पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होणार; ५० हजार कोटींची तरतूद

    12-Aug-2023
Total Views |

Nitin Gadkari


पुणे :
पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे पुण्यात ५० हजार कोटींचे पूल उभारण्यात येतील. तसेच पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 
केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले की, पुणे हे येणाऱ्या काळात देशाच्या विकासाचे केंद्र होणार आहे, व अनेकांना रोजगार देणार आहे. त्यामुळे पुण्यासाठी चोवीस तास पाणी आणि उत्तम रस्ते आवश्यक आहेत. पुण्याचा विकासासाठी भारत सरकारच्यावतीने निश्चितच सहकार्य करण्यात येईल. पुण्यातील प्रकल्पांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
 
तसेच पुणे-सातारा महामार्गावरील दुमजली डबलडेकर पूल, हडपसर-यवत उन्नत मार्ग, पुणे-शिरूर-अहमदनगर ५६ किलोमीटरचा मार्ग, तळेगाव-शिक्रापूर-चाकण ५४ किलोमीटरचा मार्ग आणि नाशिक फाटा ते खेड मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार आहे. पुणे विभागात पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले असून त्यातील काही पूर्ण झाले आहेत. १२ हजार कोटींचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग डिसेंबर अखेर पूर्ण होतील असेही त्यांनी सांगितले.
 
पुणे शहरात एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.
 
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, चांदणी चौक प्रकल्पासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मोठ्या प्रकल्पांवरील खर्च आणि वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. पुण्यात हवेतून चालणाऱ्या एअर बसेसबाबतही पर्याय म्हणून अभ्यास करावा. पुण्यातील ऑटो रिक्षांना नवे परवाने देताना इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणाऱ्या रिक्षांना परवाने दिल्यास प्रदूषण कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
 
तसेच ग्रीन हायड्रोजन हे भविष्य आहे त्यामुळे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचा विचार व्हावा. पुण्यातील सर्व कचऱ्याचे विलगीकरण करून पुणे चक्राकार मार्गासाठी वापरल्यास कचऱ्याची समस्या दूर होईल. पुण्यातील अशुद्ध पाणी शुद्ध करून उद्योग, शेती आणि रेल्वेला दिल्यास जलप्रदूषण दूर होण्यास मदत होईल. शहरातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबतच शहरातील प्रदूषण दूर करण्यावर अधिक भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
 
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. ‘पुणे वन कार्ड’ द्वारे पुणे मेट्रोने चांगली सुरुवात केली आहे. हे कार्ड पीएमपीएमएललाही लागू होईल अशी व्यवस्था केल्यास त्याची उपयुक्तता वाढेल. पुण्यात एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून ५०० मीटर वर नागरिकांना विविध वाहतूक पर्याय दिल्यास ते सार्वजनिक वाहतुकीचा जास्त उपयोग करतील. आता स्मार्ट सिस्टीम तयार करण्यात येणार असल्याने बसेसची वेळ, स्थान, प्रवासी संख्याही कळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.