मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त, मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी समस्त मुंबईवासियांना शुभेच्छा दिल्या. महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारातील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी प्रारंभी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर आयुक्त तथा प्रशासक चहल यांनी मुंबईकरांना उद्देशून संबोधित केले.
तसेच, गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे माननीय राष्ट्रपती महोदय यांचे अग्निशमन सेवा पदक जाहीर झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकारी व कर्मचा-यांचा चहल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी दीपक घोष, दुय्यम अधिकारी सुनील गायकवाड, प्रमुख अग्निशामक पराग दळवी, अग्निशामक तातू परब या पाच जणांचा समावेश आहे.
दिनांक १ मे महाराष्ट्र दिनाच्या राज्यस्तरीय संचालनामध्ये महानगरपालिका सुरक्षा दलास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले होते. याबद्दल सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांना विशेष पदक देऊन महानगरपालिका आयुक्त यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये कंपनी कमांडर - विभागीय सुरक्षा अधिकारी सुनील होळकर, तसेच सहाय्यक सुरक्षा अधिकारी नितीन महाजन, संदीप मुळे या अधिकाऱ्यांना विशेष पदक प्रदान करण्यात आले.
महानगरपालिका सचिव खात्यातर्फे प्रकाशित करण्यात येणा-या "वार्षिक प्रकाशन २०२३" चे प्रकाशन देखील यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ‘बाबासाहेब वरळीकर’ यांच्या ५१ व्या स्मृतीदिनानिमीत्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस चहल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू , अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी चक्रधर कांडलकर यांच्यासह विविध खातेप्रमुख, सहाय्यक आयुक्त, इतर अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.