने २१ जणांचा मृत्यू झाला तर ५० भाविक ढिगाऱ्याखाली दबले असल्याचे सांगण्यात येत होते. तेव्हापासून याठिकाणी बचावकार्य सुरु असून आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सकाळी हिमाचल प्रदेश विद्यापीठातील गणित विभागाचे प्रमुख प्राध्यापक पीएल शर्मा यांचा मृतदेह सापडला आहे. मंदिरापासून दूर असलेल्या नाल्यात त्यांचा मृतदेह सापडला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृतदेह सापडला होता, तर मुलगा अद्याप बेपत्ता आहे.
अजून सात जण शिवबावडी मंदिराच्या भूस्खलनात गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांहून अधिक काळ मंदिराच्या परिसरात शोध घेण्यात यश आले नाही. त्यामुळे आता घटनास्थळाच्या खाली ७०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्यात बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात येत आहे.
शिवबावडी मंदिराच्या मागे दरड कोसळली तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे नाल्याच्या जोरदार प्रवाहामुळे लोक वाहून गेले असल्याचे बोलले जात आहे. तसेच याठिकाणी एक अज्ञात मृतदेह सापडला असून त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन शिमला पोलिसांनी लोकांना केले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह २५ ते ३० वर्षीय व्यक्तीचा आहे. त्याची उंची ५ फुट ११ इंच असून केसांचा रंग काळा व पातळ शरीरयष्टी आहे. इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये हा मृतदेह ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, पोलीस, प्रशासन, होमगार्ड आणि स्थानिक लोक शोध मोहिमेत गुंतले आहेत.