नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्वसमान्यांना दिलासा मिळत असून राज्याचा विकास चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचं ते म्हणाले. शिवाय, महाराष्ट्रातील लोकांचं नक्षलवाद्यांना समर्थन मिळत नाही, असंही ते म्हणालेत.
फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रातील लोकांचं नक्षलवाद्यांना समर्थन मिळत नाही. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा आमचा प्रयत्न करत आहे. अनेकांशी आमची चर्चा चाललेली आहे. मला विश्वास आहे की देशातील नेक्स्ट डेस्टिनेशन आम्ही गडचिरोलीला बनवू. नक्षलवाद्यांना भरती करता लोक मिळत नाहीत, आपल्या राज्यामध्ये आता नक्षलवादांना कोणाचही समर्थन मिळत नसल्याचे फडणवीस म्हणाले."
"प्रत्येक शेतकऱ्यांना एक रूपयामध्ये आपल्या सरकारने विमा दिला आणि अनेक शेतकऱ्यांनी या विम्याला प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील दीड कोटी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे पण मला अशी आशा आहे की पाऊस अजून येईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. शेतकऱ्यांना ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही देतो, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला पेरणी यंत्र आणि अशा अनेक गोष्टी आम्ही मागेल त्या शेतकऱ्यांना देत आहोत. त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गतसुद्धा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या योजनेंचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांच्यामध्ये समृद्धी येईल." असं फडणवीस म्हणाले.