दिग्पाल लांजेकर लिखीत ‘हळद’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
14-Aug-2023
Total Views |
मुंबई : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प असणाऱ्या 'सुभेदार' चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 'आले मराठे', 'मावळं जागं झालं जी' या गाण्यांपाठोपाठ आता 'हळद' हे गाणे देखील प्रेक्षकांची मने जिंकत आहे. रायबाचे लग्न असल्यामुळे त्यांच्या हळदीचा कार्यक्रम या गाण्यातून मांडला आहे. सुभेदार हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.
'हळद' हे गाणे गायक रोहित राऊत आणि निधी हेगडे यांनी गायले असून दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेल्या या गाण्याला देवदत्त बाजी यांनी संगीतबद्ध केले आहे. 'सुभेदार' या चित्रपटात केवळ शिवरायांचे मावळे स्वराज्यासाठी प्राण ओतून काम करत होते इतकेच न दाखवता शिवराय आणि तानाजींची मैत्री देखील यातून मांडण्याचा प्रयत्न दिग्पाल यांनी केला आहे.
अभिनेते अजय पुरकर यांनी नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका साकारली असून चिन्मय मांडलेकर यांनी शिवरायांची भूमिका आणि मृणाल कुलकर्णी यांनी जिजाऊंची भूमिका साकारली आहे. तर तानाजींच्या पत्नीची सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी साकारली आहे. सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, त्यांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. तर सुभेदारांचा मुलगा रायबाच्या भूमिकेत अर्णव पेंढारकर आहे.