'पोलीस ठाण्याच्या इमारतीत स्फोट!' रियाझ, मोहम्मद जस्मिन, सलीम यांना केरळमधून अटक

    14-Aug-2023
Total Views |
Kerala 
 
कोची : केरळमधील मलप्पुरम येथील पोलीस स्टेशन बॉम्बस्फोटाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याप्रकरणी पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद रियाज, मोहम्मद फवाज, मोहम्मद जस्मिन, सलीम आणि सलमानुल फरीश अशी आरोपींची नावे आहेत.
 
हे सर्व आरोपी १९ ते २५ वयोगटातील आहेत. एडिट केलेल्या व्हिडिओमध्ये काही चित्रपटांचे संवादही टाकण्यात आले आहेत. या पाचही आरोपींना शनिवारी (१२ ऑगस्ट २०२३) अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण मेलात्तूर पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे.
 
येथील मोहम्मद रियाझ नावाच्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर एक आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये तरुणांचा एक गट एकत्र बसलेला दिसत आहे. चित्रपटातील संवाद टाकून त्यांचे परस्पर संभाषण एडिट केले आहे.
 
व्हिडिओमध्ये सर्व आरोपी बॉम्बस्फोटाच्या ठिकाणाबाबत चर्चा करताना दिसत आहेत. एका व्यक्तीने रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड सुचवले. त्यानंतर दुसऱ्याने पोलीस ठाण्यात स्फोट घडवण्याची घोषणा केली. या व्हिडिओमध्ये काही वेळाने केरळमधील एका पोलिस स्टेशनच्या इमारतीमध्ये स्फोट होत आहे.
 
केरळ पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे पोलिसांनी सांगितले आहे की, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सोशल मीडियावर लाईक्स मिळवणे हा होता. या सर्वांवर दंगल भडकवण्याचा कट, सोशल मीडियावर पोलिसांविरुद्ध अपप्रचार करणे आदी कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.