'लवकरात लवकर देश सोडा' ; नायजरमधील भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाच्या सुचना

    12-Aug-2023
Total Views |

Arindam Bagchi


नायजर :
आफ्रिकन देश नायजरमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असून तेथील जनता रस्त्यावर आली आहे. राष्ट्राध्यक्षांना पदावरुन हटवत येथील लष्कराने आपल्या हातात सत्ता घेतली आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने भारतीय नागरिकांसाठी काही सुचना जारी केल्या आहेत.
 
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची शुक्रवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, नायजरमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सध्याची परिस्थिती पाहता, ज्या भारतीय नागरिकांना नायजरमध्ये राहण्याची गरज नाही, त्यांनी लवकरात लवकर देश सोडण्याचा सल्ला दिला आहे.
 
पुढे ते म्हणाले की, नायजरमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी हे लक्षात ठेवावे की नायजरमध्ये सध्या हवाई सेवा बंद आहे. अशा परिस्थितीत, जर ते देश सोडून रस्त्याने जात असतील, तर त्यांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यायला हवी. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या नायजरमध्ये सुमारे २५० भारतीय राहत आहेत.
 
सरकारने आपत्कालीन संपर्कासाठी संपर्क क्रमांकही जारी केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत, भारतीय नागरिक नियामे येथील भारतीय दूतावासाशी +२२७-९९७५९९७५ क्रमांकावर संपर्क साधू शकतात.